नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवी दिल्ली सर्वात कमी वयात भारतीय संघात पदार्पण करणारा खेळाडू म्हणून सचिन तेंडुलकरला ओळखले जाते. मात्र सचिनच्या अगोदर हा रेकॉर्ड १९६५ मध्ये पुण्यात जन्मलेल्या खेळाडूच्या नावावर होता. भारतीय क्रिकेट संघातील अनेक असे खेळाडू आहेत, ज्यांनी आपली सुरुवात शानदार करून सर्वांचे लक्ष वेधले होते. मात्र खराब फॉर्ममुळे काही खेळाडूंचे करिअर संपुष्टात आले. मात्र भारतीय संघातील एक असादेखील खेळाडू आहे, ज्यांचे करिअर दारूच्या व्यसनामुळे धोक्यात आले. या खेळाडूने वयाच्या अवघ्या १७व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण करून सर्वांचीच मनं जिंकली होती.
सर्वात कमी वयात भारतीय संघात पदार्पण करणारा खेळाडू म्हणून सचिन तेंडुलकरला ओळखले जाते. सचिनच्या अगोदर हा विक्रम १९६५ मध्ये पुण्यात जन्मलेल्या मनिंदर सिंगच्या नावावर होता. त्यानं वयाच्या अवघ्या १७व्या वर्षी पाकिस्तानविरुद्ध सामना खेळला होता. मनिंदर सिंगने सुरुवातीला शानदार प्रदर्शन केले मात्र कालांतरानं खराब फॉर्म आणि मानसिक तणावामुळे त्याचे करिअर संपुष्टात आले.
मनिंदर सिंगचा फॉर्म खराब होत गेल्याने त्याला १९९० मध्ये संघातून पायउतार व्हावे लागले. विशेष म्हणजे त्याने १९९४ मध्ये संघात पुनरागमन करताना ७ बळीदेखील घेतले होते. मात्र तो संघातील आपले स्थान कायम राखू शकला नाही. मनिंदरचे करिअर केवळ २७व्या वर्षी संपुष्टात आले. संघातून बाहेर झाल्यानंतर तणावात आलेला मनिंदर दारू आणि अमली पदार्थांचा शिकार झाला.
दरम्यान, मनिंदर सिंगची तुलना महान फिरकीपट्टू बिशन सिंग यांच्यासोबत केली जात होती. संघातून पायउतार झाल्याच्या तणावामुळे त्याने आत्महत्या करण्याचा मार्गही अवलंबला होता. या घटनेला त्याने नंतर फक्त एक अपघात असल्याचे म्हटले. यामुळे तो अमली पदार्थांचे सेवन करू लागला होता. त्याला पोलिसांनी अटकही केली होती. नंतर त्याची या नशेतून सुटका झाली. मनिंदर सिंगने भारतासाठी ३५ कसोटी सामने खेळले ज्यामध्ये त्याने ८८ बळी पटकावले, तर ५९ एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याच्या नावावर ६६ बळींची नोंद आहे.