नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यजमान इंग्लंडला शनिवारी त्यांच्याच भूमीत मालिकेतील दुसरा टी-२० सामना पराभूत करून भारताने मालिकाही खिशात घातली. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने एक विक्रम आपल्या नावे केला आहे. रोहितने या सामन्यात केवळ ३१ धावा केल्या असल्या तरी टी-२० क्रिकेटमध्ये ३०० चौकार मारणारा रोहित पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
शनिवारच्या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने २० चेंडूंत ३१ धावा तडकावल्या. त्याने ३ चौकार आणि २ षटकार ठोकले. ३ चौकारांच्या मदतीने रोहितने टी-२० क्रिकेटमध्ये ३०० चौकार पूर्ण केले. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय खेळाडू आहे. भारताकडून अद्याप कोणीच अशी कामगिरी केली नसल्याने हा रेकॉर्ड करणारा रोहित पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे.
भारतीय संघ सध्या रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली इंग्लंडविरुद्ध टी-२० मालिका खेळत आहे. शनिवारी या मालिकेतील दुसरा टी-२० सामना झाला. हा सामना जिंकत भारताने मालिकाही आपल्या खिशात घातली. बर्मिंगहमच्या एजबेस्टन मैदानात हा सामना पार पडला.