अनघा निकम-मगदूम
‘कोकणात मुसळधार पाऊस पडतो’, यात बातमी ती काय? कोकणामध्ये पाऊस पडतो, तो मुसळधारच पडतो, हे त्रिकालबाधित सत्य आहे. कारण कोकण हा प्रदेश सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेला आहे, तर विशाल अरबी समुद्र कोकणचा शेजारी आहे. त्यामुळे समुद्रावरून येणारे पर्जन्य वारे हे देशात केरळ येथून प्रवेश करतात आणि महाराष्ट्रात त्यांचा तळकोकणातून प्रवेश होतो. हे मोसमी वारे सह्याद्रीच्या डोंगरकपारीमध्ये अडतात आणि कोकणात मुसळधार पर्जन्यवृष्टी होते. त्यामुळे कोकणामध्ये दर वर्षी मुसळधार पाऊस पडतो, यामध्ये कोणतीही खरंतर नवीन गोष्ट नाही. पण या मुसळधार पावसासाठी कोकण किंवा बदलतं कोकण सज्ज आहे का किंवा सज्ज असतं का?, हा प्रश्न सातत्याने पडतो आहे. बदल हा मनुष्य जीवनाचा स्थायीभाव आहे. त्यामुळे जुनं मागे राहतं आणि सातत्याने नवीन बदल होत असतात, हेही तितकेच खरे आहे. माणसाच्या जीवनातसुद्धा भौतिक बदल सातत्याने होताना दिसतात. आधुनिक प्रगती होते, तसे ते बदल कोकणामध्ये सुद्धा झाले. रस्ते झाले, पूल झाले, इमारती झाल्या. अशा वेगवेगळ्या बदलांना कोकणाने कमी-जास्त वेगाने स्वीकारलं. मात्र हे बदल करताना कोकणच्या भौगोलिक गोष्टींचा, भौगोलिक स्थितीचा, पर्यावरणीय स्थितीचा अभ्यास करून हे बदल खरंच केले गेले का? हा विचार करण्याची आजची ही वेळ आहे. कारण गेल्या काही वर्षांपासून कोकणात पडणारा हा मुसळधार पाऊस हा त्रासदायक किंवा विध्वंसक पाऊस ठरताना दिसतोय. पण पावसाने जर त्याचं स्वरूप बदललं असेल, तर त्यात खरंतर पाऊस बदनाम होतोय, असं म्हटलं पाहिजे.
कोकण हा निमुळता भूभाग आहे. सह्याद्रीच्या पायथ्याशी कोसळणाऱ्या पावसाचे पाणी नद्यांच्या रूपाने अरबी समुद्रामध्ये मिळतं. तीव्र उतार असल्यामुळे इथल्या पश्चिम वाहिनी नद्यांची लांबीसुद्धा खूप कमी असते. अशा वेळेला चिपळूणसारख्या भागामध्ये गत वर्षी महापूर आला आणि तिथले जनजीवन विस्कळीत झालं. हाहाकार उडाला आणि जे घडलं नव्हतं ते घडलं होतं. मुसळधार पाऊस पडला आणि म्हणून हा महापूर आला, असे त्यावेळी म्हटले गेले. त्याच्या आधी २०१९ मध्ये चिपळूण भागातच तिवारे हे धरण फुटलं आणि एक वाडी उद्ध्वस्त झाली. त्याच्यामुळे स्थानिकांच्या जीवनावर खूप मोठा परिणाम झाला आहे. अशा अनेक घटना गेल्या काही दिवसांपासून या कोकण किनारपट्टीवर होताना दिसतात. याला सातत्याने ‘नैसर्गिक आपत्ती’ असं नाव दिलं जातं. मात्र खरंच ही नैसर्गिक आपत्ती आहे की ही आपत्ती मानवानं केलेल्या चुकांमुळे निर्माण झाली आहे?, असा विचार आता करण्याची गरज आहे. जे बदल झाले किंवा जे बदल होत आहेत, ते बदल करताना शास्त्रीय दृष्टिकोन ठेवून, भौगोलिक परिस्थितीचा विचार करून, हवामानाचा हवामान बदलाचा अभ्यास करून बदल होणं नेहमीच गरजेचे आहे. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम वेगाने सुरू आहे. या मुंबई-गोवा महामार्गाचं चौपदरीकरण होणं ही काळाची गरज होती. कारण या मार्गांवरील अनेक वळणं, रुंदीने छोटे रस्ते यामुळे दर वर्षी या मुंबई-गोवा महामार्गावरून होणाऱ्या अपघातांमुळे हजारोजणांचे बळी जात होते. त्यामुळे हा महामार्ग हायवेच्या ऐवजी डाय-वे बनला होता. त्यामुळे २०१४ मध्ये भाजपचे सरकार सत्तेवर आल्यावर मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वेगानं हाती घेतलं होतं. सिंधुदुर्गमध्ये हे काम पूर्ण झाले सुद्धा, मात्र रत्नागिरी जिल्ह्यात त्याला स्थानिक राजकारणचा फटका बसला. अपूर्ण किंवा निकृष्ट काम हा परिणाम दिसू लागला. वास्तविक या मार्गांवरील अडचणी आणि समस्या याची संपूर्ण जाणीव स्थानिक प्रशासनाला आहे. मात्र त्यावरील उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाने उचलेली पावले उशिराने टाकली. परशुराम घाट हा या मार्गांवरील महत्त्वाचा घाट. मात्र या घाटाच्या दुरुस्तीचे काम एप्रिल महिन्यात सुरू करण्यात आले. त्यासाठी ऐन उन्हाळ्यात तब्बल एक महिना घाट बंद होता. पण तरीही म्हणावे तसे काम दृष्टिक्षेपात आले नाहीच. उलट जे काम झाले ते निकृष्ट असल्याचे पुढे आले. रस्त्यावर पडलेल्या भेगा दिसून आल्या. आंबा घाटातसुद्धा हीच स्थिती आहे. येथीलही काम अपूर्ण आहे. एकीकडे घाट रस्त्याचे काम, तर दुसरीकडे निसर्गरम्य कोकणात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होताना दिसत आहे. होणारे वृक्षारोपणाचे काम हे विशेष दिवसांकारिताच मर्यादित राहिले आहेत. याचा परिणाम म्हणून डोंगर-दऱ्यांतील माती सुटू लागली आहे. ही माती वाहून गाळाच्या रूपाने नदीत बसू लागली आहे. नदीची पात्रे विस्तारत असतानाच किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर बांधकामे होताना दिसत आहेत. यासाठी पूररेषा आणि अन्य गोष्टींचा अभ्यास अनेक ठिकाणी झालेला नाही.
या सर्वांचे परिणाम हे नैसर्गिक आपत्तीच्या रूपाने दिसत आहेत. पण ही आपत्ती मानवाच्या चुकांमुळे निर्माण झाली असून याला जबाबदार मात्र पावसाला धरले जात आहे.
खरं तर या पावसाचे महत्त्व हे जिथे आयुष्य वर्षाच्या बाराही महिने कोरडं-ठाक असतं, त्यांना विचारलं पाहिजे. इतकं भरभरून दान पाऊस आपल्याला देत असतो. पण त्याचं महत्त्व खरंच आपल्याला नाही, असे म्हणावे लागेल. निसर्गाने जे दिलं आहे, त्याचा सकारात्मक पद्धतीने स्वीकार करून आपल्या चुका सुधारल्या, तर हा पाऊस आल्हाददायी आणि सुखदायी ठरेलं, हे नक्की.
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू…
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…
मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले…
महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठ्याची कामे हाती घेतली जाणार मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतर्फे घाटकोपर (पश्चिम) येथे…
ठाणे (प्रतिनिधी) : उष्म्याने ठाणेकर भलतेच हैराण झाले असून, एप्रिल महिन्यात उन्हाचा तडाखा वाढत चालला…
सात वर्षात १ लाखांहून अधिक नवजात बालकांचे मृत्यू मुंबई(साक्षी माने) : महाराष्ट्रात मोठ्या लोकसंख्येने जागोजागी…