अनुराधा दीक्षित
‘या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता|
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः||
जी देवी सर्व प्राणिमात्रांमध्ये शक्तिरूपाने राहिली आहे, तिला माझा नमस्कार असो! ह्याच शक्तीची विविध रूपं म्हणजे दुर्गा, काली, चामुंडा, महालक्ष्मी, सरस्वती इत्यादी! बरीच रूपं ही कोणत्या ना कोणत्या दैत्यांचा नाश करण्यासाठी आणि सामान्य जनांचं, भक्तांचं रक्षण करण्यासाठी तिने घेतली! अगदी प्राचीन वेदकाळापासून ते आजतागायत कित्येक स्त्रिया रणरागिणी बनून खलप्रवृत्तीचं निर्दालन करण्यासाठी हातात खड्ग किंवा इतर अनेक शस्त्र घेऊन नीडरपणे पुढे सरसावल्या. त्यांनी शत्रूंचा नाश केला. समाजाला त्यांच्या तावडीतून सोडवलं. समाजात शांतता, सुखसमृद्धी नांदण्यासाठी प्रयत्न केले. अशी ही आदिशक्ती सृष्टीच्या निर्मितीचंही कारण बनली आहे. म्हणजेच ती साऱ्या जगताची माता आहे. जगज्जननी आहे.
माता म्हणजे मूर्तिमंत वात्सल्य! नि:स्वार्थी प्रेम! पण ती किती कठोर होऊ शकते आणि भल्याभल्यांना नामोहरम करू शकते, हेही तिने दाखवून दिले आहे. आजच्या आधुनिक युगातही हेच स्त्रीशक्तीचे रूप आपण पाहू शकतो. पण आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीने गेली कित्येक शतके केवळ भोगदासी म्हणून स्त्रीची संभावना केली. तिला हीन लेखलं, त्यामुळे स्त्रियांची प्रगती कित्येक शतकं मागे पडली. तिची प्रगती होण्यासाठी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना भूतलावर अवतार घ्यावा लागला. तेव्हा कुठे किमान भारतातील स्त्रीला तरी प्रगतीची दारं महत्प्रयासाने किलकिली झाली. पण मुंगीच्या पावलांनी का होईना, स्त्रीशिक्षण चळवळ हळूहळू बाळसं धरू लागली. तरीही विसाव्या शतकापर्यंत अगदी खेडोपाडी शिक्षण पोहोचले नव्हतेच. बाईचा माणूस म्हणून समाजात विचार केला जात नव्हता. तिला हीन वागणूक मिळत होती. तिला सर्व बाबतीत गृहीत धरलं जात होतं. आजही काही प्रमाणात ते होतंच.
‘मुलगी शिकली, प्रगती झाली’ अशी घोषणा गेल्या काही वर्षांत नेहमीच वाचायला, पाहायला, ऐकायला मिळते. आज २१व्या शतकात प्रवेश केल्यावरही अशा घोषणा द्याव्या लागतात, हीच खरी ह्या जगाची शोकांतिका आहे. ह्याला कारण गेल्या काही शतकांमध्ये स्त्रियांविषयीचा दृष्टिकोन संकुचित होत गेला. इतका की, मुलगी जन्माला येणं हा जणू घराण्याला कलंक आहे. डोक्यावर एक मोठं ओझं आहे. मुलगा हा वंशाचा दिवा इ. भ्रामक, तद्दन खोट्या कल्पना समाजमनात घर करून राहिल्या. त्यामुळे मुलीचा जन्मच नाकारण्यापर्यंत लोकांची मजल गेली. त्यातूनच स्त्री-भ्रूणहत्यासारखे प्रकार सर्रास घडू लागले, आजही घडतात. आज सरकारी धोरणांमुळे ते प्रमाण थोडं कमी झालंय एवढंच! आजही ती पुरेशी सुजाण झालेली नसताना, नवरा म्हणजे काय हे समजत नसतानाही बालविवाह किंवा अल्पवयीन विवाह केले जातात. त्याचा घातक परिणाम समाजावर दिसू लागला. मुलींच्या संख्येचे प्रमाण घटू लागले. १००० मुलांमागे ९४७ मुली असे विषम झाले. साहाजिकच पुढे मुलांच्या लग्नाचा प्रश्न निर्माण झाला. आज समाजात उलटी स्थिती दिसते. आता त्यांच्या अटी, अपेक्षा पूर्ण करणारा मुलगा मिळण्यासाठी मुलींना निवडीची संधी आहे! ह्याचे कारण गेल्या काही वर्षांमध्ये मुलींच्या घटत्या संख्येला आळा घालण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न करण्यात येत आहेत.
अगदी सरकारनेही यांची गंभीर दखल घेतल्याने २२ जानेवारी २०१५ रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ह्या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. मुलींच्या शिक्षणासाठी, तिला आर्थिक सुरक्षा देण्यासाठी अनेक योजना राबवण्यात येत आहेत. त्यामुळे मुलींच्या जन्माला येण्यासाठी प्रोत्साहन मिळाले. मृत्यूदर घटण्यास मदत झाली. खरे तर प्राचीन काळापासून कित्येक वर्षे स्त्रियांना समाजात पुरुषांइतकाच मान होता. अगदी ऋग्वेद काळातही अनेक सूक्ते स्त्रियांनी लिहिलेली आढळतात. त्याही उत्तम विद्वान होऊन स्वतःची गुरुकुले चालवित होत्या. राजसभेत, विद्वत्सभेत वादविवाद करीत होत्या. अशी उज्ज्वल परंपरा असताना, मधल्या एका मोठ्या कालखंडात देशावरील अनेक परकीय आक्रमणांमुळे स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. आज काही राज्यांमधून मुलींची विक्री होते. वेश्या व्यवसायात ढकललं जातं. किती लांच्छनास्पद आहे ना!