
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा पक्ष सोडून गेलेल्यांच्या परतण्याचा विचार करत नाहीत, असा टोला मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी आदित्य ठाकरेंना लगावला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेनेचे ४० आमदार फोडले. अद्यापही शिवसेनेत गळती सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी मुंबईसह राज्यभरात ‘निष्ठा यात्रा’ काढण्यास सुरूवात केली आहे. यामाध्यमातून ते शक्तीप्रदर्शन करत आहेत. मात्र त्यांच्या यात्रेला न जुमानता आता शिवसेनेचे १८ पैकी १४ खासदार फुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे भांबावून गेलेले आदित्य यांनी काल निष्ठा यात्रेच्या निमित्ताने दहिसरमध्ये बोलताना पुन्हा एकदा शिंदे गटातील आमदारांना त्यांनी मातोश्रीवर येण्याचे आवाहन केले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले बंडखोर आमदारांना जर परतयाचे असेल तर अजूनही मातोश्रीचे दरवाजे खुले आहेत, त्यांनी मातोश्रीवर यावे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घ्यावी, त्यांना माफ करण्यात येईल, असे म्हटले आहे. यावरूनच मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.
https://twitter.com/ThakareShalini/status/1546326840809164807
शालिनी ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, बंडखोर आमदारांना अगोदर डुक्कर, गद्दार अशी विशेषणे लावायची आणि मग या चिमण्यांनो परत फिरा रे... अशी आर्त हाक घालायची... पक्ष सोडून गेलेल्यांच्या परतण्याचा विचार सुद्धा न करणारे एकमेव शिवतीर्थावरील एकच ठाकरे.. राजसाहेब ठाकरे...!!, असे म्हणत शालिनी ठाकरे यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे.