Thursday, September 18, 2025

सर्वोच्च न्यायालयाकडून विजय मल्ल्याला ४ महिन्यांचा तुरुंगवास आणि २ हजारांचा दंड

सर्वोच्च न्यायालयाकडून विजय मल्ल्याला ४ महिन्यांचा तुरुंगवास आणि २ हजारांचा दंड

नवी दिल्ली : भारतातील बँकांचे कर्ज बुडवून परदेशात फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्या याला सर्वोच्च न्यायालयाने ४ महिन्यांचा तुरुंगवास आणि २ हजारांचा दंड ठोठावला आहे. न्यायालयाच्या अवमान प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. न्यायमूर्ती यू. यू. ललित यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायमूर्तींचे खंडपीठ हा निकाल दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने १० मार्च रोजी निकाल राखून ठेवला होता. ९ मे २०१७ रोजी सर्वोच्च न्यायालयाने उद्योगपती विजय मल्ल्या याला न्यायालयाच्या अवमानप्रकरणी दोषी ठरवले होते. मल्ल्याने त्याच्या मालमत्तेची चुकीची माहिती दिली होती.

विजय मल्ल्याने डिएगो डीलमधून सुमारे ४० मिलियन डॉलर त्याच्या मुलांच्या खात्यात ट्रान्सफर केले होते. जे न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन मानले गेले. यापूर्वी, न्यायालयाने आदेश दिले होते की, मल्ल्या परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारचा पैशाचा व्यवहार करू शकत नाही, असे असतानाही मल्ल्याने हे पैसे आपल्या मुलांच्या खात्यात ट्रान्सफर केले. यानंतर डिएगो डीलमधून मिळालेली रक्कम सर्वोच्च न्यायालयात जमा करावी, अशी मागणी बँकांनी केली होती.

या प्रकरणी बँका आणि अधिकाऱ्यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने १० जुलै २०१७ रोजी विजय मल्ल्याला सर्वोच्च न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाने म्हटले होते की, मल्ल्या ब्रिटनमध्ये मुक्तपणे फिरत आहे. मात्र तो तेथे काय करतो, याबाबत कोणतीही माहिती समोर येत नाही.

Comments
Add Comment