
पुणे (हिं.स.) : खडकवासला धरणाच्या पाण्यावर वीजनिर्मिती करण्याच्या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. चार ते पाच महिन्यांत वीजनिर्मिती सुरू होईल. खडकवासला धरणातून मुठा उजवा कालव्यात शेतीसाठी सोडल्या जाणाऱ्या पाण्यावर १.२ मेगावॉट वीजनिर्मिती करणार आहे. यामुळे आठशे ते हजार घरांना पुरेल, एवढी वीजनिर्मिती यातून होणार आहे.
पानशेत धरण फुटीच्या दुर्घटनेत पुणेकरांचे अतोनात नुकसान झाले, त्यानंतर धरणांच्या सुरक्षिततेसाठी अनेक योजना राबविला. त्यापुढे एक पाऊल टाकत आता खडकवासला धरणातून वीजनिर्मितीचे काम हाती घेतले आहे. खडकवासला धरणातून मुठा उजवा कालव्यात सोडल्या जाणाऱ्या पाण्यावर वीजनिर्मिती करण्याचा प्रकल्प २००६ मध्ये मंजूर झाला.
त्यानुसार या प्रकल्पात ६०० किलोवॉटच्या दोन जनित्रांद्वारे १.२ मेगावॉट वीजनिर्मिती करणार आहे. हे वीजनिर्मितीचे काम बीओटी तत्त्वावर एका कंपनीला दिले आहे.