
मुंबई (प्रतिनिधी) : लवकरच भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात नवे पाहुणे येणार आहेत. हे नवे पाहुणे चेन्नईच्या क्रोकोडाइल, सोलापूर प्राणीसंग्रहालय आणि ओडिशातील नंदनकानन प्राणीशास्त्र उद्यान येथून मगरी आणि सुसर आणली जाणार आहे. प्राणीसंग्रहालयातील मगरी आणि सुसर यांच्यासाठी पाण्याखालील व्ह्यूइंग गॅलरी आणि डेकचे बांधकाम ६० टक्के पूर्ण झाले आहे.
सध्या प्राणीसंग्रहालयात पाच मगरी आणि दोन सुसर आहेत. प्राणीसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी सांगितले की, “आम्हाला सोलापूरच्या प्राणीसंग्रहालयातून चार मगरी मिळत असून ओडिशामध्ये जास्त संख्येने असलेल्या सुसर आणणार आहोत. १० मगरी आणि १० सुसर यांच्यासाठी प्राणीसंग्रहालयात पुरेशी जागा आहे. या अंडरवॉटर व्ह्यूइंग गॅलरीचे काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल, जे प्राणीसंग्रहालयाचे प्रमुख आकर्षण असेल.
'क्रोकोडाइल वर्ल्ड' हा प्राणीसंग्रहालयात हाती घेतलेल्या नवीन प्रकल्पाचा एक भाग आहे. ज्यामध्ये ४,००० चौरस मीटरवर पसरलेल्या पाण्याखालील व्ह्यूइंग गॅलरी बांधण्यात येणार आहे. व्ह्यूइंग गॅलरी दोन भागात विभागली जाईल. एका भागात मगरींसाठी पाण्याची व्यवस्था असेल. आवाराची दुसरी बाजू वाळू, माती आणि काही भागात झाडांसह पाण्याचे छोटे डबके यांसारख्या नैसर्गिक अधिवासाने सुसज्ज असेल. पर्यटकांना पाण्याखालील व्ह्यूइंग गॅलरीत जाऊन मगरी पोहताना पाहता येतील. शिवाय, डेकवर जाण्यासाठी पायऱ्या असतील. हे काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.