Tuesday, July 23, 2024
Homeताज्या घडामोडीराज्यात पुढील चार-पाच दिवस पावसाचा जोर कायम

राज्यात पुढील चार-पाच दिवस पावसाचा जोर कायम

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात पुढील चार ते पाच दिवस राज्यात पावसाचा जोर असाच कायम राहणार आहे. काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यात सर्वदूर पावसाचा जोर वाढला आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकणात घाट माथ्यावर पावसाची धुवाँधार चालू आहे. रविवारी मध्य महाराष्ट्र आणि कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी तर विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.

मुंबई शहरात पावसाच्या काही सरी बरसत आहे, उपनगर व सभोवतालच्या नवी मुंबई, ठाणे, उरण-पनवेल भागात पावसाची संततधार चालू आहे. राज्यात गेल्या २४ तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार सरींची नोंद झाली. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत जोरदार सरींमुळे महाबळेश्वर आणि वर्धा येथे १०० मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली.

आतापर्यंत सांताक्रुझ केंद्राने सरासरी १०११ मिमी आणि कुलाबा केंद्राने सरासरी १०१५ मिमी, ठाणे, बेलापूर १०४६ मिमी तर रत्नागिरी १४१० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. सध्या गुजरात ते कर्नाटक किनारपट्टीलगत समांतर हवेचा कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. त्यात मान्सूनचा दक्षिणेकडे सरकलेला आस, कमी दाबाचे क्षेत्र आणि त्याचबरोबर राज्यावर पूर्व पश्चिमी दिशेने वाहणाऱ्या परस्पर विरोधी वाऱ्याचे जोड या सर्व स्थितीमुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे.

परिणामी येत्या बुधवारपर्यंत कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात अतिवृष्टीची शक्यता आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. घाट परिसरात ही पावसाच्या दमदार हजेरीमुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामानशास्त्र विभागाने केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -