Monday, July 22, 2024
Homeमहत्वाची बातमीशब्द शब्द जपून ठेव...

शब्द शब्द जपून ठेव…

डॉ. वीणा सानेकर

भाषेचे उपयोजन करताना आपण शब्दांचा प्रयोग करतो. या शब्दांना ध्वनी असतो आणि अर्थही असतो. ध्वनी शब्दाचे श्राव्य रूप उलगडतो, तर अर्थ त्या शब्दाचा गाभाच उलगडून सांगतो. प्रत्येकच भाषेचा विशिष्ट शब्दसंग्रह असतो. त्यात भर पडत जाते. व्यक्ती भाषा वापरते, वाढवू शकते आणि नवे शब्द निर्माण करू शकते.

काळानुरूप नवनवे शब्द सापडत जातात. विविध भाषांमध्ये आदान-प्रदान होते. त्या एकमेकींच्या संपर्कात आल्यावर नवनवीन शब्दांची भर पडत जाते. आपल्या मराठीबाबतच बोलायचे, तर वेगवेगळ्या राजवटींच्या काळात मराठीत नवनवीन शब्द सामावले गेले. मुघल राजवट, पोर्तुगीज राजवट, इंग्रजांचा काळ यातली कितीतरी उदाहरणे सांगता येतील. आपल्या रोजच्या आहारातली वस्तू म्हणजे ‘बटाटा’. बटाटे पोहे, बटाटा वडा, बटाटा भजी हे अस्सल मराठमोळे पदार्थ असले तरी बटाटा हा शब्द पोर्तुगीज राजवटीत आपल्याकडे प्रविष्ट झाला. बिर्याणी, गझल, सलाम, मुजरा, झुमका, सलवार असे अनेक पाहुणे शब्द मराठीत रुळले. इंग्रजांच्या राजवटीत तर इंग्रजी भाषेतील शब्दांनी अक्षरश: घुसखोरी केली.

नव्या शब्दांनी भाषा समृद्ध होते नि शब्द भाषेतूनच बाद होण्यातून भाषेची हानी होते. नाणे चलनातून बाद होते तसेच शब्द वापरले गेले नाहीत की तेही त्यांचे अस्तित्व हरवून बसतात.

शब्दांचा आपण किती विचार करतो? ते योजताना, उच्चारताना, विसंवादाकरता त्यांची निवड करताना आपण त्यांचे किती भान ठेवतो? शब्द सुखावतात, दुखावतात, मन जिंकतात, समजवतात, वेदनांवर फुंकर घालतात, अपमान करू शकतात नि सन्मानही वाढवतात.

शब्दांचे सामर्थ्य कवी, कलावंतांनी किती वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त केले आहे. तुकोबांनी शब्दांची थोरवी सांगताना म्हटले,
‘आम्हा घरी धन शब्दांचीच शस्त्रे… शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू…’ शब्दांचे वैभव किती मोठे आहे, याची जाणीव पदोपदी असायला हवी खरे तर! नि आपल्या व्यक्तिगत आयुष्याच्या लढाईत शब्द आपले शस्त्र बनतात, सामाजिक लढाईत शब्द संगराचे रणशिंग फुंकतात.

बालपणी रंगीबेरंगी शंख शिंपले, मणी जमवावेत तसे आपण खरे तर शब्दही साठवत जातो. गंमत अशी की, हा साठा कधी संपत नाही.

शांताबाई शेळके यांच्या कवितांमध्ये शब्दांचे अगदी थेट संदर्भ सापडले. त्या म्हणतात, ‘शब्दांसवे मी जन्मले, शब्दांतुनी मी वाढले.’ हे शब्द शब्दांसोबत जुळलेली दृढ नाळ व्यक्त करतात. माणसाला आज आर्थिक श्रीमंती खुणावते. भौतिक उन्नतीकरता तो सातत्याने धडपडत असतो, पण शब्दांच्या श्रीमंतीचे अप्रूप आपल्याला वाटते का? कवयित्री शांता शेळके शब्दांना सार्थ उपमा देतात. शब्द म्हणजे त्यांना असा पाषाण वाटतो, ज्याच्यावर स्वत:चा कस लावून पाहायचा असतो.

‘प्रत्येक या शब्दावरी माझा ठसा,
हे शब्द माझा चेहरा, हे शब्द
माझा आरसा…’

शब्द हा चेहरा असतो. ती आपली ओळख असते आणि जे शब्द आपण वापरतो, त्यातून आपण जगाला उमगतो, म्हणजे शब्द हा आपला आरसा असतो, ज्यात आपले प्रतिबिंब लख्ख दिसते.
आयुष्यातला प्रत्येक क्षण शब्दांतून व्यक्त होतो. प्रत्येक संकट सोसायची ताकद शब्दांतून मिळते. आपल्या भाषेतल्या शब्दांचे आपल्यावर अगणित ऋण असते नि त्यातून उतराई होणे अवघड! मायभाषेतल्या शब्दांचे ऋण फेडण्याचा उत्तम
मार्ग म्हणजे त्यांचा जास्तीत जास्त प्रयोग करणे.

आपण जगताना माय-पित्याचे, गुरूचे, मायभूमीचे ऋण मानतो तसेच मायभाषेचे ऋणही आपल्यावर आहेत, ही जाणीव आपण जपायला हवी आणि म्हणूनच आपल्या भाषेशी निगडीत प्रश्न समजून घेणे, हे कर्तव्य ठरते.
माय-पित्याचे ऋण फेडण्याकरता देवळांना, शाळांना देणग्या देणे, अशा गोष्टी केल्या जातात. पण भाषेचे ऋण फेडण्याकरता काही करण्याची बांधिलकी समाजात फार दिसत नाही. शब्दांची ही बांधिलकी मनापासून स्वीकारणे गरजेचे आहे. माणसा-माणसांमध्ये जसे नाते असते, तसे शब्दांशीदेखील आपले नाते असते. विशाल सागराच्या पोटात असलेली अगणित संपत्ती जसा तो आपल्याला मुक्त हस्ताने वाटत असतो, तसा मायभाषेचा समुद्रही शब्दसंपत्ती उधळत असतो. या शब्दवैभवाशिवाय आपण कफल्लक आहोत आणि एकाकीही!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -