Friday, July 4, 2025

मनसे मेळावा राज ठाकरेंनी पुढे ढकलला

मनसे मेळावा राज ठाकरेंनी पुढे ढकलला

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पदाधिकारी मेळावा उद्या होणार होता. त्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्वांना निमंत्रणही दिले होते. मात्र आज एक पत्र लिहित हा मेळावा रद्द झाल्याची माहिती राज ठाकरेंनी दिली आहे. ठाण्यातल्या रंगशारदा येथे हा मेळावा होणार होता.


राज्यातल्या पूरपरिस्थितीमुळे आपण हा निर्णय घेतल्याचे राज ठाकरेंनी सांगितले. आपल्या पत्रात राज ठाकरे म्हणतात की, मला तुमच्याशी बोलायचे होते, कामासंबंधी सूचना करायच्या होत्या. पण कालपासून महाराष्ट्रात विविध ठिकाणी पावसाने थैमान घातलेले दिसतेय. जनजीवन तर विस्कळित आहेच, पण अशा परिस्थितीत मी उद्या जो कार्यक्रम तुम्हा सर्वांना सांगणार होतो, तो सांगितला तरी प्रत्यक्षात येणे अवघड आहे. अशा परिस्थितीत आपण उद्याचा मेळावा पुढे ढकलत आहोत.


https://twitter.com/mnsadhikrut/status/1546712159278624769

आपल्या पदाधिकाऱ्यांना काळजी घेण्याचे आवाहन करत राज ठाकरे म्हणतात, तुम्ही स्वतःची काळजी घ्या. पण अतिवृष्टीमुळे जिथे लोकांना त्रास होतोय, तिथेही लोकांसाठी जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न करा. अशा परिस्थितीत सरकारी यंत्रणा प्रचंड कामात असतात. त्यामुळे त्यांच्यावर विनाकारण ताण येईल, असे काहीही करू नका. अर्थात असे काही होऊ नये, कुठलेही नैसर्गिक संकट येऊ नये, हीच आपली इच्छा आहे. फक्त सतर्कतेसाठी सांगितले. लवकरच भेटू, असे ते आपल्या पत्रात म्हणाले आहेत.

Comments
Add Comment