महाराष्ट्र हे लोककल्याणकारी राज्य बनावे हा मानस
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा विश्वास
सावंतवाडी (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षांत काय केले? जनहिताचे कोणते निर्णय घेतले, शेतकरी, कामगार, मजूर, उद्योजक, व्यावसायिक तसेच बेरोजगार यांचे कोणते प्रश्न सोडवले? स्वतःच्या आमदार, खासदार, मंत्री यांनाच साधी भेट दिली नाही. त्यांचे प्रश्न सोडवले नाहीत. केवळ मातोश्रीच्या आप्तस्वकीयांची कामे केली. एककलमी भ्रष्टाचार सोडून काहीही केलेले नाही. त्यामुळेच स्वकीयांच्या असंतोषातून नवं सरकार स्थापन झालं असून हे नवं सरकार जनहितासाठी काम करेल. या सरकारच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्र एक लोककल्याणकारी राज्य बनावे, हा आमचा मानस आहे, असा विश्वास केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांनी व्यक्त केला.
सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असलेले केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे हे सावंतवाडीत आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना सडेतोड उत्तरे दिली. यावेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, युवराज लखन राजे-भोसले, शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे आदी उपस्थित होते. शिवसेनेवर आज उद्भवलेल्या परिस्थितीला उद्धव ठाकरे आणि त्यांचे चिरंजीवच जबाबदार आहेत. शिवसेनेचे अस्तित्व आता संपले असून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना पुन्हा उभी राहणार नाही. दुकान खाली झाल्यावर गिऱ्हाईक माल घ्यायला येत नाहीत. त्यामुळे त्यांनी आता गप्प बसून आराम करावा, असा सल्ला ना. राणे यांनी ठाकरे यांना दिला.
उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची मानसिक स्थिती ढासळली आहे. त्यामुळे आता तरी त्यांनी तोंड गप्प करावे. ज्यांना मुख्यमंत्री असतानासुद्धा स्वतःचे आमदार सांभाळता येऊ शकले नाही, ते मतदार काय सांभाळणार? असा सवाल करतानाच महाविकास आघाडी सरकारमध्ये काम करत असताना मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी केवळ नारायण राणे यांच्या घराला नोटीस बजाविण्याचे काम केले, अशी उपरोधिक टीकाही त्यांनी यावेळी केली.
‘आपण वेळोवेळी महाविकास आघाडी सरकार कोसळणार, हे सांगत आलो होतो. वाशिम येथील जाहीर पत्रकार परिषदेत जूनमध्ये हे सरकार पडेल, असे आपण स्पष्टपणे सांगितले होते. कारण मला आधीच त्याची कल्पना होती. आता शिवसेनेच्या चिन्हावरून उभा राहिलेला प्रश्न कायद्याच्या बाबीवर अवलंबून आहे. येत्या ११ तारखेला होणाऱ्या निर्णयानंतर पुढील हालचाली घडून येतील. नवीन सरकारच्या माध्यमातून येथील जनतेचे विविध प्रश्न सोडवण्याबरोबरच हे राज्य लोककल्याणकारी राज्य बनावे, यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.