Monday, July 22, 2024

कम्फर्ट

माधवी घारपुरे

”तूला सांगते राधे, दोन दिवसांपासून आराम नाही.” सीमा सांगत होती.

“आराम नसायला झालं काय गं!” राधा वैतागून म्हणाली.
“परवा दिवशी, घरकामवाली नाही. काल भांडीवाली नाही आणि आज पोळीवाली नाही. आता बोल.”

“सीमा, तू घरकाम केलंच नसशील. काल डिशवॉशर लावला असशील आणि आज रोटी मेकर आहेच. फक्त सतीशला आवडत नाही म्हणून ४ पोळ्या केल्या असशील. तो सकाळी गेला की रात्रीशिवाय येत नाही, मग तुला दमायला झालं काय? काही काम करत नाहीस आणि हजारो रुपये देऊन जीमला जातेस. जीमला न जाता केर काढ आणि लादी पूस. कशाला हवी ती जीम? पण केर काढायचा, तर नवीन यंत्र आणलंय ना साहेबांनी! कानाकोपऱ्यात जाऊन केर काढतं आणि परत बिचारं आपल्या आपल्या जागी बसतं. सीमा तुला कम्फर्ट किती हवा अजून?”

“तुला सारख्या माझ्या सोयीच दिसत असतात का गं?”
“रागावू नको. मला आनंद आहे तुझ्या वैभवाचा! आपले कॉलेजचे दिवस आठव. सकाळी आपले कपडे धुवून, वाळत टाकून चालत कॉलेजला जात होतो, कारण आईला त्रास नको म्हणून. येताना भाजी आणायचो. आईला लांब जायला नको म्हणून. वॉशिंग मशीन नव्हते. मिक्सर नव्हता तरी आपण आनंदी होतो. या कम्फर्टच्या पायात आपण ऐदी बनायला लागलो. चांगल्या नोकऱ्या, चांगले पगार मिळायला लागले. आता वॉशिंग मशीन या वस्तू गरजेच्या झाल्या. मान्य आहे मला आपला वेळ आणि श्रम दोन्ही वाचतात. पण आपण अवलंबून राहायला लागलो ते मात्र चूक वाटतं मला. त्यामुळे तब्येती अधिकाधिक बिघडू लागल्या…”
“राधे तुला सांगायचं राहिलं. सतीशनं माझ्यासाठी पॉवर स्टेअरिंगवाली गाडी बुक केली आहे. जांभळा कलर.”
“तुझी कटकट सुरू झाली असणार. मग काय राणीसाहेबांसाठी लगेच कम्फर्टेबल गाडी बुक झाली. हो की नाही? अभिनंदन!”
“तू मनकवडी आहेस राधे, मी पण विचार करतेय तुझं म्हणणं खरं आहे. कम्फर्ट मिळायला लागला की, अजून
हवासा वाटतो.”
“तू हसशील मला. पण पूर्वी बघ आपण चाळीत कॉमन टाॅयलेटमध्ये जायचो. पुढे पुढे वाडे आले. नंतर ब्लॉकमध्ये घराबाहेरचे टॉयलेट घरात आले. टॉयलेट बाथरूम अॅटॅच्ड झाले, पण घरातलीच माणसं सुपरेट झाली.

माणसाला निसर्गता कम्फर्टची सवय कशी लागते, याची गंमत विचारांती लक्षात येते. परवा आजीला ताईने मोठ्या अक्षरांतली ज्ञानेश्वरी दिली. तिने ती उचलून बाळाला लावली. कालच गाणगापूरचा अंगारा, फोटो, प्रसाद आला. कपाळाला लावला. आता मला सांगा, माऊलीसाठी आपण डोके खाली टेकायचे की, पोथीला वर आणायचे? पादुकांच्या फोटोवर माथा टेकायचा की माथ्यापर्यंत फोटो आणायचा? नकळत घडणारा हा आरामदायी भाग आहे. पंढरपूरच्या पांडुरंगाची पावले वर आणता येत नाहीत. माऊलीच्या पादुका उचलता येत नाहीत म्हणून आम्ही डोके टेकवतो. नाहीतर त्या पादुकांना पण वर आणायला आणायला कमी केले नसते. आज आम्ही कपडे खरं ८० टक्के लोक हाती धुवत नाही. कमरेला व्यायाम नाही, पाटा-वरवंटा वापरत नाही. दंडाला व्यायाम नाही, चुकूनही जात्याला हात लागत नाही. पाणी भरणे नाही त्यामुळे कमरेवर कळशी घेणे माहीत नाही. परवा तर मुलीने विचारले, “आई बंब म्हणजे काय? तो पेटवायचा कसा? बंबाचा झारा म्हणजे काय?” बंब म्हणजे अँटिक पीस झालाय. वास्तविक मी हे सारं लिहिते आहे म्हणजे शिळ्या कढीला ऊत आहे, पण तो यायलाच हवा नाहीतर आमच्याकडे फाइल्स जमतात त्यात भर पडेल. कमरेची फाइल, गुडघ्याची फाइल, हार्टची फाइल, डोळ्यांची… आपल्या अवयवांचे महत्त्व फक्त श्लोकातच राहील. बघ,

डोळ्यांनी बघतो, ध्वनि परिसतो, कानी पदी चाल,
जिव्हेने रस चाखतो मधुरही, वाचे आम्ही बोललो,
हाताने बहुसाल काय करितो विश्रांती ही घ्यावया,
घेतो झोप सुखे फिरतो उठतो ही ईश्वराची दया…

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -