नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : व्हिएतनाममधून दिल्ली विमानतळावर उतरलेल्या एका प्रवाशाच्या बॅगेतून एक दोन नव्हे तर, तब्बल ४५ पिस्तुले जप्त करण्यात आली आहे. या कारवाईनंतर एका भारतीय जोडप्याला अटक करण्यात आली आहे. अशी माहिती इंदिरा गांधी विमानतळ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
आयजीआय विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, व्हिएतनामहून आलेल्या एका भारतीय जोडप्याला ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून दोन ट्रॉली बॅगमधून २२ लाखांहून अधिक किमतीची ४५ पिस्तुले जप्त करण्यात आली आहेत. आरोपींनी यापूर्वी १२ लाखांहून अधिक किंमतीच्या २५ पिस्तुलांच्या तस्करीत सहभाग असल्याची कबुली दिली आहे.
दरम्यान, संबंधित जोडपे व्हिएतनामहून दिल्ली विमानतळावर उतरले होते. त्यांच्याकडे ट्रॉली बॅग होती. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पिस्तुले भरलेली होती. त्यामुळे हे दोघेही विमानतळाबाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. तसेच त्यांची हालचालही संशयास्पद वाटल्याने सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडील ट्रॉली बॅग तपासली. त्यावेळी यामध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्र असल्याची बाब निदर्शनास आली. एवढ्या मोठ्या प्रमाणात पिस्तुले बॅगेत भरलेली पाहून विमानतळावरील अधिकारीही काही काळ चक्रावून गेली. करण्यात आलेल्या या कारवाईनंतर संबंधित जोडप्याकडील बॅग जप्त करण्यात आली असून, ही शस्त्रे कोणाकडे पोहोचवण्यात येणार होती याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.