मुंबई : मुंबईमध्ये आज सोमवारी सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू आहे. राज्यात दिवसभर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता कुलाबा वेध शाळेकडून वर्तविण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबईत १४ जुलैपर्यंत सतर्कतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे. त्यामुळे सर्व सुरक्षा यंत्रणा, मदतकार्य, बचाव पथके सज्ज झाली आहेत.
मुंबईला रविवारी सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे रविवारी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र रविवारी संपूर्ण दिवसभर पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या, तर सोमवारी पहाटेपासूनच रिमझिम पावसाला सुरू आहे.
आज सकाळी साडेआठ वाजेपर्यंत (मागील २४ तासांत) सांताक्रूझमध्ये ९.२ मि.मी., तर कुलाब्यात ११.७ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली. सकाळी ८.३० पासून ते १०.३० पर्यंत मुंबई शहर आणि उपनगरांत ठिकठिकाणी ०.१ मि.मी. ते ५ मि.मी. दरम्यान पावसाची नोंद झाली. केवळ शीव परिसरात ५ मि.मी.पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली.
गेल्या २४ तासांमध्ये (सोमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत) मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या विहार तलावात २६ मि.मी., तुळशीमध्ये ४३ मि. मी, मध्य वैतरणामध्ये ८९ मि.मी, तानसामध्ये ६८ मि.मी., अप्पर वैतरणामध्ये ८८ मि.मी., भातसामध्ये ८९ मि.मी, मोडकसागरमध्ये ७३ मि. मी पावसाची नोंद झाली.