विरार (प्रतिनिधी) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर चिंचोटी, वसई फाटा आणि कामण फाटा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहने नादुरुस्त होण्यासोबतच अपघातांची शक्यता वाढल्याने या महामार्गावरील खड्डे त्वरित भरावेत, अशी मागणी वाहन चालकांकडून करण्यात येत आहे.
विरार-मुंबई-अहमदाबाद महामार्गावर घोडबंदर रोड येथे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून वर्सोवा पुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. परिणामी या खड्ड्यात अडकून अनेक वाहने नादुरुस्त होत आहेत. नादुरुस्त वाहने रस्त्यात उभी करून ठेवण्यात येत असल्याने वाहनांच्या अपघाताची शक्यता वाढलेली आहे.
या मार्गावरील चिंचोटी, वसई फाटा, कामण फाटा परिसरात मोठमोठे खड्डे पडलेले असल्याने वाहने सावकाश हाकावी लागत आहेत. परिणामी वाहनांना आपले गंतव्य स्थान गाठताना खूप वेळ जातो. विरार-मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाहन चालकांकडून मोठ्या प्रमाणात टोल वसुली सुरू असताना; रस्त्यांची मात्र दुरुस्ती होत नसल्याने वाहन चालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान; या रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवून हा मार्ग सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी वाहन चालकांकडून करण्यात येत आहे.