
मुंबई : शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी मेट्रो कारशेडच्या विरोधात काल आंदोलन केले होते. यावेळी शिवसेनेचे नेते आणि अनेक नागरिकांनी हजेरी लावली होती पण आदित्य ठाकरे यांना हे प्रकरण अंगलट येण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्या या आंदोलनात लहान मुले पोस्टर घेऊन सहभागी होते यामुळे राष्ट्रीय बालहक्क आयोगाने मुंबईच्या पोलिस आयुक्तांना नोटीस पाठवत चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
आरे कारशेडच्या विरोधातील आंदोलनात आदित्य ठाकरे यांनी नियमांची पायमल्ली केली आहे अशी तक्रार एका संस्थेने केली असून त्यानंतर ठाकरेंना ही नोटीस पाठवण्यात आली आहे. दरम्यान काल 'आरे बचाव' हे आरे येथील जंगल वाचवण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी आंदोलन केलं होतं. यामध्ये अनेक संस्था सहभागी झाल्या होत्या. आंदोलनात लहान मुलांना सहभागी होण्याची परवानगी नसताना लहान मुलांचा या आंदोलनात सहभाग होता.
यावर सह्याद्री राईट्स या संस्थेने आक्षेप घेत तक्रार दाखल केली होती. मुंबई पोलिस आणि राष्ट्रीय बालहक्क आयोगाकडे तक्रार दाखल केल्यावर बालहक्क आयोगाकडून मुंबई पोलिस आयुक्तांना नोटीस पाठवण्यात आली आहे. या प्रकरणी तीन दिवसांत चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची सूचना या नोटीसीत देण्यात आली आहे.