कलोपासक उद्योजिका – शलाका मासवकर

Share

अर्चना सोंडे

एकदा प्रचंड विद्वान असलेला एक गृहस्थ अकबर बादशाहाच्या दरबारात जातो. त्याच्या विद्वत्तेची महती सर्वत्र असते. याची विद्वत्ता तपासून पाहता येईल, असा प्रश्न विचारण्याची सूचना अकबर बिरबलाला करतो. हजरजबाबी बिरबल त्या विद्वान गृहस्थाला विचारतो की, “माणसाला समृद्ध करणारी गोष्ट कोणती? पैसा की पद?” गृहस्थ उत्तरतो, “ना पैसा, ना पद. माणसाला समृद्ध करते ती त्याची ‘कला’!” अकबर विचारतो “ते कसे काय?” विद्वान गृहस्थ सांगतो. “पैशामुळे वस्तू खरेदी करता येतात. पदामुळे दरारा निर्माण होतो. पण कलेमुळे माणूस समाधानी होतो. मग ती कला लिखाणकला, संगीतकला, चित्रकला, शिल्पकला अशी कोणतीही असेल. त्यामुळे माणूस वैचारिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या श्रीमंत होतो. येणाऱ्या पिढीला सुसंस्कृत घडवतो. अशा सुसंस्कृत पिढीमुळे एक आदर्श समाज घडतो. विभिन्न विचारांचा समुदाय कलेमुळे एकत्र येतो. त्यांच्यामुळे देश एकसंध होतो म्हणून माणसाला समृद्ध करणारी गोष्ट म्हणजे, कला.” त्या गृहस्थाचे उत्तर ऐकून अकबर बादशाह खूश होतो आणि त्या विद्वानास हिरे-रत्नजडीत मोत्यांचा हार बहाल करतो.
या गोष्टीतील कला आपल्या प्रत्येकाच्या अंगी आहे; परंतु करिअरच्या नादात किंवा परिस्थितीमुळे आपली कला कोमेजून जाते. तिने मात्र ही कला जोपासली. ती वाढवली. याच कलेला तिने उद्योगात रूपांतर केले. या कलेचे परदेशातदेखील कौतुक झाले. याच कलेने तिला उद्योजिका म्हणून नवी ओळख दिली. ती स्वत: तर उभी राहिलीच, पण आपल्यासोबत काही महिलांनादेखील तिने स्वावलंबी बनविले. त्यात एका दिव्यांग मुलीचा समावेश आहे हे विशेष. कलोपासक असणारी ही उद्योजिका म्हणजे श्रयू क्रिएशनच्या संचालिका शलाका मासवकर.

शलाकाला लहानपणापासूनच हस्तकला, चित्रकला यांची आवड होती. टाकाऊपासून टिकाऊ, कलाकुसरीच्या वस्तू तयार करणे, यांत ती तरबेज होती. तिच्या शिक्षकांनादेखील शलाकाचं कौतुक वाटे. शलाकाची आई उत्तम कलाकार होती, पण परिस्थितीमुळे त्यांची कला पुढे घेऊन जाणं त्यांना जमलं नाही. पण आईची ही कला शलाकामध्ये तंतोतंत उतरली. हा वारसा जपण्याचं तिने ठरवलं. खरंतर तिच्या आई-बाबांना तिला शिक्षक बनवायचं होतं. पण तिला त्यात आवड नव्हती म्हणून ती त्या क्षेत्राकडे वळली नाही. विरारला आंजर्लेकर नावाचे एक उत्तम डिझाईनर आहेत. ते साड्यांसाठी लागणाऱ्या डिझाइन्स पेपरवर काढत व सूरतला जाऊन तिथे त्या डिझाइन्स विकत. शलाका आवड होती म्हणून तिथे डिझाइन्स काढायला जायची.

कालांतराने तिचं पदवीचं शिक्षण पूर्ण झालं. आपली आवड जपता येईल, असं काम तिच्याकडे चालून आलं. विरारमधील नामांकित आर्टिस्ट अंजू मजेठीया यांच्याकडे ती फॅब्रिक पेंटिंगचे काम करायला जाऊ लागली. त्यांच्यासोबत काम करत असताना प्रत्यक्ष कपड्यावर (ड्रेस, दुपट्टा, साडी, शर्ट) फ्रीहॅन्ड ब्रश फिरवण्याची कला तिने आत्मसात केली. त्यांच्याकडून मिळालेला आत्मविश्वास आणि रंगाशी जुळलेलं नातं यामुळे आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर तिला खूप फायदा झाला. अंजू मजेठिया नेहमी तिला ‘माझा उजवा हात’ असंच संबोधतात. लग्नानंतर मात्र कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे तिने ते काम सोडलं.

दरम्यान तिची मैत्रिण उद्योजकीय प्रदर्शन भरवत होती. तिने शलाकाला त्या प्रदर्शनात भाग घेण्याची विनंती केली. आपल्या कलेला अनुरूप काय करता येईल, याचा विचार शलाका करत होती. तिने दिवाळीच्या पणत्यांना आपल्या कलाकुसरीने सजवले आणि त्या प्रदर्शनात मांडले. अगदी मातीच्या त्या इवल्याशा पणत्या तिच्या कलेमुळे उजळून निघाल्या. अनेकांनी त्या पणत्यांचे कौतुक केले. दिवाळीचा हंगाम नसूनसुद्धा साऱ्या पणत्या हातोहात विकल्या गेल्या. गमतीची गोष्ट म्हणजे शलाकाने लोकल ट्रेनमध्येसुद्धा पणत्या विकल्या. श्रयू क्रिएशनचा जन्म इथेच झाला.

पुढे सणासुदीचे दिवस नजरेसमोर ठेवून ती हंगामी वस्तू तयार करू लागली. दिवाळीत दिवे, हळदीकुंकूसाठी करंडे व इतर वाण, रक्षाबंधनला राख्या, रुखवतीचे सामान, घरगुती सजावटीसाठी लागणाऱ्या वस्तू अशा सुंदर सुंदर वस्तू बनवून ती विविध प्रदर्शनामध्ये सहभागी होऊ लागली. प्रदर्शनामध्ये तिच्या वस्तूंना ग्राहकांची पसंती मिळायला लागली. तिचे ग्राहक वाढू लागले. तिच्या वस्तू परदेशातही जाऊ लागल्या.

हा व्यवसाय हंगामी स्वरूपाचा होता. त्यामुळे नोकरी सांभाळून शलाका हा व्यवसाय करत होती. आपलं वेगळं अस्तित्व असावं, असं तिला नेहमी वाटे. त्यामुळे ती आपली वाट चोखाळत होती. श्रयू क्रिएशनमध्ये तिच्यासोबत दोन मुली काम करतात. त्यातील एक मुलगी ही दिव्यांग आहे, तिला घरीच बसून स्वाभिमानाने कमावलेले चार पैसे मिळावेत, यासाठी शलाका तिला मदत करते. शलाकाच्या कामातून तिला निर्मितीचा आनंद घेता येतो. समाधानही मिळतं आणि नफाही. हंगामानुसार वस्तू तयार करताना तोच तोचपणा येण्य़ाचा धोका असतो. शलाका तो धोका ओळखून नेहमी नावीन्यपूर्ण कलाकृती निर्माण करते. यामुळे तिचे ग्राहक सातत्याने वाढत आहेत.

कोरोना काळात पहिल्या लॉकडाऊनमध्ये तिने घरीच उपलब्ध असलेल्या टाकाऊ वस्तुंपासून तिने राख्या बनवल्या. सोशल मीडियाद्वारे त्यांना खूप ऑर्डर्स मिळाल्या. झेप संस्थेने त्यांना त्या अनिश्चित परिस्थितीतही कुरिअर सेवा उपलब्ध करून दिली. शलाकाने मिठाई आणि राख्या पॅकिंग करून सर्वांना अगदी वेळेत कुरिअर पाठवलं. शलाकामुळे कित्येक भावा-बहिणीला रक्षाबंधन साजरी करता आली. प्रत्येकाने फोन करून तिचे भरभरून कौतुक केले. त्यावेळी तिने तब्बल ४५० राख्या बनवून विकल्या. लॉकडाऊन काळात विद्यार्थी घरूनच शिकत होते. अशा विद्यार्थ्यांच्या शलाकाने शिकवण्या घेण्यास सुरुवात केली. शलाकाच्या शिकवण्याच्या उत्तम पद्धतीवर विद्यार्थी आणि पालक दोघेही खूश आहेत. शलाकाच्या आई-वडिलांची इच्छा होती की, तिने शिक्षिका व्हावे. एक प्रकारे त्यांचं ते स्वप्न ती पूर्ण करत आहे.

नमस्ते भारत हे सिंगापूर येथील ऑनलाइन प्रदर्शन, जागतिक व्यापार केंद्र येथील उद्योजकीय प्रदर्शन, दालन महाराष्ट्राचे प्रदर्शन यामध्ये ती सहभागी झाली. इथे मांडलेल्या वस्तूंना चांगलीच मागणी होऊ लागली. झेप संस्थेमुळे श्रयू हा लोकल ब्रॅण्ड आता ग्लोबल झाला आहे. शलाकाच्या या कर्तृत्वाची दखल घेऊन झेपने तिला आयकॉनिक वुमन अॅवॉर्ड प्रदान केले. एक सामाजिक बांधिलकी म्हणून शलाकाने दिवाळीच्या सणात आदिवासी घरांमध्ये १५० दिवे भेटस्वरूप दिले होते. एवढंच नव्हे, तर या घरांतील महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचादेखील तिचा मानस आहे. शलाकाच्या उद्योजकीय वाटचालीत झेप उद्योगिनीच्या प्रमुख पूर्णिमा शिरीषकर यांचा महत्त्वाचा वाटा आहे.

कलेची उपासना करणारी शलाका आपल्या कलेने स्वत: समृद्ध झाली आहे. सोबत ती इतर महिलांनादेखील समृद्ध करत आहे. एका आदर्श लेडी बॉसचं हे उत्तम उदाहरण आहे.

theladybosspower@gmail.com

Recent Posts

पाकिस्तानला भारताच्या प्रतिहल्ल्याची भीती!

सीमेवर हालचाली वाढल्या, गावं रिकामी केली; सैन्याच्या सुट्ट्याही रद्द... भारत हल्ला करणार या भीतीने पाकिस्तानची…

16 minutes ago

Summer Footwear : उन्हाळ्यात स्टायलिश फुटवेअर खरेदी करताना ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा

उन्हाळ्याच्या (Summer) हंगामात घट्ट शूजऐवजी सँडल (Sandals) घालणे खरोखरच आरामदायक आहे. उन्हाळ्याच्या उष्णतेमध्ये शरीराला थंड…

41 minutes ago

थरार, आक्रोश आणि अश्रूंचा डोंगर : डोळ्यासमोर गेले कर्ते पुरुष; लेले, मोने, जोशी कुटुंबांचा हृदयद्रावक अनुभव

लेले, मोने आणि जोशी परिवाराने सांगितला तिथे घडलेला सर्व थरार मुंबई : काश्मीरच्या निसर्गरम्य खोऱ्यात…

44 minutes ago

Indus Water Treaty : सिंधू पाणी वाटप करार रद्द करण्यास भारताची पूर्वतयारी!

नवी दिल्ली : मंगळवार २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे…

1 hour ago

“कटातील सर्वांना कल्पनेपेक्षा मोठी शिक्षा मिळेल” पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठा इशारा

दहशतवाद्यांचे उरलेले अड्डे नष्ट करण्याची वेळ आली आहे- पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्ली: पहलगाममधील पर्यटकांवर…

1 hour ago

अतिरेक्यांची माहिती द्या, वीस लाख रुपये मिळवा

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पहलगाम…

3 hours ago