द ओव्हल (वृत्तसंस्था) : शेवटचा कसोटी सामना गमाविल्यानंतर भारताने टी-२० मालिकेत इंग्लंडला त्यांच्याच घरात पराभूत करण्याची कामगिरी केली. दरम्यान आता दोन्ही संघांमध्ये ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला मंगळवारपासून सुरुवात होत आहे. रोहित विरुद्ध जोस असा विस्फोटक; परंतु धावांसाठी झगडणाऱ्या फलंदाज आणि कर्णधारांमधील ही झुंज त्यानिमित्त क्रीडाप्रेमींना पाहायला मिळणार आहे.
मंगळवारी द ओव्हलच्या मैदानात भारत आणि यजमान इंग्लंड यांच्यात मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना होणार आहे. एकमेव कसोटी यजमानांनी जिंकल्यानंतर टी-२० मालिका भारताने खिशात घातली आहे. त्यामुळे आता एकदिवसीय मालिका कोण जिंकणार? याकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे. टी-२० मालिकेतील नेतृत्वच दोन्ही बाजूने कायम असले, तरी दोन्ही कर्णधार धावा जमविण्यात धडपडताना पाहायला मिळत आहेत. त्यातल्या त्यात रोहितने थोड्या फार तरी धावा केल्यात, मात्र जोस बटलर पूर्णपणे अनफॉर्ममध्ये आहे. हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव यांचा फॉर्म भारतासाठी जमेची बाजू आहे. हार्दिक दोन्ही आघाड्यांवर यशस्वी ठरला आहे, तर सूर्यकुमारनेही मालिकेतील शेवटच्या टी-२० सामन्यात शतक झळकावून प्रभावित केले आहे. त्यामुळे भारताला तशी धावांची चिंता नाही. अडचणीच्या वेळी धावून येणाऱ्या फलंदाजांची संख्या भारताकडे अधिक आहे. दुसरीकडे धावा जमविण्यात आलेल्या अपयशाने इंग्लंडची डोकेदुखी वाढली आहे. ही कसर त्यांनी मालिकेतील शेवटच्या सामन्यात भरून काढली आहे. लिव्हिंगस्टोनची तुफानी फलंदाजी सर्वांनाच अवाक करून गेली. असे असले तरी त्यात सातत्य राखण्याचे आव्हान यजमानांसमोर आहे.
टी-२० नंतर होणाऱ्या या मालिकेत भारतीय संघात फारसा बदल झालेला नाही. रोहित, विराट, धवन, किशन, हार्दिक, पंत, सूर्यकुमार, जडेजा अशा एकापेक्षा एक अशा तगड्या फलंदाजांची मोट भारताच्या ताफ्यात आहे. गोलंदाजांमध्येही फारसा बदल झालेला नाही. दोन्ही संघांमध्ये गेल्या पाच सामन्यांचा विचार केल्यास इंग्लंडचे पारडे जड असल्याचे दिसते. इंग्लंडने ३, तर भारताने २ सामने जिंकले आहेत.
वेळ : सायंकाळी ५.३० वा. ठिकाण : द ओव्हल