डॉ. लीना राजवाडे
मागील लेखात आपण पाहिले, कोणते भाव किंवा गोष्टी यांचा वजनाशी संबंध असतो. शरीरातील प्रत्येक अणू-परमाणू याचा आपल्या शरीराच्या वस्तुमानाशी संबंध असतो. ही माहिती आपल्याला असायला हवी. स्वत:चे वजन प्रमाणात ठेवायचे असेल, तर त्याबद्दल शास्त्रीय माहिती असायला हवी. त्यामुळे शरीराविषयी सजगता वाढते. पर्यायाने स्वास्थ्यही मिळवणे सोपे होते. सध्या लहान मुले, तरुण मुले-मुली, ज्येष्ठ वयोगटातील मंडळी यांच्या बाबतीत लठ्ठपणा ही समस्या बनताना दिसते आहे. जिम लावणे, डाएट प्लॅन बदलणे, वेगवेगळे पद्धतीचे मार्ग अवलंबताना मंडळी दिसतात. काहीजणांना थोडाफार फरक जाणवतो देखील, पण त्यात सातत्य राहत नाही. मग प्रश्न मनात येतो,
स्थौल्य म्हणजे नेमके काय, ते कोणत्या कारणांनी येते, त्यावर काय उपाययोजना करायला हवी. या सगळ्यांविषयी या लेखात आपण अधिक जाणून घेऊयात.
भारतीय वैद्यक आयुर्वेद शास्त्र संहितांपैकी (शरीर) काय चिकित्सा प्रधान, चरक संहितेत याविषयी खूप विस्तृत माहिती आहे. ज्या जिवंत शरीरावर चिकित्सा करायची ते शरीर कसे आहे, हे बघण्यासाठी स्वतंत्र प्रकरण आहे. आठ प्रकारचे शरीर हे निंदित किंवा उपचार करण्यास क्लिष्ट म्हणून सांगितले आहे. त्यापैकी पहिले आहे, अति स्थूल. उरलेल्या सातमध्ये अति कृश, अति उंच, अति बुटके, अति कृष्ण-अति गौर, अति लोम (लव)-अलोम (अजिबात लव नसणे) अशा शरीराची ठेवण असणाऱ्या माणसांचा समावेश होतो. या सर्व प्रकारात एकूणच शरीराचे संहनन मुळातच बिघडलेले असते. त्यामुळे त्यांना कोणताही आजार झाला, तर त्यासाठी जी चिकित्सा करू. त्याला प्रतिसाद मिळायला खूप वेळ लागतो. कष्टसाध्य अशाच गटात या व्यक्तींची गणना करावी लागते. ही गोष्ट या लेखात लिहिण्याचे कारण आपण यापैकी कुठल्या प्रकारात असलो, तर हे लक्षात घ्यावे की, आरोग्य टिकवण्यासाठी काही पथ्ये ही नेहमीसाठी किंवा कायमची पाळावी लागतील, तरच वेट गेन किंवा लॉस साधणे शक्य होईल.
पंचभूतात्मके देहे आहारः पांचभौतिकः। या सिद्धांतानुसार स्थूल व्यक्तीचे पोषणही त्याच आहाराने होते. शरीरात मात्र त्या खाल्लेल्या अन्नाचे रूपांतर मेदात अधिक करून होते. रस, रक्त, अस्थि, मज्जा, शुक्र या धातूंमध्ये कमी परिणमन होते. फाजील वाढलेला मेद हा शरीरात चरबीरूपात साठतो. परिणामी स्थौल्य येते. शरीरात चरबी वाढल्याने दिसणारे वेट गेन हे निश्चितच अयोग्य आहे.
स्थौल्याची सुरुवात होते आहे, हे पुढील लक्षणांवरून समजू शकते. स्फिक (नितंब), स्तन, उदर या ठिकाणी शैथिल्य किंवा थलथलीतपणा येतो. थोडेच काम केले तरी शरीर थकते. घाम येण्याची प्रक्रिया कमी होते. शरीराला दुर्गंध येतो. तहान, भूक वाढते. वरीलपैकी जितकी लक्षणे अधिक तेवढे स्थौल्य किंवा मेद अधिक, असे समजावे. वरील लक्षणे पुढील कारणांमुळे दिसतात - खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, व्यायामाचा अभाव, अति स्निग्ध, पचायला जड पदार्थ खाणे, अति गोड, थंड पदार्थ खाणे, दिवसा झोपणे. या गोष्टी सातत्याने घडत राहिल्या, तर आधी स्थौल्य आणि पुढे जाऊन अतिस्थौल्य येणार हे नक्की.
आजकाल आपण पाहतो, नातेवाईक, मित्रमंडळी यांना भेटायला हॉटेलिंग हाच पर्याय बहुतांश मंडळी स्वीकारतात. दिवसभर कामाचा भार, आठवडाभर त्याच रूटिनमध्ये चेंज म्हणून आऊटिंग मस्त वाटते. अशा अनेक कारणांबरोबरच रात्री उशिरापर्यंत गप्पांच्या नादात पचायला जड खूप सारे जिन्नस कधी पोटात आपण ढकलतो, आपल्यालाच कळत नाही. ही गेट टुगेदर्स आठवड्यात एकदाच म्हणजे जास्त नाही, असेही वाटणारे महाभाग खूप आहेत. त्यातही भर असते आऊटडोअर काम असणाऱ्या मंडळींच्या सबबीची. बाहेर असतो मग काय, कधी चहापाव, वडापाव, समोसा यापैकी रोज नाही, फक्त चार वेळा आठवड्यातून खातो, असेही हे महाभाग सांगतात. यात तरुणवर्ग खूप आहे. कोविडच्या लॉकडाऊन फेजमध्ये, खरं तर घरी जेवण किंवा खाण्याचे पदार्थ बनवण्याची एक चांगली सवय आपण शिकलो. आता बरेचजणांनी पूर्ववत कामे सुरू झाली या सबबीचा गैरफायदाच घेत, ती चांगली सवय विसरत आहोत, असे दिसत आहेत. महामारीतून जनजीवन सावरताना स्वजीवन विस्कळीत होईल, याकडे लक्ष दिले पाहिजे. नाहीतर स्थौल्य हे अधिक वाढतच जाईल, हे मात्र नक्की. वेळीच जागे होणे खूपच महत्त्वाचे आहे.
स्थौल्य कमी होण्यासाठी काय गोष्टी निश्चित टाळाव्या, नवे धान्य, मद्य, मांस, दही, तूप, दूध, उसापासून बनलेले पदार्थ, उडीद, गहू हे शक्यतो कमी खावे. त्याऐवजी सातू, मूग, मटकी, कुळीथ, पडवळ, आवळा या गोष्टींचा खाण्यात समावेश करावा. झोपेचे तंत्र सांभाळावे. व्यायाम, चिंतन, दीर्घ श्वसन याचा सराव हळूहळू वाढवावा. तज्ज्ञांचे जरूर मार्गदर्शन घ्यावे. जन्मत: असणारे वजन तीन किलोपेक्षा अधिक असेल, तर त्यानुसार वयाच्या सोळा वर्षापर्यंत लक्षपूर्वक बदल करायला हवेत. म्हणजे पुढे तरुणपणी अनारोग्यापासून लांब राहायला उपयोग होईल.
आजची गुरुकिल्ली -
देहवृत्तौ यथा आहारः तथा स्वप्नो सुखो मतः।
स्वप्नाहार समुत्थे च स्थौल्य कार्श्ये विशेषतः।
आपले खाण्यपिण्याच्या सवयी, आपण खातो ते पदार्थ, झोप या दोन गोष्टी जेवढ्या प्रमाणात आणि नियमित, तेवढे आपले रोजचे जीवन सुखाचे आनंदाचे होते. तेव्हा स्थौल्य कमी करायला किंवा बारीकपणाही घालवण्यासाठी झोप, आहार योग्यच हवा.
leena_rajwade@yahoo.com
(भाग-२)