नवी मुंबई (वार्ताहर) : यंदा जानेवारीपासून कागदपत्रांची पूर्तता नसेल, तर दंडात्मक रक्कम वाढविण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून दंडाच्या रकमेत वाढ झाल्याने रिक्षाचालक, मालक इतर प्रवासी वाहतुकींच्या मालक वर्गाकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे सदरील वाढीव दंड टाळण्यासाठी रिक्षा-टॅक्सीचालक व मालकांनी कागदपत्रांची पूर्तता जितकी जलदगतीने करता येईल तितकी करा, असे आवाहन वाशी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी केले आहे.
केंद्र शासनाच्या परिवहन मंत्रालयाने २०२२ या वर्षाच्या प्रारंभी रिक्षा व टॅक्सीवाहनांना लागणारी कागदपत्रे अपूर्ण असतील, तर त्यावर लावणाऱ्या दंडाच्या रकमेत पाच ते दहापट इतकी वाढ केली आहे. त्यामुळे हजार रुपयांचा दंड हा दहा हजारावर गेला आहे. लायसन्स नसेल पाच हजार किंवा रिक्षा तसेच टॅक्सी चालवायला दिली असेल, तर चालकाला पाच हजार, तर वाहनांच्या मालकाला पाच हजार असा दंड भरावा लागत आहे. फिटनेस ४५००, पीयूसी १०००, इन्शुरन्स २०००,परमिट १० हजार, वाहनावर लाल प्लास्टिकची पट्टी नसेल, तर १ हजार इतकी दंड आहे. हे सर्व दर पाच ते दहा पट जुन्या दंडाच्या रकमेवर कार्यान्वित करण्यात आले आहेत.
वाशी उपप्रादेशिक कार्यालयाने शासनाने दंडाची वाढ केल्यावर तत्काळ नवी मुंबईतील रिक्षा, टॅक्सीचालक व मालकांना एकत्र घेत दंडाच्या बाबत जनजागृती केली. तसेच दंडाची कारवाई टाळायची असेल, तर कागदपत्रांचा कालावधी संपल्यावर तत्काळ रीन्यू करा, असे अनेकदा सांगण्यात आले होते; परंतु बहुतांशी चालक व मालकांनी यावर गंभीरपणे विचार केला नाही. त्यामुळे दरदिवशी ५० ते १०० रिक्षा, टॅक्सीचालकांवर दंड आकारून हजारो रुपये वसूल करण्यात येत आहे.
कागदपत्रांची पूर्तता व्यवस्थित केली, तर दुर्दैवाने अपघात झाल्यास त्यांना नुकसान भरपाई मिळेल. याची काळजी संबंधितांनी घ्यावी. सध्या सरप्राइज भेटी देऊन नियमबाह्य चालकांवर कारवाई चालू केली आहे.
– हेमांगिनी पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वाशी