मुंबई : मुंबईसह संपूर्ण राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी पूरस्थितीही उद्भवली आहे. राज्यात आजही पावसाचा जोर कायम राहणार असून रायगड, रत्नागिरी, पालघर, पुणे, कोल्हापूर, नाशिक आणि गडचिरोली या जिल्ह्यात आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर सिंधुदुर्ग, मुंबई, सातारा, मराठवाड्याचा काही भाग आणि चंद्रपूरला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये आजही मुसळधार पावसाची शक्यता आहे.
सखल भागात राहणाऱ्या नागरीकांनी दक्ष रहावे. पाणी पातळीत वाढ होत असल्यास नागरीकांनी नदीपासून तसेच ओढे आणि नाले यापासून दूर रहावे आणि आवश्यक असल्यास सुरक्षितस्थळी स्थलांतरीत व्हावे. नदी अथवा ओढे आणि नाल्यांवरील पुलावरुन पाणी वाहत असल्यास पुल ओलांडू नये. पूर पाहण्यास गर्दी करु नये. जुनाट आणि मोडकळीस आलेल्या आणि धोकादायक इमारतीमध्ये आश्रय घेऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
धरण आणि नदी क्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणा-या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरु नये. अचानक नदिच्या पाणी पातळीत वाढ झाल्यास जिवीतास धोका उद्भऊ शकतो. पुरामध्ये अथवा धरण क्षेत्रात धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. मेघगर्जना होत असल्यास झाडांच्या खाली न थांबता सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
मराठवाड्यासह विदर्भात काही ठिकाणी पूरस्थिती
मराठवाडा आणि विदर्भात पावसाने धुमाकूळ घातला आहे. विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, अकोला, वाशिम या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. तर मराठवाड्यातील, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पाऊस होत आहे.
नाशिक जिल्ह्यातील धरणे तुडुंब!
नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण आणि शहरातील पहिली ते बारावीच्या सगळ्या शाळा आज बंद राहणार आहेत. नाशिक जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर केल्यानं प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. पावसाचा जोर कायम असून धरणांमधून विसर्ग सुरू झाला आहे. गोदावरी नदीला मोसमातील पहिला पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले. प्रशासनाने खबरदारीचे आदेश दिले आहेत.
नाशिकच्या पश्चिम पट्ट्यासह गंगापूर पाणलोट क्षेत्रात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील धरणसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. एकाच दिवसाच्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणे तुडुंब भरली आहेत. नाशिक शहरासह इगतपुरी व त्र्यंबकेश्वर पट्ट्यात पावसाचा जोर कायम आहे. यामुळे धरण साठ्यात कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे नांदुरमाध्यमेश्वर, पालखेड डॅमसह इतर काही धरणातून विसर्ग करण्यात येत आहे. शिवाय जिल्ह्यातील महत्वाची धरणे तुडुंब भरली आहेत.
धुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अक्कलपाडा धरणातून दोन हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला असून पांझरा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा तालुक्यात मुसळधार पाऊस पडतोय. जव्हार तालुक्यातील वावर वांगणी येथील नदीला मोठा पूर आला आहे. आठ गावांचा संपर्क तुटला आहे.
पुण्यात गेल्या ६ दिवसांपासून सतत पाऊस पडतोय. पुण्यात सतत पडणाऱ्या पावसाने खडकवासला धरण ७५ टक्के भरले आहे. खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडतोय. धरणातून १ हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे.
नंदुरबार मध्ये हवामान खात्याने दिलेल्या इशारा नंतर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. तर नवापूर तालुक्यातील शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तालुक्यातील नदी नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. तसेच जिल्ह्यातील अनेक लघु प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. गोमाई, शिवण, नागन, नदी काठावरील. गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. नवापूर शहरातील रंगावली काठावरील १०० घरातील ४०० नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे
गडचिरोलीत पुढचे दोन दिवस रेड अलर्ट
मुख्यमंत्र्यांकडून परिस्थितीची पाहणी करण्यात आली असून गडचिरोली जिल्ह्यात १२ आणि १३ तारखेला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील ४८ तासात गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. काल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी परिस्थितीची पाहणी करुन बैठक घेतली.
गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी तालुक्यातील वैनगंगा नदीच्या पुलावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्ष पूर परिस्थितीची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी संजय मीना व पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पाणी पातळी व उपाय योजने संदर्भात माहिती दिली.
गेल्या तीन दिवसांत झालेल्या पावसामुळं अकोला जिल्ह्यातील नदी नाल्यांच्या पाण्यात वाढ झाली आहे. बाळापूर तालुक्यातल्या कारंजा रमजानपुरचा पानखास नदीवरील लघुप्रकल्प १०० टक्के भरला आहे. प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरु केल्याने अंत्री परिसरात पानखास नदीला पूर आला आहे. तसेच वाशिम जिल्ह्यात सकाळपासून मध्यम स्वरुपाच्या पावसाला सुरुवात झाली आहे. तिथे सध्या दाट ढगाळ वातावरण असून दिवसभर पाऊस पडण्याची शक्यता आहे.
वर्धा जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा
हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, १४ जुलैपर्यंत वर्धा जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. सध्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्यामुळे धरणाच्या सुरक्षेच्यादृष्टीने येत्या ७२ तासांत येणाऱ्या येव्या नुसार पुराचे पाणी वर्धा नदी पात्रात सोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदी काठावर राहणाऱ्या लोकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी तसेच नदी पात्र ओलांडू नये. निम्न वर्धा धरणाचे सात दरवाजे ३० सेमीने उघडण्यात आले असून, त्यामधून १७८.७३ (घन.मी./से) पाण्याचा विसर्ग सूरु असल्याने वर्धा नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.
लाल नाला प्रकल्पाचे ५ दरवाजे उघडले
समुद्रपूर तालुक्यातील लाल नाला प्रकल्पाचे सुद्धा ५ दरवाजे २५ सेमीने उघडण्यात आलेले आहेत. जिल्ह्यात सुरु असलेले पर्जन्यमान आणि विविध प्रकल्पांमधून करण्यात येणारा विसर्ग यामुळे पुराची स्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विविध धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यास धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन पर्यायाने नदीपात्रातील विसर्गात देखील वाढ होण्याची शक्यता आहे.