Wednesday, April 23, 2025
Homeमहाराष्ट्रठाणेसिद्धगडचा आकर्षक धबधबा खुणावतोय पर्यटकांना

सिद्धगडचा आकर्षक धबधबा खुणावतोय पर्यटकांना

प्रशासनाने बंदी घातल्याने नाराजी

बाळासाहेब भालेराव

मुरबाड : सध्या राज्यात सर्वत्र पावसाने जोरदार बॅटिंग चालू केली आहे. त्यामुळे ठाणे ग्रामीण भागातील अनेक नदी, नाले दुथडी भरून वाहत असताना डोंगराळ भागातील अनेक धबधबे प्रवाहीत झाले आहे. जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात माळशेज घाट, गोरखगड, मच्छिंद्रगड, माळशेज घाट पायथ्याशी असलेल्या थितबी, पाडेळा धरण आदी ठिकाण पर्यटनासाठी केंद्रबिंदू बनले आहेत. त्यापैकी सिद्धगड येथील दीडशे ते दोनशे फूट उंचावरून पांढ-या शुभ्र धारेमध्ये कोसळणारा सिद्धगडचा सुबेदार धबधबा पर्यटकांना आकर्षक करत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून प्रशासनाने बंदी आणल्यामुळे पर्यटकांचा हिरमोड होत आहे.

जून महिना उजाडला की पावसाची चाहूल लागते, त्याचबरोबर पर्यटकांना शुभ्र फेसळणाऱ्या धबधब्याची चाहूल लागते. त्याचप्रमाणे सिद्धगड येथे पावसाळ्यात निसर्ग आपल्या अंगावर हिरवी शाल परिधान करत असतो. थंड वाऱ्याची झुळूक रिमझिम बसणारा पाऊस धुक्याची लपवाछपवी आकर्षित करतात. यातच सह्याद्रीच्या कुशीतील शेकडो धबधबे पर्यावरणप्रेमींना आकर्षित करत असतात. यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जा असलेले माळशेज घाटातील सिद्धगड हे एक निसर्गाने नटलेले इतिहासकालीन ठिकाण आहे. पावसाळ्यात ट्रेकर्स तसेच पर्यावरणप्रेमी सिद्धगड धबधब्याजवळ ट्रेकिंगसाठी तसेच निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येत असतात. दीडशे ते दोनशे फूट उंचावरून शुभ्र धारेमध्ये कोसळणारा हा सुबेदार धबधबा पर्यावरणप्रेमींना पावसाळ्यात एक प्रकारे खुणावताना दिसतो. पावसाळ्यात हिरवी वनराई ढगांमध्ये लपलेल्या पर्वतरांगा कड्या कपाळामधून कोसळणारे शुभ्र फेसाळ धबधबे पक्षांचा किलबिलाट आणि स्वतंत्र लढ्यात बलिदान देणाऱ्या क्रांतिकारकामुळे पावन झालेल्या सिद्धगड परिसर पर्यटकांसाठी मिळालेले एक नवसंजीवनीच आहे. पावसाळ्यात सिद्धगडाच्या कुशीत अनेक धबधबे पहायला मिळतात.

मुरबाड-कर्जत रस्त्यावरील म्हसा या गावामधून जांबुर्डे गावातून सिद्धगड परिसरात जाता येते. मुरबाड बसस्थानक ते म्हसा येथून २३ कि.मी. अंतरावरील सिद्धगड हे परिसर हा भीमाशंकर अभ्यरण्यात येतो. जांबुर्डे या गावापासून पाच किमी अंतरावर हे विलोभनीय स्थळ आहे, तर सिद्धगड किल्ल्याच्या पायथ्याशी बोरवाडी या गावापासून काही अंतरावर असलेल्या उंचावरून फेसळणारा हा धबधबा पर्यटकांना सतत आपल्याकडे आकर्षित करत असतो. मात्र गेल्या तीन वर्षांपासून पर्यटकांना सदरील धबधब्याजवळ जाण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक पर्यटकांचा हिरमोड होता. तसेच ही बंदी हटवावी, अशी मागणी पर्यटक करत आहे. मात्र जोपर्यंत प्रशासनाकडून आदेश येत नाही. तोपर्यंत ही बंदी कायम असल्याचे वनपाल चिंतामण खंडवी यांनी माहिती दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -