रमेश तांबे
एक होतं पिंपळाचं झाड. ते होतं पोपटांचं गाव! तिथे राहायचे खूप खूप पोपट, इतर पक्ष्यांच्या अगदी दहापट. पिंपळावरच भरायची पोपटांची शाळा, जवळच होता पेरूचा मळा. पोपटांची असायची रोजच चंगळ. सारेच होते छान आणि मंगल!
एवढ्या मोठ्या पोपटांच्या थव्यात, एक पोपट मात्र असायचा खूपच तोऱ्यात. तो बसायचा अगदी लांब, गाणं गायचा घेऊन तान. माणसांसारखं बोलायचा छान, स्वतःला समजायचा खूपच महान. सारे पोपट म्हणायचे, ‘अरे ये ना, आमच्याशी बोल ना’ मग पोपटाची छाती उगाचच फुगायची, स्वारी आपली गप्पच बसायची. छोटे, मोठे, म्हातारे कोतारे त्याला म्हणायचे, ‘गाणं गा रे’, पण तो एक शब्दही बोलायचा नाही कुणाशी! पोपटाला झाला होता गर्व. माझ्यापेक्षा छोटे आहेत सर्व. माझं दिसणं किती छान, किती गोड माझी तान!
एके दिवशी पोपटाच्या मनात आले, अरे आपण जाऊया माणसांच्या गावात. माणूस प्राणी खूपच हुशार, तोच करील माझा सत्कार. बोलून दाखवेल त्यांना मी भाषण, साऱ्यांसमोर करीन गायन. पेपरमध्ये येईल माझे नाव, ओळखेल मला माणसांचं गाव! टी.व्ही.वर माझी मुलाखत घेतील, एक मोठा पुरस्कार देतील. पोपटाने रंगवले स्वप्न छान, गावाकडे निघाला मारीत तान. म्हातारे पोपट म्हणाले, ‘अरे बाळा, कशाला करतोस वेडा चाळा. जाऊ नको तिकडे माणसांच्या गावा, ‘धोका देणे’ हा गुण आहे माणसांच्या स्वभावात.’
पोपट हसला अन् म्हाताऱ्या पोपटांना म्हणाला, ‘आता तुमचं वय झालंय, एकाच जागी राहा बसून, मी येतो नाव कमवून! पोपट म्हाताऱ्यांना हसला, मी हा चाललो साऱ्यांना म्हणाला!’
हिरवे हिरवे पंख हलवित, पोपट निघाला ताना मारीत. गावाच्या चौकात होती गर्दी, पोपटाला होती मोठी संधी. पोपट विठू विठू बोलू लागला, गोड आवाजात लागला गाऊ. माणसे
सारी चकीत झाली. गाणं पोपटाचं ऐकू लागली. लहान मुलांनी वाजवल्या टाळ्या, गाणं ऐकून हसल्या बायका. पोपटाला वाटला खूपच अभिमान, घेऊ लागला तानावर तान!
एकजण म्हणाला, ‘हा तर आहे दैवी पोपट. दुसरा म्हणाला, ‘मला तो हवा.’ तिसरा म्हणाला, ‘मी याला घरी नेणार, पिंजऱ्यात त्याला मस्त ठेवणार.’ मग काय धावून गेले एकमेकांच्या अंगावर, पोपटासाठी उठले जीवावर. चौकात मोठा गोंधळ उडाला. ते बघून पोपटाला आनंदच वाटला. मी किती मोठा, मी किती महान त्याला स्वतःचा वाटला अभिमान! तेवढ्यात कुणीतरी दगड मारला. पोपटाच्या तो पोटात बसला. पोपट कळवळत म्हणाला, ‘अहो मला मारता काय! माझं गाणं आवडत नाही काय?’ आता मात्र पोपटासाठी झाली तुंबळ हाणामारी. पोपटाला पकडायला आणली जाळी. कुणी फेकले दगड, कुणी फेकल्या काठ्या. दोन-चार फटके पायावर, एक फटका तर बसला चोचीवर. पायातून, डोक्यातून आले रक्त, जीव वाचला फक्त. पोपट तेथून कसाबसा उडाला, दुखऱ्या पंखांनी उडत निघाला. परत आला पिंपळाच्या झाडावर. टपटप रक्त गळत होतं पानांवर. पुन्हा जमले म्हातारे-कोतारे म्हणाले पोपटाला, ‘हौस फिटली का रे? सांगितले होते तुला माणसे देतात धोका, पकडून ठेवतात पिंजऱ्यात!’
पोपटाला आपली कळली चूक, नसावी कधी प्रसिद्धीची भूक! मोठ्याचे ऐकावे मन लावून, पाऊल उचलावे सावध होऊन. जीव वाचला हे फार झाले छान, दुखऱ्या चोचीने त्याने मारली तान. तेव्हापासून त्याने ठरवले, माणसांसमोर कधी नाही गायचे. आता पोपट पिंपळावरच राहातो. गोडगोड आवाजात रोज गाणे गातो!