बडवानी (हि.स.) : आदिवासी मुलांच्या शिक्षणाच्या नावाखाली गोळा केलेल्या पैशांचा गैरवापर केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या विरोधात मध्यप्रदेशात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्यप्रदेशातील बडवानी येथे त्यांच्या विरोधात भादंविचे कलम ४२० अन्वये हा गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिस अधीक्षक दीपक कुमार शुक्ला यांनी सांगितले की, आदिवासी मुलांच्या शिक्षणाच्या नावाखाली गोळा केलेल्या पैशाचा गैरवापर केल्याप्रकरणी पाटकर आणि अन्य अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी प्रीतम राज बडोले यांनी दिलेल्या तक्रारीवर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तत्पूर्वी, पोलिसांनी या प्रकरणावर भाष्य करण्याचे टाळले होते. बडोले यांनी दिलेल्या तक्रारीत मेधा पाटकर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील आदिवासी मुलांना प्राथमिक स्तरावर शिक्षण देण्यासाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ता असल्याचा आव आणून लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला आहे.
प्राथमिक तपासादरम्यान, पोलिसांना आढळले की, नर्मदा नवनिर्माण अभियान ट्रस्टने गेल्या १४ वर्षांत १३ कोटी रुपये जमा केले आहेत, ज्याचा स्रोत आणि खर्च अज्ञात आहे. तक्रारीनुसार, १.५ कोटी रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम, ज्यांचे पैसे काढणे आणि खर्च करणे अस्पष्ट राहिले, तपासादरम्यान जप्त करण्यात आले आहे. ट्रस्टच्या १० बँक खात्यांमधून ४ कोटींहून अधिक रक्कम आढळून आली आहे, असा तक्रारदाराचा आरोप आहे. एफआयआरमध्ये पाटकर यांनी स्वतःचे वार्षिक उत्पन्न ६ हजार रुपये दाखवून न्यायालयाची दिशाभूल केल्याचा आरोप केला आहे, तर त्यांच्या बचत खात्यातून १९ लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत.
दरम्यान, पाटकर यांनी सर्व आरोपांचे खंडन केले आणि सांगितले की त्यांना पोलिसांकडून कोणतीही अधिकृत सूचना मिळाली नसली तरी ती प्रत्येक आरोपाला उत्तर देण्यास तयार आहे. तक्रारदाराचे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी (एबीव्हीपी) संबंध आहेत आणि ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (आरएसएस) जोडलेले आहेत. तसेच आमच्याकडे प्रत्येक आर्थिक गोष्टीचा लेख परिक्षण अहवाल उपस्थित आहे. आम्ही परदेशी देणग्या आणि सीएसआर स्वीकारत नाही. केवळ एकदाच नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून निधी स्वीकारला होता आणि त्याची लेखा अहवालात नोंद असल्याचे पाटकर यांनी सांगितले.