Wednesday, September 17, 2025

मुसळधार पावसामुळे रामकुंड परिसरातील सर्वच मंदिरे गेली पाण्याखाली

मुसळधार पावसामुळे रामकुंड परिसरातील सर्वच मंदिरे गेली पाण्याखाली

नाशिक (प्रतिनिधी) : शहरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रामकुंड परिसरातील सर्वच मंदिरे पाण्याखाली गेली असून, कपालेश्वर मंदिराच्या पायऱ्यांपर्यंत पुराचे पाणी पोहोचले आहे. पुराच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. गोदावरी नदीकाठी भरणाऱ्या गणेशवाडीतील फुल बाजारात पावसामुळे फुलांची आवक कमी झाल्याने आणि त्यातच उद्या गुरुपौर्णिमा असल्यामुळे फुल बाजारात फुलांचा भाव वाढलेला असल्याचे दिसून आले. सकाळी काही वेळ पावसाने उघडीप घेतली असल्याने पूर पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

दोन दिवसांपासून मुसळधार शहरात पावसाने हजेरी लावली असल्यामुळे गंगापूर धरण ह ६५ टक्क्यांहून अधिक भरले आहे. पहिल्याच पावसात एवढ्या मोठ्या प्रमाणात धरण भरलेले असल्यामुळे काल दुपारपासून धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. रात्रीपर्यंत सुमारे दहा हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्याचबरोबर पाऊसही सुरू असल्यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होत होती. यावर्षीच्या पहिल्याच पुरामुळे गोदावरी काठी असलेल्या कपालेश्वर मंदिराच्या दोन पायऱ्या पाण्याखाली बुडाल्या. तर रामकुंड परिसरातील अति प्राचीन गोदावरी मंदिरासह सर्वच मंदिरे पाण्याखाली गेल्याचे दिसून आले आहे.

गोदावरी नदीच्या काठावर असणाऱ्या बेघर तसेच अन्य लोकांना महापालिकेच्या वतीने सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. त्याचबरोबर नदीकडे येणारे मालेगाव स्टँड, इंद्रकुंड, उतार, कपालेश्वर जवळील रस्ता, गोरेराम मंदिराचा रस्ता, सरदार चौकातील रस्ता, तसेच कापड बाजार व दहिपूल या सर्व ठिकाणी महापालिकेच्या वतीने सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहेत. नदीच्या पाण्याजवळ कोणीही जाणार नाही, यासाठी खबरदारी घेण्यात आली.

नाशिक शहरात दोन दिवस धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. फुल बाजारात विक्रेत्यांची संख्या अत्यल्प दिसून आली. त्यातच उद्या गुरुपौर्णिमा असल्यामुळे फुलांचा भाव वधारल्याचे चित्र दिसून आले. रात्री उशिरापर्यंत मुसळधार पाऊस सुरू असल्याने नागरिक घराबाहेर पडले नाहीत. आज सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली होती. सकाळपासूनच पावसाने काही वेळ उघडीप दिल्याने पूर पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. अचानकपणे पूर आल्यामुळे आपले दुकाने त्याचबरोबर दुकानातील साहित्य हलवण्यासाठी व्यापाऱ्यांना मोठी धावपळ करावी लागली.

Comments
Add Comment