नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयपीएलमध्ये न थकता खेळता, मग देशासाठी खेळायच्या वेळी मात्र विश्रांती का हवी? असा सवाल भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी देशाच्या वरिष्ठ खेळाडूंना विचारला आहे. वरिष्ठ खेळाडूंच्या विश्रांती घेण्यावरून गावसकर व्यक्त झाले.
भारतीय संघ वेस्टइंडीज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात एकदिवसीय सामन्यांची मालिका आणि पाच टी-२० सामने खेळण्यात येणार आहे. मात्र, या दौऱ्यासाठी विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रित बुमराह, हार्दिक पंड्या आणि रिषभ पंत या वरिष्ठ खेळाडूंनी विश्रांती मागितली आहे. यावरून सुनील गावसकर यांनी त्यांची कानउघडणी केली आहे.
‘तुम्ही आयपीएल खेळताना विश्रांती घेत नाही. मग भारतासाठी खेळताना तुम्ही विश्रांती का मागता? तुम्हाला भारतासाठी खेळावेच लागेल.’, असे सुनील गावसकर यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना ते म्हणाले, ‘टी-२० सामन्यात तुम्हाला २० षटके खेळावी लागतात. त्यामुळे तुमच्या शरीरावर त्याचा जास्त ताण पडत नाही. त्यामुळे बीसीसीआयने विश्रांती धोरणावर लक्ष द्यायला हवे”
विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रित बुमराह, हार्दिक पंड्या आणि रिषभ पंत या खेळाडूंनी विश्रांती घेतल्यानंतर वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी शिखर धवनकडे संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. टी-२० विश्वचषकापूर्वी भारतासाठी ही एकमेव मालिका असणार आहे.