नवी दिल्ली : राज्यात सत्तांतर होताच आता प्रशासकीय बदल्यांच्या कामालाही वेग आला आहे. आपल्या मर्जीतला अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी फिल्डींग लागताना दिसत असून आता पीएमओ कार्यालयात काम केलेले सनदी अधिकारी श्रीकर परदेशी हे राज्यात परतले आहेत. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे, मोदींच्या पीएमओ कार्यालयात काम केलेले श्रीकर आता फडणवीसांचे प्रशासकीय शिलेदार असणार आहेत.
श्रीकर परदेशी हे काही महिन्यांपूर्वीच सिकॉमच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर रूजू झाले होते. पंतप्रधान कार्यालयात तसेच महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांत कारकीर्द गाजवलेले डॉ. श्रीकर परदेशी केंद्रातील प्रतिनियुक्तीचा कालावधी आटोपून जून २०२१ मध्ये राज्यात परत आले. त्यावेळी ‘सिकॉम’च्या व्यवस्थापकीय संचालकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. आता, राज्यात सत्ताबदल होताच, त्यांना देवेंद्र फडणवीस यांचे सचिव म्हणून कार्यभार देण्यात आला आहे.
तसेच, कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तपदी भाऊसाहेब दांगडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी ठाणे जिल्हा परिषदेच्या सीईओपदी कामकाज पाहिले आहे.