अमरावती (हिं.स.) : धारणी पंचायत समिती अंतर्गत असलेल्या तातरा गावातील पाणी पुरवठा विहिरीत गावातील गल्लीचे व नाल्याचे पाणी जात असल्याने पाणी दूषित होऊन जलजन्य रोगांनी पाय रोवलेले आहे. तर ग्रामसेवक म्हणता ही योजना आमची नाही, आम्ही काय करावे, अशा स्थितीत तातराचे आदिवासी पेयजल संकटाचा सामना करत असल्याने एकच खळबळ माजलेली आहे.
धारणीपासून १५ कि. मी. अंतरावरील आणि गडगा मध्यम प्रकल्पाजवळ असलेल्या ग्राम तातरा येथील पाणीपुरवठाच्या विहिरीत गावाचे घाणपाणी तथा नाल्याच्या पुराचे पाणी पोहचत असल्याने विहीर चक्क विषारी झाल्याने आदिवासी घाबरलेले आहे. गावातील सामाजिक कार्यकर्ता महेंद्रकुमार धांडे यांनी विस्तृत माहिती देताना सांगितले की, शासकीय विहिरीचे पाणी पिऊन गावात जलजन्य रोगांचा प्रादुर्भाव झालेला असताना या बाबतीत ग्रामपंचायतने हात झटकलेले आहे. तातरा गाव हे गडगा मध्यम प्रकल्पाच्याजवळ असल्याने अनेक समस्यांना झुंज देत आहे. तलावाचे पाणी गावालगत भरत असल्यामुळे अनेक शेतातील पिके ओलाव्यामुळे नष्ट होतात तर डासांचा प्रादुर्भाव होत असतो.
पाणी पुरवठा योजनेची विहीर अगदी जमिनीला लागून बांधण्यात आल्याने पुराचे अथवा गावातील सांडपाणी पण विहीरीत जात असते. यामुळे शासकीय विहीरीचे पाणी दुषित झालेले आहे तर लवकरच विषारी होण्याचा धोका होऊ शकतो. पेयजलासाठी इतर स्त्रोत बरोबर नसल्याने या विषारी विहिरीतूनच पाणी आदिवासी भरतात आता मात्र, पाणी दूषित झाल्याने आदिवासी जवळच्या शेतातील सिंचन विहिरीतून पाणी आणत आहेत.
या विहिरीतील पाणी सुद्धा अशुद्धच आहे. याविषयी ग्रामपंचायतच्या सचिवाला माहिती दिली असता योजना आमची नाही, असे बेजबाबदार उत्तर मिळाल्याने ग्रामपंचायत विरुद्ध पण आदिवासी संतापलेले आहेत. मागील वर्षी सुद्धा विहिरीच्या बाबतीत अनेक तक्रारी होत्या. थातुर-मातुर दुरूस्ती करुन लोकांचे असंतोष शमविण्यात आला होता. यावर्षी सुद्धा तीच समस्या निर्माण झाल्याने तात्काळ कारवाई करण्याची मागणी होत आहे.