Wednesday, July 17, 2024
Homeसाप्ताहिककोलाजगुलामीचा फास

गुलामीचा फास

सोन्याचा मुलामा दिलेला परदेशी सोन्याचा पिंजरा, यात किती काळ गुलामी केली तरी पैशाचं सुख असतं का? हा प्रश्न निरुत्तरच करणारा आहे.

प्रियानी पाटील

परदेशात जाऊन पैसा कमावण्याचं स्वप्न अनेकांचं दिसून येतं. आपल्या संस्कृतीपेक्षा मोकळेढाकळेपणा असलेल्या जगातील वास्तव असेल तरी कसं याचा अनुभव परदेशात गेलेल्या व्यक्तीच सांगू शकतील. आता परिस्थिती बरीचशी बदलली देखील असेल. पण जणू सोन्याचा पिंजरा… जणू सोन्याचा मुलामा दिलेलं हे वास्तव आपल्याला जेव्हा आपल्या देशापासून साता समुद्रापल्याड घेऊन जातं, तेव्हा मायदेशापासून दूर जाणं म्हणजे काय असेल, हे ज्याचं त्यालाच कळत असेल.

सोन्याचा पिंजरा याच्यासाठी म्हणावसं वाटतं कारण, अशाच एका पुस्तकात वाचनात आलेलं… आपल्या देशापासून दूर जाणाऱ्या व्यक्तींना परदेशाचं इतकं आकर्षण होतं की, पैशाचा खणखणाट काय असतो, पैशाची चलती काय असते, ते आपल्या डोळ्यांनी अनुभवल्याखेरीज कळणार नाही. पण कटू वास्तव इतकं भयानक की, मायदेशापासून दूर गेलेल्या व्यक्तीचं आपलं मन हे आपलं राहत नाही. ते पराधीन होऊन जातं. दलाल नावाचा घटक तुमचं आयुष्य चालवतो. त्याच्या हातात तुमच्या प्रवासाची दोरी असते. तुमच्या आयुष्याची दोरी असते. तुमचं वास्तव्य… तुमची नोकरी… तुमचं राहणीमान… वागणं, बोलणं, काम करणं हे सारं गुलामासारखं होऊन जातं. कंपनीत नोकरी लावण्यापासून देशातून माणसं परदेशात नेण्यापर्यंतची सारी जबाबदारी यांच्यावर असते. कंपनीत ने-आण करण्यासाठी उत्तम सोय असली तरी जनावरं गाडीत कोंबतात, तशी ही परदेशात काम करण्यासाठी नेलेली माणसं एका वाहनात कोंबून नेली जातात आणि पुन्हा घरी आणून सोडली जातात. या माणसांचं आयुष्य जणू पराधीन होऊन गेलेलं असतं एक प्रकारे. पण नंतर मिळणारा पैसा कदाचित सुखावणारा असतो. कारण आपल्या देशातील आपल्या माणसांचं सुख या माणसांनी चिंतलेलं असतं. त्यासाठी काही करायची तयारी दिसून येते. मग ती एक प्रकारची गुलामी का असेना…

सोन्याचा मुलामा दिलेला हा परदेशी सोन्याचा पिंजरा यात किती काळ गुलामी केली तरी पैशाचं सुख असतं हा भाग निराळा असला तरी मानसिक समाधान किती मिळतं? हादेखील मोठा प्रश्न आहे. हे चित्र काही वर्षांपूर्वीचं जरी असलं तरी आता काळ बदलला असेल, असं मानायला हरकत नाही, असं म्हटलं तरी आजही अनेक माणसं परदेशाची वाट चालताना दिसतात. इथे मोठा पगार मिळत नाही, पैशाचं आकर्षण असतं. श्रीमंतीची भूल पडते… पण स्वातंत्र्याचं काय? अनेक महिलाही याला फसतात. अनेकदा मुलगा परदेशात नोकरीला म्हणून विवाह केले जातात, तर काम करण्यासाठी मुली पाहिजेत म्हणून देशातून मुली परदेशात घरकामासाठी नेल्या जातात. त्यांचं जग असेल तरी कसं? मोकळेपणा, स्वातंत्र्य मिळत असेल त्यांना,
की पैसा कमवावा म्हणून हे सारं बाजूला ठेवून गुलामासारखं आयुष्य जगावं लागत असेल?

आपल्या देशातून घरकामासाठी नेलेली महिला तसेच एका दाम्प्त्याची सुटका करून नुकतंच त्यांना भारतात आणलं गेलं. तसंच विवाह करून गेलेल्या एका नवविवािहतेला होणाऱ्या जाचापासून तिची सुटका करून तिला भारतात आणलं गेलं. नुकत्याच दोन-तीन घडलेल्या घटनांतून तरी असं जाणवतं की, कुठे आहे स्वातंत्र्य, गुलामगिरीचं हे वास्तव मानसिक त्रासाचंच तर आहे.

शिक्षणासाठी बाहेर पडणारी मुलं, नोकरीच्या निमित्ताने परदेशात जाणारी तरुणाई आपल्या देशातील संस्कार विसरत तर नसतील ना? वातावरणाशी समरस होताना इथले संस्कार, त्यांचे आई-वडील, नातेवाइकांत एक उंची इमेज बनून राहतात. पण वास्तवाचा विचार करता, त्यांच्या वागण्याबोलण्यातून आलेला हाच उंचीपणा कधीकधी आई-वडील आणि नातेवाइकांना अपमानास्पदही ठरू शकतो.

क्रुझवर अनेकदा तरुणाई पंख पसरल्यागत परदेशी वाट धुंडाळताना दिसून येते. अनेक कोर्सच्या माध्यमातून आजची पिढी परदेशाची वाट चालताना दिसते. मुलाला परदेशी पाठविण्याचं स्वप्न बाळगलेलं पालक, मुलगा कधी परत येईल, या वाटेकडे आशेने डोळे लावून बसलेले असतात. व्हीडिओ कॉलच्या माध्यमातून त्याला भेटतात. आपले
अश्रू पुसतात. हसतात, बोलतात, गोड गप्पा मारतात, आठवणींचे अल्बम बघतात. पण मुलगा कधी प्रत्यक्ष भेटेल, हे त्यांना ठाऊक नसते.

एका उदाहरणात परदेशात गेलेल्या एका तरुणाने जेव्हा तिथल्याच एका मुलीशी विवाह केल्यानंतर आई-वडिलांना अतीव दु:ख झाले. मुलीला मराठी येत नाही, ती इंग्रजीतच बोलते, याचा अभिमान असला तरी ती आपल्याशी बोलू शकत नाही, हे दुसरं दु:ख त्यांना झालेलं. तसेच मुलाने विवाहासाठी आपल्याला बोलावलं तर नाहीच, पण आता तो भारतात कधी येणार? किंवा आपल्याला तिथवर कधी नेणार? ही आस त्यांच्या मनाला लागून राहिली, ती वेगळी. ना मुलाचं आता भारतात येणं होणार, ना आपण तिथे जाणार. शेवटी ताटातूट कायमची फक्त फोनवर संभाषण हाच काय तो एक दुवा. इतकंच!

भुलभुलैयाच्या जगात पैसा फार महत्त्वाचा म्हणून कुणाच्याही बोलण्यात येऊन परदेशाची वाट चालताना, एकदा तिथली परिस्थिती समजून घेणं महत्त्वाचं आहे. तिथे जाऊन सन्मानाची नोकरी असेल तर ठीक, पण घरकाम करण्यासाठी जाताना गुलामीच्या जगात वावरताना आपण तिथे किती टिकू? त्या वास्तवाशी कसा सामना करू? एकदा तिथे जाऊन अडकल्यावर मग आपली सुटका कशी होईल? याचा विचार करण्यापेक्षा अगोदरच ही वाट किती आणि कशी खडतर आहे, हे एकदा समजून घेणं आवश्यक आहे. कारण, पैशाची आस आणि गुलामीचा फास बसण्यापेक्षा पश्चातापाआधीच ही वाट चालावी का? याचा विचार होणं गरजेचं आहे.

priyani.patil@prahaar.co.in

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -