Categories: कोलाज

मंदिर जीर्णोद्धारात काष्ठशिल्पाकृतीची गरज

Share

सतीश पाटणकर

‘मूळ मंदिर’ या संज्ञेचा अर्थ घर. मराठीत ते देवालय असाही होतो. मानवी जीवनाचे नियंत्रण करणाऱ्या, त्याच्यावर कमी-अधिक प्रमाणात प्रभाव पाडणाऱ्या अतिमानवी शक्ती म्हणजेच देवदेवता, अशा प्रकारची श्रद्धा जगातील अनेक समाजांमध्ये आढळते. या देवदेवतांचे प्रतीकरूपाने अथवा मूर्तींच्या रूपाने भाविकास दर्शन घडवणारे स्थळ म्हणजे मंदिर होय. मंदिरात दैवी शक्ती व सामर्थ्य यांचा प्रत्यय येतो, अशी सर्वसामान्य श्रद्धा असते. आठव्या-नवव्या शतकांपासून तेराव्या शतकापर्यंत शेकडो मंदिरे बांधण्यात आली. स्वाभाविकपणेच त्यात स्थल-कालानुरूप काही वैशिष्ट्ये दिसून येतात. प्राचीन वास्तुशास्त्रानुसार मंदिरशैलीच्या ‘नागर’ (उत्तर भारतीय) आणि ‘द्राविड’ (दक्षिण भारतीय) अशा दोन प्रमुख परंपरा मानल्या जातात. त्याशिवाय ‘वेसर’ नावाची आणखी एक उपशैलीही उल्लेखिलेली आहे. पण तिची लक्षणे कोणती व ती कोणत्या प्रदेशाची, हे सहजतेने समजत नाही. काही अभ्यासकांच्या मताने होयसळ मंदिरे वेसर शैलीची आहेत. पण हे एक मत आहे, प्रस्थापित सिद्धांत नव्हे.

कालांतराने मंदिर ही केवळ धार्मिक वास्तू राहिली नाही. मंदिराला जोडून मठ आले, पाठशाळा आल्या आणि ग्रंथांची भांडार आली तसेच धर्मशाळाही आल्या. मंदिर हे जसे तत्त्वचिंतनाचे, उपासनेचे, अध्ययनाचे स्थान झाले, तसेच ते त्या-त्या ठिकाणच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनाचे केंद्रही बनले. ग्रामसभा, न्यायसभा इ. तेथे होऊ लागल्या. मंदिर ही एक सामाजिक संस्था झाली. तिचा व्यावहारिक, आर्थिक आधार मात्र दानधर्माच्या स्वरूपाचा – म्हणजे राजेरजवाडे, व्यापारी व इतर धनिक मंडळींनी दिलेली दाने, जमिनींची इनामे हाच राहिला. बहुतेक देवालयांचे बांधकाम एखाद्या राजाने करून घेतले आहे, तर जीर्णोद्धार सामूहिक दानधर्मातून झालेला आहे, असे दिसून येते.

कोकण प्रदेशातील मंदिर बांधकामांसह त्यातील काष्ठशिल्पाकृती हा प्राचीन कलेचा वारसा आहे. भाविक-पर्यटक व अभ्यासकांचे ते आकर्षण आहे. पण पडझड होत चाललेल्या या काष्ठशिल्पाधारी मंदिरांची आजची अवस्था पाहून मन खंतावते. पुरातन मंदिराच्या नवीन बांधणी, नूतनीकरणाच्या नावाखाली निर्माण होत, ही मंदिरे नवीन चेहरा घेऊन उभारली जात आहेत. त्यात आकर्षकतेसह स्वयंपूर्ण सुसज्जपणाही असेल. पण पूर्वापारच्या संस्कृतीचा मापदंड ठरलेली पारंपरिक कलाकृती नामशेष होत चालली आहे. हे थांबायलाच हवे, नाहीतर आधुनिक मार्बलयुक्त, चकाचक मंदिरे उभारताना मूळच्या मंदिरावर देवदुर्लभ काष्ठशिल्पाकृती होती, हे पुढील पिढीला सांगणारी आजची जाणकार मंडळीही तेव्हा नसणार.

शिल्प वैभवात लेणी शिल्पकला संख्येने जास्त व अग्रेसर असली तरी वेगवेगळ्या प्रदेशातील सर्वधर्मीय प्रार्थनास्थळं आणि त्यातील मंदिर शिल्पकलाही वाखाणण्यासारखी आहे. प्रत्येक प्रदेशावर हजारो वर्षांपासून उभ्या असलेल्या मंदिरांवर धर्माच्या अधिष्ठानासह अनेक सत्ताधाऱ्यांच्या वैभवाने साकारलेल्या विविध शिल्पकलांचा आविष्कार नजरेत भरणारा आहे. महाराष्ट्रातील मराठवाडा – विदर्भ, खान्देश भूमीवरील जशी अजोड शिल्पाकृतीची मंदिरे आहेत, तशीच कोकण प्रांतातील मंदिरांचा कलापूर्ण ग्रामीण बाज आपले वैशिष्ट्य सांभाळून आहेत.

कोकणाला आर्थिक सुबत्तेचं पाठबळ नसेल, पण अवर्णनीय निसर्गाचं जे वैभव लाभलंय त्या पार्श्वभूमीवरची येथील मंदिरवास्तू म्हणजे हजारो वर्षांचा अलौकिक ठेवा आहे. ही मंदिरे म्हणजे समाज एकसंध ठेवण्यासाठी सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक चळवळी, उपक्रमांचे चालते-बोलते व्यासपीठ होते व आजही आहे. माणसाच्या प्राथमिक अवस्थेपासून मंदिरवास्तूचा उदय झालाय. त्यावेळी डोंगर-कपाऱ्यांतील गुहेमधून मूर्तीची स्थापना करण्याचा प्रघात होता. त्यातील गुहामंदिरांचे अवशेष आजही आढळतात. मग मंदिराशी संबंधित धार्मिक विधीसाठी तसेच भजन, कीर्तन, नर्तन, प्रवचन इ. साठी मंदिराचा परिसर विस्तारित होणं आवश्यक होतं, याची त्यावेळच्या स्थापत्यकारांना जाणीव होऊन मंदिर वास्तुकलेचा विकास झाला. त्याद्वारे मंदिरातील प्रदक्षिणा मार्गिका, प्रवेशद्वाराचा मंडप, दीपमाळ, छपरासह आकर्षक शिखर, सुरक्षित तटबंदी अशी मंदिररचना अस्तित्वात आली.

सह्याद्री पहाडावरील जलस्रोतासह वनवैभवाच्या पार्श्वभूमीवरील या मंदिर शिल्पाकृती म्हणजे धर्माचं पावित्र्य संवर्धन करून अनेक लोकोपयोगी चवळींची केंद्रस्थाने बनली आहेत. आजही ग्रामीण भागातील आठवड्याचे बाजार हे एखाद्या मंदिर परिसरात भरत आहेत. अनेक राजकीय स्थित्यंतरातून प्रवास करताना त्या-त्या राजवटीचा प्रकार जसा कोकणाच्या मंदिर उभारणीवर पडलाय. काही ठिकाणी हेमाडपंथी मंदिर वास्तूही आपलं अस्तित्व दाखवते. या वास्तुशैलीचे वैशिष्ट्य असे की, बांधकामाला पकड घेण्यासाठी चुना, मातीचा वापर केला जात नसे. बांधणीसाठी विविध कोनांच्या दगडांचा वापर केला जायचा. या दगडांना ठरावीक ठिकाणी खोबणी, खाचे तयार करून हे दगड एकमेकांत बसवून मंदिरवास्तू उभी केली जायची. सह्याद्रीच्या अजस्त्र पहाडामुळे हा भला मोठा प्रदेश कोकण आणि त्यावरील घाटमाथा हे तीन भौगोलिक विभाग निर्माण झाले. कोकणच्या सागरी भागातून येणारा माल घाटावरील बाजारपेठेत जात असल्याने त्या मार्गातील शहरवस्ती – बाजारपेठा तयार झाल्या त्या परिक्षेत्रात मंदिराची उभारणी झाली. हा काळ म्हणजे इ.स. ८ ते १३वे शतक. यातील बऱ्याच मंदिरांना धार्मिक, पौराणिक व ऐतिहासिक तसेच दंतकथांची पार्श्वभूमी लाभलीय. यातील काही मंदिरे त्यावेळच्या सत्ताधीशांच्या काळात बांधलेली आहेत. पण कोकणातील बरीच मंदिरे शिलाहार राजवटीत बांधली गेली.

कोकणातील जवळजवळ सर्वच मंदिरं परिसरातील उपलब्ध दगड आणि टिकाऊ लाकडांपासून उभारण्यात वास्तुविशारदांनी आपलं कौशल्य पणाला लावलं आहे. कोकण प्रदेशातील जवळजवळ सर्वच मंदिरांना अवतीभवतीच्या वातावरणातील निसर्ग, पाण्याचा नैसर्गिक स्रोत तसेच पशू-पक्ष्यांचा अधिवास जसा लाभलाय त्याबरोबर बऱ्याच मंदिरांच्या प्रवेशद्वारीच्या दीपमाळा हे एक खास वैशिष्ट्य आहे. दीपमाळ निर्मितीसाठी प्रामुख्याने दगडांचा उपयोग केला गेला आहे. दगडाच्या वरील भागी निमुळता होणारा स्तंभ तयार करून तो दगडी चौथऱ्यावर बसवला जातो, त्यावर दगडाचेच पद्धतशीर ठरावीक अंतरावर हात बसवून या दीपमाळा तयार केल्या जातात. कोकणातील मंदिर उभारणीत काळा दगड, जांभा दगडाप्रमाणे टिकाऊ लाकडाचा वापर करण्यात आल्याचं जाणवतं. मंदिर सौंदर्य खुलवण्यात लाकडावरील अनोखं कोरीव काम हे येथील मंदिरवास्तूचं वैशिष्ट्य आहे.

कोकणातील छोट्या-मोठ्या नगरात अनेक मंदिरांत लाकडीकामाचा कलापूर्ण आविष्कार बघायला मिळतो. मंदिरांचे लाकडी खांब, तुळया, सज्जे, दरवाजे, उत्सव प्रसंगी वापरल्या जाणाऱ्या पालख्या, मुखवटे यातून कोकणची काष्ठशिल्पाकृती दिसून येते. ही काष्ठशिल्पाकृती निर्माण करणारे कुणी तांत्रिक प्रशिक्षण घेतलेले कारागीर नव्हते, तर अंगभूत कलाकृतीद्वारे देवाच्या दारी सेवा रुजू करणारे स्वयंभू कलावंताची ही देवदुर्लभ-अजोड कलाकृती आहे. इतकंच नव्हे, तर भक्तगणांनी नवस बोलून इच्छापूर्ती झाल्यावर मंदिराला अर्पण केलेल्या अनेक आकर्षक लाकडी वस्तू म्हणजे काष्ठशिल्पाकृतीचा अनोखा खजिनाच आहे. कोकण मंदिरातील काष्ठशिल्प निर्मितीसाठी या कारागिरांनी परिसरातील सहज उपलब्ध साग – फणस – आंबा या वृक्षांच्या लाकडांचा उपयोग मोठ्या दूरदृष्टीने केला आहे. कारण, या वृक्षांचे लाकूड टिकाऊ आहे. मंदिरातील उपलब्ध जागेत काष्ठशिल्प कलात्मकरीत्या बसवण्यासाठी या अज्ञात कारागिरांनी भूमिती शास्त्राचा आधार घेतला असणार. ही काष्ठशिल्पं निर्माण करताना कारगिरांनी पारंपरिक छिन्नी, हातोडा, गिरमिट इ. साधनांचा उपयोग केलाय, हे विशेष. मंदिरातील सुशोभित काष्ठशिल्प दीर्घकाळ टिकण्यासाठी जवसाच्या तेलाचा उपयोग केला जातो.

संस्थानाची पार्श्वभूमी असलेली कोकणातील सावंतवाडी हे तर लाकडी खेळणी आणि फळाफुलांच्या प्रतिकृती बनवण्यात प्रख्यात आहे. स्थानिक लोकात या कलाकृतीला ‘चित्र’ असे संबोधतात. या प्रकारच्या काष्ठशिल्पातून स्त्री- पुरुषांच्या हुबेहूब प्रतिमा सादर करून त्याद्वारे ऐतहिासिक-धार्मिक प्रसंगीचे सादरीकरण करण्यात येथील काष्ठशिल्पकार वाकबगार आहेतच. कोकणातील बऱ्याच मंदिरवास्तूंचा आकार चौरस असा आहे.

कोकणातील सभामंडप – गाभारा दिसणारच. सभामंडपाचा विनियोग प्रामुख्याने कीर्तन, प्रवचन, भजन ग्रामसभा यासाठी होत असतो. मंदिरांच्या मजबूत लाकडी खांबावर आधारलेल्या छतावरही काष्ठशिल्पांची कलाकृती दिसते. कोकणातील सभामंडपांना भिंती नाहीत. सभा मंडपापाठोपाठ दृष्टीस पडतो तो मंडप. सभामंडप व मंडप हे परस्परांना जोडलेले असतात. मंडपाला लागूनच आधारासाठी लाकडी खांब असून प्रदक्षिणा पथमार्गिकेची योजनाही असते.

कोकणातील पुरातन मंदिरातून आढळणारी काष्ठशिल्पे ही पारंपरिक पद्धतीची अप्रतिम स्थानिक लोककला आहे. रायगडसहित रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात निसर्गासह अनोखे पारंपरिक शिल्प पाहायला मिळते. चालुक्य, शिलाहार, राष्ट्रकुट, सातवाहान आणि यादव साम्राज्याची सत्ता या प्रदेशानी दीर्घकाळ अनुभवलेली असल्याने कोकण भूमीला पुरातन इतिहास आहे. त्याचप्रमाणे उपरोक्त सत्ताधीशांच्या काळात काही मंदिरांची उभारणीही झालीय. त्यातील प्रमुख मंदिरे म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरचे व्याडेश्वर, चिपळूण नजीकचे परशुराम मंदिर, केळशीचे महालक्ष्मी देवस्थान, राजापूरचे अंजनेश्वर-कनकादित्य मंदिर; आरवलीचे आदिनारायण मंदिर व मार्लेश्वरचे मंदिर, तर आंबवचे दुर्मीळ सूर्यनारायण मंदिर… सिंधुदुर्ग जिल्ह्यातही  कुणकेश्वर,  विमलेश्वर, रामेश्वर मंदिर, वालावलचे लक्ष्मीनारायण मंदिर, आरवलीचे वेतोबा मंदिर, माणगावचे यक्षिणी ही प्रमुख मंदिरं आपला पारंपरिक चेहरा टिकवून आहेत. कोकण प्रदेशाचा विकास तर व्हायलाच हवा. याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. पण विकास साधताना इतिहास संस्कृती या पुरातन वारसा दौलतीचा ऱ्हास नव्हे. कोकणातील बऱ्याच जुन्या मंदिरांचे संवर्धन करण्यासाठी, तसेच जीर्णोद्धाराचे काम हाती घेतले जात आहे. त्याद्वारे जुन्या मंदिरानजीक नवीन मंदिर किंवा जुन्या मंदिराच्या जागेत संपूर्णत: नवीनच आधुनिक धाटणीचे मंदिर उभारताना मूळ मंदिर वारसा वास्तूसह काष्ठशिल्पाकृती नष्ट होतेय.

कोकण प्रदेशातील मंदिर बांधकामासह त्यातील काष्ठशिल्पाकृती हा प्राचीन कलेचा वारसा आहे. भाविक-पर्यटक-अभ्यासकांचे ते आकर्षणही आहे. आधुनिक चकाचक मंदिरे उभारताना मूळच्या मंदिरांवर देवदुर्लभ काष्ठशिल्पाकृती होती, हे पुढील पिढीला सांगणारी आजची जाणकार मंडळीही तेव्हा नसणार. यासाठी जीर्णोद्धार करताना भान ठेवायला हवे, हे मात्र निश्चित.

Recent Posts

Riteish Deshmukh : ‘हा’ कलाकार नदीत वाहून गेला म्हणून; रितेश देशमुखने थांबवलं ‘राजा शिवाजी’ सिनेमाचं शूटिंग

सातारा: रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आला आहे. या चित्रपटाचं शूट…

8 minutes ago

Kesari Chapter 2 : अक्षय कुमारचा ‘केसरी 2’ फ्लॉप! ६ दिवस उलटूनही गल्ला रिकामाच

मुंबई : बॉलीवूड (Bollywood) चित्रपटसृष्टीत सातत्याने नवनवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. गेल्या काही दिवसांत…

29 minutes ago

उधमपूरमध्ये चकमक सुरू, जवान हुतात्मा

उधमपूर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. यानंतर संपूर्ण जम्मू…

42 minutes ago

पाकिस्तानचे अधिकृत ट्विटर हँडल भारतात ब्लॉक

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला.…

2 hours ago

गौतम गंभीरला ISIS Kashmir ने दिली ठार मारण्याची धमकी

नवी दिल्ली : भारताच्या पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक (हेड कोच) गौतम गंभीर याला आयसिस…

2 hours ago

Health Tips: उन्हाळ्यात कशी घ्यावी त्वचेची काळजी ? जाणून घ्या

मुंबई: उन्हाळा आला की तो आपल्यासोबत अनेक आव्हाने घेऊन येतो. घामामुळे आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचेला…

2 hours ago