फिनलँड : जर तुमच्या आत काहीतरी करण्याची इच्छा असेल तर त्यासाठी वयाची मर्यादा नसते. ९४ वर्षीय भगवानी देवी डागर यांनी असेच काहीसे सिद्ध केले आहे. ज्या वयात माणसांना नीट हालचाल करता येत नाही, त्या वयात भगवानी देवी यांनी परदेशात भारताची डंका वाजवली आहे. मूळची हरियाणाची असलेली भगवानी देवी आता वयाच्या ९४ व्या वर्षी जागतिक मास्टर्स अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण आणि दोन कांस्यपदक जिंकून जगासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
फिनलँड मध्ये सुरू असलेल्या ‘वर्ल्ड मास्टर्स अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२२’ भगवानी देवी यांनी ज्येष्ठ नागरिक गटात १०० मीटर अंतर २४.७४ सेकंदात पार केले. याशिवाय त्यांनी गोळाफेक प्रकारातही सहभाग घेतला होता. तिथेही त्यांनी कांस्य पदक मिळविले आहे. सोशल मीडियावर त्यांच्या या कामगिरीचे भरपूर कौतुक होत आहे. त्यांच्या धैर्याला आणि आत्मविश्वासाला लोकांनी सलाम केला आहे.