
अतुल जाधव
एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर एकनाथ शिंदे समर्थक गट विरोधात शिवसेना असा सामना संपूर्ण महाराष्ट्रात रंगला असताना ठाणे शहरातील शिवसेना शाखेवर वर्चस्व कोणाचे या वरून धमासान होण्याची शक्यता आहे. ठाण्यातील नगरसेवकांनी मोठ्या संख्येने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास दाखवला असला तरी ठाण्यातील जुन्या शिवसैनिकांचे अजून तळ्यात मळ्यात असल्याचे दिसत आहे. कोणी स्पष्ट बोलत नसले तरी विविध विभागांतील शिवसेना शाखा मधील शांतता बरेच काही सुचवत आहे.
विधिमंडळातल्या आमदारांनी सरकार उलटवून आज २० दिवस लोटले. मात्र अपेक्षेप्रमाणे शिवसेनेला रस्त्यावरचा पाठिंबा मिळाल्याचे दिसत नाही. तोंडावर आलेल्या सर्वच निवडणुकांमुळे शिवसेनेतली चुप्पी कायम असल्याचं दिसत असलं तरी नजीकच्या काळात ठाणे नवी मुंबई आणि कल्याण शहरात शिवसेना शाखांवरून दोन्ही गटांमध्ये संघर्ष होणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
एक कल्याण-डोंबिवली शहर वगळता शिवसेनेत शिंदे गटाला उघड-उघड विरोध कुठेच झाला नाही हे आजचे चित्र आहे. परंतु महापालिका निवडणुकीचे घोडा मैदान जवळ असताना जिल्ह्यात सर्वच महापालिकांमधल्या नगरसेवकांनी बॅकफुटवर गेलेल्या शिवसेनेची स्थिती ओळखून सध्या वेट वॉचची भूमिका घेतली आहे. तर काहींनी तिकीट मिळणे आणि पुन्हा निवडून येण्याची शक्यता पडताळून घेऊन सध्या तरी राजकारणाचे वारे कुठे वाहत आहेत हे लक्षात घेता शिंदे गटासोबतच राहणे पसंत केले आहे. तर जिल्ह्यातल्या पंचायत समित्या, जिल्हा परिषदांमधील सदस्य मात्र वेळेचा आणि धोक्याचा अंदाज घेण्यासाठी अद्यापही सायलेन्स मोडवरच असल्याचे दिसत आहे. त्यांनी त्यांचे पूर्ण पत्ते अजून ओपन केलेले नाहीत. एकनाथ शिंदे यांनी प्रथमच स्वतःचं वेगळे बळ वापरून ठाणे जिल्हा परिषद आणि ५ पंचायत समित्या काबीज केल्या. यात भाजप - राष्ट्रवादीलाही वाटा देउन सत्ता राखली. यातले २५ सदस्य अद्यापी या बंडानंतर पुढे आलेले नाहीत तर संघटनेतही फार कमी प्रमाणात फाटाफुट दिसत आहे.
शहरी भागात नगरसेवक ही मोठी शक्ती असल्यामुळे इतर शिवसैनिकांची मतं सध्या तरी कुणी विचरात घेतली नसली तरी आदित्य ठाकरे आणि इतर शिवसेना नेत्यांचे दौरे सुरू झाल्यानंतर आणि निवडणुकांच्या तिकीट वाटपातल्या नाराजीनंतर शिवसेनेच्या शाखा कुणाच्या यावरून किमान मुंबई, ठाणे जिल्ह्यातल्या काही शहरांमध्ये संघर्ष टिपेला जाईल अशी चिन्हे आत्ताच दिसू लागलीयत. काल पर्यंत शिंदे साहेबांसोबतचेच लोक उघडपणे आज बोलत नसले तरी सेनेनं गेल्या ५० वर्षांत उभारलेल्या शाखा मूळ शिवसेनेच्या आहेत. तुम्ही वेगळ्या शाखा उभारा अशी सेना गटाची भूमिका आहे. पैकी शेकडो शाखांची उद्घाटने थेट बाळासाहेबांच्या हातून झालीत. तिला कोण हात लावतो ते बघू, अशीही भूमिका बोलली जातेय. तर नेमकी या उलट बंडखोरांची स्थिती आहे. एखाद दुसरी शाखा वा वॉर्ड वगळता तूर्त तरी सर्वच नेटवर्क शिंदे गटाच्याच ताब्यात असल्यामुळे या शाखादेखील आपसूकच शाखाप्रमुखांसह त्यांच्याकडे राहण्याची शक्यता आहे.
शिंदे गटाचे जिल्हयातील शिवसेनेवर एकहाती वर्चस्व आहे. या पूर्वीच्या निवडणुकांचे निकाल बघता ते सिद्ध देखील झाले आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या नंतर एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यात शिवसेनेची पाळेमुळे सैल होऊन न देता आपल्या प्रभावी लोकसंपर्क मुळे अधिकच घट्ट केली आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिंदे गटाचे प्राबल्य असणार असून ठाकरे गटाला निवडणुकीसाठी उमेदवार शोधताना दमछाक होणार अशी चर्चा आता पासूनच रंगली आहे.