अरुण बेतकेकर
महाराष्ट्रात अलीकडे १० जून २०२२ राज्यसभा तर २० जून २०२२ विधानपरिषद निवडणुका संपन्न झाल्या. या निवडणुका गेली अनेक वर्षे तडजोडीने बिनविरोध पार पडत होत्या. यंदाही त्यासाठी प्रयत्न झाले पण फिस्कटले. आघाडीचा अतिआत्मविश्वास नामुष्कीस कारणीभूत ठरला. भाजपने राज्यसभा व विधानपरिषदेतील प्रत्येकी एक अतिरिक्त जागा जिंकत आघाडीचे दात घशात घातले. भाजपाकडे राज्यसभेसाठी स्वतःची १०६ + अन्य ७ असे ११३ मते असताना त्यांनी १२३ मते मिळवली. म्हणजेच आघाडीची १० अधिक मते खेचून आणली.
त्यानंतर १० दिवसांत विधान परिषद निवडणुका होत्या. राज्यसभेच्या पराभवानंतर आघाडीची प्रतिष्ठा पणास लागली होती. प्रतिष्ठेच्या ११व्या जागेसाठी भाजपकडे एकही मत उपलब्ध नव्हते. असे असूनही ही जागा त्यांनी लीलया जिंकली. भाजपकडे ११३ मते असताना त्यांनी १३४ मते मिळवली, म्हणजे आघाडीची २१ अधिक मते खेचून आणली. महत्त्वाचे म्हणजे राज्यसभेसाठी मिळालेल्या १० अधिक मतात आणखी ११ची भर घातली.
विधानसभा निवडणुकीतील मतांची फोडाफोडी पहा. शिवसेनेकडे स्वतःची हक्काची ५५ मते होती. त्यांनी सुरक्षेखातर ६० पेक्षा अधिक मतांची तजवीज केली होती. पण त्यांना मिळाली ५२ मते. म्हणजेच त्यांची ८ मते फुटली. स्वतःचे आमदार राखण्यातसुद्धा ते अपयशी ठरले आणि या अभेद्य म्हणवणाऱ्या पक्षास खिंडार पडले. काँग्रेसची तर पुरती वाताहत झाली. त्यांच्या देशातील अधोगतीचे प्रतिबिंब येथेही दिसले. त्यांची स्वतःची ४४ मते होती. पहिला उमेदवार निश्चित विजयी तर अतिरिक्त मतांची जुळवाजुळव करत त्यांचा दुसरा उमेदवार निवडून येणे शक्य होते. पण अंतिमतः ११व्या जागेसाठी त्यांच्याच दोन्ही उमेदवारात लढत झाली आणि त्यांचाच पहिल्या हक्काचा उमेदवार पराजित, तर दुसऱ्या क्रमांकाचा उमेदवार विजयी झाला. आघाडीतील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांनी मिळून काँग्रेसचा पुरता फुटबॉल केला. या प्रक्रियेत धूर्त कोल्हा ठरला राष्ट्रवादी. त्यांच्याकडे स्वतःची ५१ मते असताना त्यांनी मिळवली ५७ मते म्हणजे ६ अधिक. एकीकडे आघाडीतील शिवसेना व काँग्रेस एक-एक मतासाठी झगडत होते, तेथे राष्ट्रवादीने अधिक मते पटकावली. कोल्ह्याने घाट लावून दोघांचाही घात केला.
या दोन निवडणुकीदरम्यान १९ जून २०२२ म्हणजेच विधान परिषदेच्या पूर्वसंध्येला व राज्यसभेच्या दारुण पराभवाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा ५६वा वर्धापन दिन साजरा झाला. यावेळी तो पंचतारांकित हॉटेलवर म्हणजेच केवळ शिवसेनेतील गब्बरांच्या उपस्थितीत पूर्वी तो षण्मुखानंद सभागृहात शिवसैनिकांसह संपन्न होई. या पायंड्यास बगल दिली गेली. भाषणात उद्धवजी म्हणाले, “आईचे दूध विकणारा नराधम शिवसेनेत नको. आज शिवसेनेत गद्दार मनाचा कोणी नाही.” अलीकडच्या प्रत्येक भाषणात उद्धवजींना गद्दार या शब्दाचा वारंवार उल्लेख करावा लागतो आहे. पण याची जमिनी स्थिती, परिमार्जन, विश्लेषण आणि निरासन करण्यासाठी त्यांच्याकडे उसंत नाही. ते यापासून अनभिज्ञ आहेत. अभ्यास हा त्यांचा स्थायीभाव नव्हेच, सत्यात जे अनिवार्य असायला हवे होते. त्यांना स्वकियांमध्येच गद्दार दिसतात. बाळासाहेबांना ते राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसमध्ये दिसायचे. शरद पवार तर त्यांचे हाडवैरी पण उद्धवजींसाठी तेच परमेश्वरासमान. उद्धवजी तुमची गद्दाराची व्याख्या एकदाची जगाला सांगाच. आज संपूर्ण जगाला आतंकवादाचा धोका जाणवतो आहे, भारतास तो अधिकच. जगभर यावर विचार मंथन सुरू आहे. जागतिक व्यासपीठावर यावर चिंता व्यक्त होत असताना आज पावेतो आतंकवादाची व्याख्याच तयार झालेली नाही. त्यामुळे आतंकवाद म्हणजे काय हेच निश्चित होत नाही. याचा फायदा आतंकवाद्यांना होतो. तेच आपले गद्दारांबाबत होते. गद्दार कोणी कोणाला म्हणावे? बाळासाहेबांच्या शिवसेनेत निश्चित ध्येय धोरणे होती. मराठी माणूस, हिंदुत्व, देश, शत्रू, देशद्रोही कोण हे स्पष्ट असे. ज्यांना हे मान्य ते भगव्याखाली एकवटले. शिवसेना फोफावली. तसे उद्धवजींच्या अखत्यारीतील शिवसेनेत राहिले आहे का? सर्वानी आपल्यासोबत रहावे ही जर उद्धवजींची अपेक्षा असेल, तर त्यांनी बाळासाहेबांची ध्येय-धोरणे, विचार, नीतिमूल्य आपण यथास्थिती पुढे नेणे आवश्यक होते. तसे न होता आपण त्यास मूठमाती दिली. मूठभर नेते तुपाशी, तर शिवसैनिक उपाशी ही सत्य परिस्थिती आहे. आपण बाळासाहेब यांना शिवसैनिकास मुख्यमंत्री करेन, असा शब्द दिला होता. ऐवजी स्वतः मुख्यमंत्री झालात. अन् आज म्हणता, “शरद पवारांच्या आग्रहाखातर मुख्यमंत्रीपद स्वीकारलं.” मला अनुभव नाही असं दहा वेळा म्हणता म्हणजेच धागे-दोरे पवार यांच्या हाती आहेत, याची ग्वाहीही देता. उद्धवजींचे मुख्यमंत्री होणे हे शिवसेनेसाठी आत्मघातकी पाऊल ठरले. यासाठी त्यांनी शिवसेनेस सारीपाटावर लावले. असे होत असताना बाळासाहेब, मूळ शिवसेना आणि त्यांच्या विचारांचे उल्लंघन कोणी केले? मग गद्दार कोण? उल्लंघन करणारा गद्दार वा ते अमान्य करणारा गद्दार? पक्ष मोठा वा व्यक्ती ?
गेल्या अडीच वर्षांत लोकप्रतिनिधींशी समन्वय, संवाद, संपर्क राखला गेला नाही. परक्यांना कुरवाळायचे, स्वकीयांना झिडकारयाचे. “गैरोपें करम, अपनोंपे सितम” या कार्यपद्धतीमुळे माजलेले नैराश्य, अशी कारणे आमदारांनी शिवसेनेविरोधात मतदान करणं आणि उद्धवजींना सोडून जाण्यास कारणीभूत ठरली. योग्य व्यक्ती योग्य कामासाठी नियुक्त करण्यात उद्धवजी सपशेल अपयशी ठरले. बाळासाहेबांना वैचारिक अधिष्ठान होते, ते जे सर्वोच्च पदावर आरूढ व्यक्तीसाठी असणे आवश्यक आहे. उद्धवजींना विरासतेत भक्कम वैचारिक अधिष्ठान प्राप्त झाले. ते तर त्यांना राखता आले नाहीच. पण जे होते, तेही त्यांनी सहजी विस्कटून टाकले. आजची दुर्दशा उद्धवजींनी स्वतःच्या कर्माने, अकार्यक्षमतेने स्वतःवर ओढवून घेतली, आहे हे निश्चित.