वसई : वसईच्या भोयदापाडा राजवली याठिकाणी आज सकाळच्या सुमारास अचानक डोंगराचा काही भाग घरावर कोसळल्याने ४ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची घटना घडली. यातील दोन जणांना सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. परंतु दोघेजण अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.
दोन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यातच वसई पूर्वेकडील राजावली येथे अचानक दरड घरावर कोसळली व नागरिक अडकले. हे ठिकाण अडगळीचे असल्याने जेसीबी व अन्य यंत्रणा याठिकाणी जाऊ शकत नसल्याने अखेर अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत पहारीच्या सहाय्याने दगड बाजूला करण्याचे काम केले जात आहे.
दोन नागरिकांना सुखरूप काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत अशी माहिती अग्निशमन विभागाने दिली. मात्र अद्याप शासकीय अधिकारी घटनास्थळी आले नाहीत या सर्व प्रकाराला महापालिका जबाबदार आहे, असा आरोप मनसेचे पदाधिकारी जयेंद्र पाटील यांनी केला.