डॉ. विजया वाड
बाबू, मंजूचं घर बघायचं नाही का?” बाबूला वाटेवर मंजूनं विचारलं. दोघे ऑफिसातून परतत होते.
“बघायचं ना.”
“मग चल आत्ताच.”
“आत्ता? नको नको मंजू. माझी मानसिक तयारी नाही.” मंजूस बाबू निकराने म्हणाला.
“अरे चल मानसिक तयारी बियारी कसली आलीय?”
“तरी पण.” बाबू कां कू करू लागला. मंजूची नजर बघून गारच झाला. गार आणि तरुणपणाच्या कैफानं गरम. त्या गार-गरमचा विलक्षण ताप बाबूला होऊ लागला.
“घरी मी एकटीच असते.”
“आई?”
“ती माझ्या मावशीकडे गेलीय. राहील २-४ दिवस.”
“मग चल, मी येतो.”
“आता कसं?” मंजूनं चिडवलं. पण तो चिडला नाही. धीट झाला.
“एकटं एकटं… बेस्ट.” मंजूला डोळे बारीक करीत बाबू म्हणाला.
“मी तुला मर्यादा ओलांडू देणार नाही.”
मंजू करारी झाली.
“मला घायकूत नाही. भरपूर धीर आहे.”
“बाबू, रिक्षाने जाऊ.” ती निर्णायक सुरात म्हणाली. रिक्षात बसली. प्रतिक्षिप्त क्रियेने बाबू बसला. तिच्या शेजारी. मांडीला मांडी घासेल इतक्या जवळ ती सरकली. बाबूचा विरोध नव्हताच.
“मंजू, मला धीर निघत नाही बघ.”
“तरुणपणी अधीर व्हायला होतंच.”
“तुला अधिकारवाणी दिली का गं बाप्पानं?”
“बाबू, मंजूपण ‘असली’ तरुण आहे. म्हातारी नाही.”
बाबू मांडीला मांडी घासणाऱ्या मंजूच्या
धिटाईपुढे नरमला.
“मंजू, बाबूला घाई सुटलीय. कधी एकदा तुझं घर येत असं झालयं मला.”
“घरी गेल्यावर शांतपणे चहापाणी घ्यायचं.”
“बिस्किट आहेत ना?”
“भरपूर खाऊ आहे. तुझ्या आवडीचा. ओळख बघू?”
“फरसाण?”
“येस्स.” बाबू त्या मंजूच्या ‘येस्स’ने जाम खूश झाला.
घर आलं. मंजू-बाबू रिक्षातून उतरले. मंजूने पैसे दिले.
“अर्धे अर्धे करूया. टीटीएमएम. तुझं तू, माझं मी.” बाबू मंजूला म्हणाला.
मंजू गोड हसली. “तेवीस रुपये तर झाले… माझे मी भरते सगळेच्या सगळे.”
“बर बुवा. मी देऊ शकतो.” बाबूनं क्लिअर केलं.
“नको नको. दॅट आय विल मॅनेज फॉर ट्वेटी थ्री रूपीज.”
“बरं बुवा! तुझी मर्जी.”
“बाबू, मर्जी बिर्जी कसली? अरे ट्वेंटी थ्री ही काय रक्कम आहे?”
“मेरा बिल दे दो.” रिक्षावाल्याने व्यवहारीपणे मध्ये तोंड घातले.
दोघं खोलीजवळ पोहोचली. मंजूने बाबूला घट्ट मिठी मारली. बाबू बिचकला. मग धीट झाला. “एक पप्पी? घेऊ?”
“घे ना. वाट कसली बघतोयस?” मंजू धीटपणे म्हणाली.
“ये.” दोघे अगदी जवळ आली. रिक्षावाला आरशातून गंमत बघत होता. त्याला गिऱ्हाईक म्हणजे हवीहवीशी गंमतच होती.
दिवसभराचा थोडा थोडा विरंगुळा. थोडी थोडी उत्सुकता. थोडा थोडा बदल!
“बाबू, तुझी पप्पी फार्फार गोग्गोड आहे.”
“खरंच का गं?”
“खरं. अगदी खरं.”
“मंजू, तूच लई लई गोड आहेस. उसाच्या कांडीसारखी.”
“आवडली उपमा.”
“मंजू, गावी ऊसमळा आहे वडिलांचा. पोटापुरते मिळवतात. आपली रोजी रोटी कमावतात.”
“म्हणजे तुझ्यावर भार नाही.”
“खरंच भार नाही. आई-वडील स्वत:चे स्वत:वर मस्त आहेत.”
“लग्न झालं की तुझा पगार तुला!”
“टीटीएमएम. बाबांचे बाबा नि आई. माझे मला. तरी पण अख्खा पगार मी अजून पालकांना देतो. माझे बहीण-भाऊ खावटीचे पैसे देतात. दोन दोन हजार.”
“हे कमीच आहेत. तीन-तीन तरी द्यायला हवेत. महागाई इतकी प्रचंड वाढली. तेल किती महाग झालंय ना!”
“हो गं मंजू. माझ्या लक्षात आलंय आता. मी बघेन. भाऊ नि बहीण दोघांना.” बाबू निश्चयाने म्हणाला.
“काय सांगशील?”
“तीन-तीन हजार तरी द्याच.”
“सांगच. निक्षून सांग. फायदा घेतात दोघं!” मंजू म्हणाली.
“बाबूला कमी समजू नकोस. घाबरत नाही मी कुणाला.”
“मला धीर आहे. विश्वास आहे. बाबू लवकरात लवकर हे काम उरक. शक्य झालं तर आजच.” मंजू निकराने म्हणाली.
“काकू आहे बरं का घरी.” बाबू म्हणाला.
“काकू नि आई?”
“हो. दोन बायका. वडील नि काका गावी आजऱ्याला असतात.”
“शेतमळा सांभाळतात ना?”
“वडिलांची दुसरी बायको आहे अन्ऑफिशिअल.”
“असं असतंच रे. मला कल्पना आहे.” मंजू म्हणाली.
“कशी काय? मला असा राग येतो ना!” बाबूनं रागानं म्हटलं.
“गरज रे बाबू. माणसं शरीर नावाचं माध्यम
वापरतात ना!”
“तिथेच तर सगळी गल्लत आहे.” मंजू नेटाने म्हणाली.
“फक्त इकडे आले की आईचे.”
“नशीबच म्हणायचं!” मंजू शहाणी झाली.
“घर आलं. बाबा हा विषय बंद!”
“बंद!” मंजूनं लेप चढवला.
दोघं घरात शिरली मंजूच्या. मंजू शिरल्या-शिरल्या जवळ आली.
बाबूने विरोध केला नाही…