चंद्रपूर (हिं.स.) : भारतीय हवामान खात्याने चंद्रपूर जिल्ह्याकरिता १० ते १२ जुलै या दिवसांसाठी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून ”रेड अलर्ट” जारी केला आहे. या कालावधीत जिल्ह्यात एक-दोन ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसासह व विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनांचा इशारा दिला आहे.
तसेच जिल्ह्यातील धरणांची पाणी पातळी देखील वाढत असल्यामुळे नागरिकांनी विशेषत: शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. धरण क्षेत्रात पडणारा पाऊस व आजूबाजूच्या क्षेत्रातून धरणात येणाऱ्या पाण्याच्या आवाकामुळे पूर परिस्थिती लक्षात घेता मोठ्या धरणाचे वक्रद्वार (गेट) केव्हाही उघडण्यात येऊ शकतात.
दारे नसणारे धरणातील पाणीसाठा शंभर टक्क्यांपेक्षा जास्त झाल्यावर नदी नाल्यातून पुराचे पाहणी वाहणार असल्याकारणाने नदीकाठावरील सर्व नागरिकांनी व शेतकऱ्यांनी शेतात लागणारे यंत्र (अवजारे) तसेच जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची तयारी करून ठेवावी.
तसेच नदीच्या काठावरील गावातील नागरिकांना नदीपात्रातून आवागमन करणाऱ्या सर्व संबंधितांनी स्वतःची काळजी बाळगावी असे प्रशासनाने स्पष्ट केले.