हले डुले… हले डुले… पाण्यावरी नाव,
हले डुले… हले डुले… पाण्यावरी नाव…
पैलतीरी असेल माझ्या राजसाचा गाव,
पैलतीरी असेल माझ्या राजसाचा गाव…
प्रा. प्रतिभा सराफ
हे गदिमांचं गाणं मला खूप आवडतं. अंताक्षरी खेळताना ‘ह’ अक्षर आलं की, मी हमखास हेच गाणं पहिले म्हणते.
हे गाणं सादर होताना ती ‘नाव’ मात्र चारी बाजूंनी कसून बांधलेली होती, असे काहीसे त्या चित्रीकरणाच्या वेळेसची कथा मी ऐकली आणि वाटून गेले की, त्या सिनेमातल्या नायिकेलाही माझ्यासारखीच भीती वाटत असेल का पाण्यात बुडण्याची?
सर्वात स्वस्त प्रवास हा बोटीतून पाण्यामार्गे होतो, हे शाळेत असताना शिकले होते. पण सर्वात जास्त भीती याच प्रवासाची वाटायची. ही बोट बुडण्याची गोष्ट कोणत्याही रस्त्यावरच्या अक्सिडेंटपेक्षा काहीतरी भयानक आहे, असे वाटायचे. याचे मुख्य कारण म्हणजे मला अजिबात पोहता येत नव्हते. (म्हणजे आजही येत नाही, ही गोष्ट वेगळी!)
कधीतरी शाळेत आलेल्या प्रमुख पाहुण्याने व्याख्यानादरम्यान सांगितलेल्या गोष्टी आठवायच्या. ‘जयंती’, ‘तुकाराम’, ‘रामदास’ नावाच्या बुडलेल्या बोटींची कहाणी मनावर भीतीचे सावट कायमचे पेरून गेली होती. या धर्तीवर तरुणपणी ‘टायटॅनिक’ चित्रपट पाहिला आणि त्या सावटाने मनाच्या आत रौद्ररूप धारण केले. अशा पार्श्वभूमीवर माझ्या मैत्रिणींनी मुंबईजवळ बोटीनं ‘एलिफंटा बेटावर’ लेणी पाहायला जायचं ठरवलं, तर मी साफ नकार दिला. पण तरीही पाण्याचे कायमच मला आकर्षण राहिले. नदीकिनारे, समुद्रकिनारे मला आकर्षित करायचे. तिथे सहलीला जाण्याची संधी मी कधी दवडली नाही. ‘गेटवे ऑफ इंडिया’वरून दूरवर खूप सारे दिवे असलेली जहाजं पाहताना ते दृश्य पूर्वी मी डोळ्यांत साठवून ठेवायचे आणि आता मोबाइल कॅमेरात साठवून ठेवते. माझ्या एका मैत्रिणीचे डोहाळेजेवण त्यांच्या घरच्यांनी हौसेने जहाजावर केले होते. साहजिकच मी त्याला उपस्थित राहिले नाही. आम्ही गोव्याला गेलो होतो, तेव्हा संपूर्ण समूहाने जहाजावरून फेरफटका मारला. पण मी मात्र किनाऱ्यावरच थांबले होते, याबद्दल सगळ्यांनी माझी खूप थट्टाही केली होती. असो! असेच एकदा गणपतीपुळ्याला गेलो होतो. समुद्रकिनाऱ्यावर बसल्यावर मला हमखास आठवतं ते गाणं म्हणजे-
गोमू माहेरला जाते हो नाखवा,
तिच्या घोवाला कोकण दाखवा…
भव्य समुद्रात एका होडीनं जाणारा तरुण राजबिंडा रमेश देव आणि त्याची पत्नी जयश्री गडकर. त्यांची ती होडी पाहून प्रत्येकालाच त्या तशाच होडीनं कोकणात फिरण्याचं आकर्षण वाटणं स्वाभाविकच आहे. गदिमांनी लिहिलेल्या या गाण्याला दत्ता डावजेकर यांनी संगीत दिलं आहे, तर ते चक्क गायलं आहे पंडित अभिषेकीबुवांनी! पण मी मात्र दुधाची तहान ताकावरच भागवते, या गाण्याला टीव्हीवर पाहून!
खरं तर समुद्रात असे अनेक जीव आहेत, ज्यांच्या शरीरात प्रकाश निर्माण होतो. समुद्रात डाइनोफ्लॅगेट्स नावाचे जीव असतात. हे जीव रात्रीच्या अंधारात निळा प्रकाश फेकत असतात, हे जीव कॅरेबियन देशांतील समुद्रकिनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर दिसतात, हे मी डिस्कव्हरी चॅनलमध्ये पाहिले होते. एकदा मित्र-मैत्रिणींच्या समुहाबरोबर आम्ही ‘तारकर्ली’ येथे गेलो होतो. तेव्हा ते सगळेच ‘स्कुबा डायविंग’ करत समुद्राच्या तळाशी जाऊन प्रवाळाची बेटे पाहून आले आणि आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात त्या प्रवाळांच्या आसपास फिरतानाचे त्यांचे व्हीडिओ आणि फोटो पाहून मी अवाक झाले. शिवाय रंगिबेरंगी चकचकीत झूपझूप करत आजूबाजूला फिरणारे मासेसुद्धा या व्हीडिओत बंदिस्त झाले होते. निळा प्रकाश फेकणारे जीव असो, प्रवाळ असो वा हे सुंदर रंगीत चकचकीत मासे प्रत्यक्ष पाहण्यातच खरी मजा असेल ना. असो! त्यामुळे अशा सगळ्या गोष्टींना मी नेहमीच मुकले.
मला माहीत नाही की, मला केव्हा जहाजातून जाण्याची भीती कमी होईल; परंतु तूर्तास मात्र हा लेख संपवण्याच्या आधी मला लहानपणी ऐकलेली एक कथा आठवते – एक माणूस भर उन्हाळ्याच्या दिवसात प्रचंड मोठे जहाज बांधत होता, तेव्हा सगळी माणसं त्याच्याकडं विक्षिप्त नजरेनं पाहत होते. त्याच्या या कृतीसाठी हसत होते आणि मग अचानक पाऊस सुरू झाला, पूर आला आणि सगळी माणसं त्या जहाजात स्वसंरक्षणार्थ गेले, अगदी प्राणी-पक्षी-कीटकसुद्धा! जर खरोखरीच असं आताच्या काळात घडलं, तर मी जाईन अशा जहाजात? तरंगेन का पाण्यावर? असं होईल का? जहाजाच्या आतून ‘हले डुले हले डुले पाण्यावरी नाव…’ हे गाणं माझ्या आपसूक ओठावर येईल का? की माझा बीपी वयपरत्वे वाढेल?