Tuesday, July 23, 2024
Homeसाप्ताहिककोलाज‘के युँही नहीं खाते हम इनकी क़सम!’

‘के युँही नहीं खाते हम इनकी क़सम!’

श्रीनिवास बेलसरे

जुन्या सिनेमांची गोष्टच काही वेगळी होती. त्या काळी देशभरात जी एक स्पंदनशील (vibrant) भावनिक, सांस्कृतिक एकात्मकता विराजमान होती, तिचे हुबेहूब प्रतिबिंब सिनेमात दिसत असे. समाजावर भोगवादी पाश्चिमात्य विचारसरणीचा प्रभाव पडणे जरी सुरू झालेले होते, तरीही भारतीय संस्कृतीचे जतनही मनापासून केले जाई. त्या वेळच्या सर्व कलाक्षेत्रांत हे दृश्य होते. सिनेमाचे कथानक बंकिमचंद्र चॅटर्जी किंवा रवींद्रनाथ टागोरांसारख्या गंभीर लेखकांच्या कादंबऱ्यांवर बेतलेले असे. सिनेमात चक्क कथ्थक, भरतनाट्यम, कुचीपुडी, कथक्कली अशी अभिजात शैलीतील नृत्ये दिसत. त्या काळी कोणताही शास्त्रीय आधार नसलेली, जाणीवपूर्वक शरीराचे काही भाग दाखवण्यासाठीच बसवलेली, अत्यल्प कपड्यातील ड्रील्स, नृत्ये म्हणून खपवली जात नसत. साहित्य, संगीत नृत्य, नाट्य, अशा सगळ्या कलाप्रकारांत भारतीय संस्कृतीचे मनोहारी दर्शन होत असे. तिचा अभिमान बाळगणेही सर्वमान्य होते. त्याबद्दल (नंतर जाणीवपूर्वक विकसित केलेला) कोणताही न्यूनगंड कलाकारांच्या किंवा प्रेक्षकांच्याही मनाला शिवत नसे. त्यामुळे कथा, संगीत, गाणी सगळेच ‘आपलेसे’ वाटे. देशभरातील जनमानसात गंगा नदी हे पवित्रतेचे, शुद्धतेचे, देशाच्या एकात्मतेचे प्रतीक मानले जाई. ‘गंगा’ हा शब्द शीर्षकात असलेले कितीतरी सिनेमे येऊन गेले. अनेक गाण्यातही गंगेचा गौरवपूर्ण उल्लेख येई. गंगा ही भारतीयांची, विशेषत: उत्तर भारतीयांची, जणू अस्मिताच होती! देवी शर्मा यांनी १९६४ ला काढलेल्या ‘गंगा की लहरे’ या सिनेमाचे शीर्षकगीत मोठे कर्णमधुर होते. गाण्यात एक हाँटिंग क्वालिटी होती, त्यामुळे ते संपल्यावरही कितीतरी वेळ मनात वाजतच राहायचे. कौतुकाची गोष्ट म्हणजे गंगास्तुतीचे हे नितांत सुंदर, आशयघन गीत लिहिले होते मजरूह सुलतानपुरी यांनी! संगीत चित्रगुप्त यांचे आणि गाणे गायले किशोरदा, लतादीदी आणि कोरसमधील असंख्य कलाकारांनी! एक अंगीभूत ठेका असलेल्या या गाण्याचे शब्द होते –

मचलती हुई, हवामें छम् छम्,
हमारे संगसंग चले, गंगा की लहरे…
ज़मानेसे कहो, अकेले नहीं हम,
हमारे संगसंग चले गंगा की लहरे…

तीन देश आणि भारताच्या ११ राज्यांतून वाहत अडीच हजार किलोमीटरचे अंतर कापणारी गंगा बंगालमध्ये समुद्रात विलीन होते. तिच्या दोन्ही बाजूचा परिसर अत्यंत सुपीक मानला जातो. तिच्या पाण्याचा लाभ भारताच्या जवळजवळ ४३ टक्के लोकसंख्येला होतो. कोट्यवधी भारतीय तिला आई मानतात, तिचा उल्लेख ‘गंगामाई’ असा करतात. एवढेच काय जिथे गंगा नाही, एखादी दुसरी नदी आहे, तिथे त्या नदीलाही लोक प्रेमाने गंगाच म्हणतात. अशा या जीवनदायी अक्षर जलस्त्रोताचे स्तुतीगीत मजरूह सुलतानपुरी यांनीही तितक्याच भक्तिभावाने रचावे, हा त्यावेळी मनामनात जिवंत असलेल्या गंगा-जमुनी तहजीबचा आणखी एक पुरावा!

गंगेची नुसती उपस्थितीही किती सृजनशील असते ते एका ओळीत सांगताना मजरूहजी म्हणतात, ‘हिच्या पदराच्या छायेतसुद्धा लगेच हिरवळ बहरून येते.’ ही तर दुर्बलांना शक्ती देणारी देवीच आहे. अहो, इतक्या मोठ्या हिमालयानेसुद्धा हिचा जन्म होताच तिच्या पदकमलांना चुंबून तिला वंदन केले होते! भारतीय मानसिकतेची आस्था संभाळत केलेली केवढी चित्रमय आणि काव्यात्म शब्दयोजना!

हरियालीसी, छाँ जाती हैं,
छाँव में इनके आँचलकी.
सरको झुकाके, नाम लो इनका,
ये तो हैं शक्ति निर्बल की.
हिमालयने भी चूमे हैं इनके क़दम!

जो कुणी गंगेच्या छत्रछायेत आला, त्याचे कल्याण झालेच म्हणून समजा! अगदी मध्यपूर्वेतील लुटारू, विध्वंसक मानसिकता असलेल्या प्रदेशातून जे आक्रमक गंगेच्या आश्रयाला आले, त्यांचेही गंगामाईने कल्याणच केले. तिने दिलेल्या सुखसमृद्धीत ते इतके रमले की, आपल्या मातृभूमीकडे कधीच परत गेले नाहीत. कारण पाण्याच्या थेंबाथेंबाला मोताद असलेल्या कोरड्याठाक वाळवंटाची क्रूरता अनुभवलेल्या त्या लोकांना, निसर्गाच्या प्रेमाचे पहिले दर्शन झाले ते गंगेच्या वत्सल पाण्यातच!

मजरूहजी लोकमानसाशी किती समरस होते, ते पाहणेही मोठे रोचक आहे. उत्तर भारतात विश्वास देण्यासाठी ‘गंगेची शपथ’ घेण्याची प्रथा आहे.’ मजरूहजी म्हणतात, ‘या देवीच्या नावाचा महिमा मोठा आहे. आम्ही उगाच काही तिच्या

नावाची शपथ घेत नसतो!’
सुखमे डुबा, तनमन उसका,
आया जो इनके आँगन में.
प्यार का पहला, दर्पण देखा,
दुनियाने इनके दर्शन में.
के युँही नहीं खाते हम इनकी क़सम!

हे गाणे ऐकताना मला नेहमी वाटते की, शेवटच्या कडव्यात तर मजरुहजींनी एका फारच वेगळ्या भावनिक घटनेला स्पर्श केला असावा. गंगेच्या किनाऱ्यावर असंख्य दु:खी-कष्टी लोक येत असतात. काही तर इतके निराश झालेले असतात की, ते शांतपणे गंगामाईच्या कुशीत शिरून आपले जीवनच संपवून टाकतात. तसे पाहिले तर आत्महत्या की केवढी करुण घटना! पण कवी तिलाही किती सुंदर करून टाकू शकतो! तो म्हणतो ‘जेव्हा जवळच्या सगळ्यांनी नाकारले, तोंड फिरवले तेव्हा हीच्या लाटांनीच मला आश्रय दिला, चीरविश्रांती दिली!

साथ दिया हैं, इन लहरोंने,
जब सबने मुँह फेर लिया.
और कभी जब, गमकी जलती,
धूपने हमको घेर लिया,
तो इनकेही क़दमोंमें झुक गये हम!

हे सर्व आता सिनेमात दिसत नाही. अलीकडे एक सिनेमा आला होता, त्यात गंगेचा उल्लेख होता. मात्र त्याचे शीर्षकगीतच आजची वाताहत जाहीर करत होते. ‘राम तेरी गंगा मैली हो गयी, पापीयों के पाप धोते धोते!” काहीही असो, ज्यांनी जुनी गाणी ऐकली, गुणगुणली, त्यांच्या मनात सांभाळली गेलेली ही बावनकशी संपत्ती कधीच संपणार नाही, अगदी गंगेशपथ सांगतो!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -