अनुराधा परब
अथर्ववेदाच्या बाराव्या काण्डातील पृथ्वी सुक्तामध्ये “माता भूमिः पुत्रोsहं पृथिव्याः|” असा श्लोक आहे. भूमीला ‘माता’ म्हणत समस्त मानवजात ही तिची लेकरे आहेत, असा याचा अर्थ आहे. “समुद्रवसने देवी पर्वतस्तनमण्डले| विष्णुपत्नि नमस्तुभ्यं पादः स्पर्शं क्षमस्व मे||” या भूमिवंदनाच्या श्लोकामध्येदेखील झोपेतून उठल्यानंतर जमिनीवर पाय ठेवण्यापूर्वी भूमिदेवतेची क्षमा मागितली गेली आहे.
धरणीला आईचे स्थान आणि सन्मान तसेच तिच्याविषयीचा आदर, श्रद्धा आणि ऋण यांना लोकमानसामध्ये प्राचीन काळापासून विशेष महत्त्व असल्याचे श्लोकांतून प्रत्ययाला येते. संस्कृतमध्ये पृथ्वीला ‘भूमी’ किंवा ‘भू देवी’ असा वैकल्पिक शब्द दिलेला आहे. दशावतारामध्ये वराहरूपी विष्णूने हिरण्याक्ष राक्षसाच्या कैदेतून सोडवत पृथ्वी – भूमातेला आपल्या सुळ्यांवर उचलून किंवा तोलून धरल्याची कथा सर्वांनाच ठाऊक आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील सातेरी अर्थात ‘भूमका’ देवतेचा विचार करावा लागेल.
परशुरामाची माता रेणुका ही मूळची पृथ्वीदेवता असल्याचे तसेच तिचा समावेश ग्रामदेवतांमध्ये होत असल्याचे आपण पाहिले. अन्नधान्य देणारी, समृद्धी आणणारी, संकटांपासून रक्षण करणारी भूदेवता या दृष्टीने ती लोकमानसामध्ये उपासना दैवत ठरलेली आहे. या गुणवैशिष्ट्यांतूनच ग्रामसंस्कृतीमध्ये वारुळाची पूजा, नांगरटीपूर्वी भूमीची पूजा, नवान्नाची पूजा, वास्तू बांधणीपूर्वी भूमीचे पूजन या उपासना पद्धतींची रचना झालेली आहे. मातीविषयीचा कृतज्ञभाव, आदर, श्रद्धा यांतूनच ही उपासना आजवर अव्याहत चालत आलेली दिसून येते. वारुळाच्या पूजेला मोठ्या प्रमाणावर स्त्रियाच का जातात, या प्रश्नाचे उत्तर भारतीय कृषिसंस्कृतीत दडलेले आहे. पुरातत्त्व शास्त्रातील संशोधन असे सांगते की, शेतीचा शोध स्त्रीने लावला. हे मान्य केले, तर कृषिविषयीची सर्व कामे, तंत्र हे स्त्रीचे क्षेत्र असणे अतिशय स्वाभाविक ठरते. या कृषीला पूरक असे जे प्राणिजीवन आहे. त्याविषयीचा तसेच मातीविषयीचाही कृतज्ञभाव भूमीपूजा, वारूळपूजा, नागपूजा यांसारख्या विधी-रुढींमधून आकाराला येणेदेखील तितकेच स्वाभाविक वाटते.
वारुळाला सर्जन, जननशक्तीचे प्रतीक म्हणूनच आदिमकाळापासून पूजले गेले आहे. वेदांतील काही ऋचा या जननशक्तीची स्तुती करणाऱ्या आहेत. हे संशोधक, कोशकार डॉ. सदाशिव डांगे यांनी दाखवले आहे. कोकणात सातेरीला ‘भूमिका’ असेही म्हटले जाते. रेणुका-भूमिका-भूमका या स्त्रीलिंगी नामांमध्ये प्रकृतीच्या ठिकाणी असलेली प्रजननक्षमता / उत्पादनक्षमता, सुफलनता, भौतिक समृद्धी, लौकिकार्थाने सुख संपन्नता देण्याची वृत्ती एकसारखी आहे. हेच एकत्व लोकसंस्कृतीमध्ये भूमी आणि स्त्री यांत एकवटलेले आहे.
‘सातेरी’ या शब्दाच्या दोन व्युत्पत्ती सांगितल्या जातात. पैकी एक सातेर म्हणजे वारूळ आणि दुसरी व्युत्पत्ती सात+ तेरी किंवा स्तर, कप्पे किंवा पदर असलेले वारूळ असा एक अर्थ समोर येतो. ‘तेरी’ शब्द कानडी असून त्याचा अर्थ ‘फणा’ असा आहे. द्रविड संस्कृतीचा कोकणातील संस्कृतीशी साम्यभाव पाहता, हा अर्थ अधिक जवळचा वाटतो. नाग हा संतानदाता आहे, तो आदिपुरुष आहे. यासारखे समज लोकमानसामध्ये नागाविषयी रूढ आहेत. लोकपरंपरांतून चालत आलेल्या धारणा, त्यातून निर्माण झालेली प्रतीके, पूजाविधी ही लोकसंस्कृतीची वैशिष्ट्ये मानली जातात. सातेरी आणि नागाच्या अन्योन्य संबंधातून पुरुष आणि प्रकृती यांचे सुफलनाच्या दृष्टीने सूचनच होताना दिसते. सातेरीलाच ‘पूर्वी’ असे म्हणण्याचीही लोकपरंपरा आहे. ‘पूर्वी’ या शब्दातून ग्रामदेवतेचे प्राचीनत्त्व, मूळ रूप सांगण्याची पद्धत रूढ असावी. या विषयीचे स्पष्टीकरण असे सापडते की, देवाने घेतलेली पहिली भूमिका म्हणजे प्रकृती किंवा माया. याअर्थी सातेरी भूमिका, भूमका, पूर्वी अशा वेगवेगळ्या नावांनी सामोरी येते. बारा पाचाच्या संप्रदायामध्ये हिला “पूर्वसत्ता स्थळ” म्हटलं गेलं आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सातेरीची मंदिरे सर्वाधिक असून त्यातील काही मंदिरांमध्ये वारुळाबरोबरच देवी म्हणून मूर्तीचीदेखील पूजा केली जाते. वेंगुर्ला तालुक्यातील मातोंडच्या सातेरी माऊलीची लोटांगणाची जत्रा प्रसिद्ध आहे. कार्तिक शुद्ध पौर्णिमेला होणाऱ्या वार्षिकोत्सवाच्या दिवशी मंदिराभोवती सातेरीला नवस करणारे भाविक लोटांगण घालतात, अशी प्रथा आहे. या मंदिराच्या गाभाऱ्यात वारूळ आहे. कुडाळ पावशी येथील मंदिरात सातेरीचे १५ फूट उंच वारूळ व त्यापुढे देवीची मूर्ती आहे. वैशाख महिन्यात पावशीला निळीचा वार्षिकोत्सव साजरा होतो. या दिवशी पेजेमध्ये नीळ मिसळून त्याचे लेपन वारुळावर केले जाते. सातेरी देवीविषयीची आख्यायिका पावशी, मातोंड वगैरे ठिकाणी प्रचलित आहेत. मालवण तालुक्यातील देवली, पेंडूर इत्यादी गावीही वारूळरूपी सातेरीची मंदिरे प्रसिद्ध आहेत.
लोकसंस्कृतीमध्ये सुरुवातीला ग्रामदेवता आकाराला आल्यानंतर त्यांच्या पूजेचे विधी अस्तित्वात आले आणि त्यानंतर हे विधी कुणी व का, कशासाठी करावेत, याची कारणे म्हणून त्या संदर्भातील कहाण्या, आख्यायिका, कथा निर्माण झाल्या, असे मिथकशास्त्र सांगते. अशा प्रकारच्या कथा देवतेच्या महात्म्यासोबतच स्थानाचे महात्म्यदेखील वाढवताना दिसतात. कोकणात देवतांसमोर घातल्या जाणाऱ्या गाऱ्हाण्यामध्ये “अनादिकालापासून चालत आलेला मार्ग असेल त्याप्रमाणे कार्य घडवून घे,” अशी केली जाणारी विनवणी देवतांच्या प्राचीनत्त्वाविषयी सहज सांगून जाते. बारा पाचाचा संप्रदाय, वेताळ – सातेरी – रवळनाथ वगैरे ग्रामदेवता तसेच तरंग किंवा खांब ही कोकणाची ओळख प्राचीन काळापासून होती. त्याच्या मूळच्या स्वरूपात, आचारात कालपरत्वे भर पडत जाऊन त्यांना आजचे रूप प्राप्त झाले आहे; किंबहुना इथल्या देवतांचे मूळ हे वसाहतींइतकेच प्राचीन असल्याचे मत पु. रा. बेहेरे यांनी व्यक्त केलेले आहे.