Wednesday, March 19, 2025
Homeसाप्ताहिककोलाजकाळ ठरली छत्री!

काळ ठरली छत्री!

अॅड. रिया करंजकर

विश्व खूप सुंदर आहे व तेवढे चमत्कारी आहे. या विश्वामध्ये कुठे किंवा कधी काय होईल, याचा मात्र नेम नाही आणि ज्या काही गोष्टी आकस्मिक अचानक घडतात, त्याचा विचार करायला मानवाला भाग पडावं लागतं. न भूतो न भविष्यति अशा गोष्टी या विश्वामध्ये घडून गेलेल्या आहेत आणि अजून घडत आहेत. एखादी छोट्याहून छोटी गोष्ट माणसाचं आयुष्य बदलू शकतो किंवा संपवूही शकतो.

सरस्वती आणि तिचा मुलगा शरद हे दोघे कुटुंबाचे सदस्य होते. सरस्वतीच्या पतीचे निधन काही वर्षांपूर्वी झालेले होते. त्यामुळे शरदची पूर्ण जबाबदारी एकट्या सरस्वतीवर येऊन पडलेली होती. आपल्या मुलाला लहानाचं मोठं करण्यासाठी ती पती निधनानंतर दुःख उगाळत न बसता कमरेला पदर खेचून कामाला लागली. कारण, तिला जाणीव होती की, याच्यापुढे तिच्या मुलाची जबाबदारी तिला पेलायची आहे आणि समाजामध्ये आपल्या मुलाला एक चांगला माणूस म्हणून घडवायचे आहे.

म्हणून तिने समाजाची पर्वा न करता घरकाम करून आपल्या मुलाला शिक्षण देऊ लागली. हळूहळू सरस्वती आणि शरद आपल्या पतीच्या, वडिलांच्या दुःखातून बाहेर येऊ लागले व मेहनतीने आयुष्य जगू लागले. सरस्वतीने आपल्या मेहनतीवर आपल्या शरदला दहावीनंतर बारावी असं शिक्षण दिलं. शरद इयत्ता बारावी झाल्यानंतर नोकरी करून ग्रॅज्युएशन करू लागला व आपल्या आईला आर्थिक मदत करू लागला. दोघांचेही एकमेकांवर जीवापाड प्रेम होते, कारण त्यांच्या कुटुंबामध्ये फक्त ती दोघंच होती आणि शरदला आपल्या आईचे कष्ट माहीत होते. ती आपल्यासाठी किती कष्ट घेते, आपल्यासाठी किती मेहनत घेते, याची जाणीव शरदला होती. सरस्वतीचे वय झाले, तरीही ती चालत आपल्या कामाला जात असे. कधीही ती रिक्षाने गेली नाही. रिक्षाला जेवढे पैसे लागतील, तेच पैसे आपण आपल्या मुलासाठी साठवून ठेवू, हा विचार नेहमी तिच्या मनात असे.

शरदला बाईक चालवण्याची फार हौस होती. पण स्वतःची बाईक तो घेऊ शकत नव्हता. म्हणून मित्रांची बाईक घेऊन तो चालवत असेल. अजूनपर्यंत त्याने स्वतःचं लायसन्स काढलेलं नव्हतं. जेव्हा बाईक घेऊ तेव्हा आपण लायसन काढू, असा विचार तो करत होता. पाऊस-पाण्याचे दिवस होते. शरदने आपल्या मित्राची बाईक घेतली आणि स्टेशनला जातो, असं त्याने आपल्या मित्राला सांगितलं. तो बाईक घेऊन स्टेशनच्या दिशेने निघाला. त्याला रस्त्यामध्ये आपली आई घरकाम करायला चाललेली दिसली. पाऊस पडत होता आणि आई छत्री घेऊन स्वतःला आणि छत्रीला संभाळत चालताना त्याला दिसली. त्याने विचार केला की, आपण स्टेशनच्या दिशेने चाललो आहे. जाता जाता आईला आपण रस्त्यात सोडू या विचाराने त्याने आपल्या आईला हाका मारल्या आणि बाईकवर बसायला सांगितलं. सरस्वती सुरुवातीला नको नको म्हणू लागली. अरे पावसात मी पूर्ण भिजेन, त्यापेक्षा मी चालत जाते आणि त्याला मित्राची बाईक का आणलीस? म्हणूनही ओरडली. पण शेवटी मुलाच्या आग्रहाखातर ती त्या बाईकवर बसली आणि पाऊस आहे आणि आपण भिजतो म्हणून बाईक चालू असताना तिने छत्री उघडली ज्याने पावसापासून आपलं रक्षण होईल. काही अंतर पुढे गेल्यावर पाऊस आणि हवेमुळे ती छत्री वाकडी तिकडी होऊ लागली आणि तिला सांभाळताना सरस्वती चालत्या बाईकवरून खाली पडली आणि जागच्या जागी मृत्यू पावली. शरदला नेमकं काय झालंय ते कळेना आणि त्या ठिकाणी वाहतूक पोलीस होते ते आले आणि शरदला त्यांनी ताब्यात घेतलं. आपली आई जिवंत आहे की नाही, या ही गोष्टीची कल्पना शरदला त्यावेळी नव्हती. कारण त्याची पूर्ण मन:स्थिती बिघडली. शरदला पोलीस चौकीत नेण्यात आलं व सरस्वतीला पुढल्या कार्यवाहीसाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आलं. चौकशीत पोलिसांना कळलं की, शरदची ती आई होती आणि छत्रीला सांभाळताना ती खाली पडली आणि तिचा मृत्यू झाला. नंतर पोलिसांना हे समजलं की, शरद जी बाईक चालवत होता ती त्याच्या मित्राची होती. शरदकडे लायसन्स नव्हतं म्हणून शरदने मित्राची बाईक आणली होती. त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. लायसन्स नसताना तू मित्राला बाईक दिलीस कशी, हा कायदेशीर गुन्हा आहे म्हणून शरदच्या मित्रालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्या दिवशी शरदने आईला आराम मिळेल म्हणून चालत जाणाऱ्या आईला गाडीवर बसायला सांगितलं. आईने नको नको म्हणतानाही शरदने आग्रह केला म्हणून त्याची आई गाडीवर बसली आणि सरस्वतीने मात्र एक चूक केली की, चालत्या गाडीवर तिने छत्री उघडली आणि हवेमुळे ती छत्री वाकडीतिकडी होताना ती सांभाळताना गाडीवरून पडून तिचा मृत्यू झाला. यात शरदचा किती गुन्हा होता? त्याचा गुन्हा हा होता की, तो गाडी चालवत होता आणि लायसन्सशिवाय तो गाडी चालवत होता. त्याच्याकडे गाडी चालवण्याचा परवाना नव्हता आणि तीही मित्राची गाडी त्याने घेतलेली होती. नेमकी आईची चूक, शरदची चूक की कोणाची? एका छत्रीमुळे आईचा जीव गेला. आईच्या मृत्यूला कारणीभूत म्हणून शरदला पोलिसांनी ताब्यात घेतले. मित्राला चालवण्यासाठी गाडी दिली म्हणून शरदच्या मित्रालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. एका छत्रीमुळे एकाचा जीव गेला आणि दोघांना मात्र तुरुंगात जावे लागले.

पाऊस सुरू झाला की बाईकवर मागे बसलेले लोक सर्रास छत्री ओपन करून मागे बसतात. पण ती छत्री जीवावर कशी बेतू शकते, हे या प्रसंगामुळे समजले तरीही लोक छत्री ओपन करून बाईकवरून प्रवास करतात. याच गोष्टीमुळे शरदसाठी कष्ट करणारी आई शरदने गमावली आणि आपला मुलगा समाजात काहीतरी घडावा, असं वाटणाऱ्या सरस्वतीच्या मुलाला आज क्षुल्लक कारणाने तुरुंगात जावं लागलं. कधी कोणती गोष्ट माणसाचं आयुष्य बदलून टाकेल, हे सांगता येत नाही.

(सत्य घटनेवर आधारित नाव बदललेले आहेत.)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -