संदीप जाधव
बोईसर : तारापूर औद्योगिक वसाहतीला मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या चिल्हार बोईसर रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम पाच वर्षानंतरही अपूर्ण आहे. धोक्याची सूचना फलके नसलेले रस्ता दुभाजक आणि बांधकामादरम्यान सळया बाहेर निघालेली उघडी गटारे पाणी भरल्याने अपघातांना आमंत्रण देत आहेत. अपूर्ण कामांमुळे चिल्हार बोईसर रस्त्यावर नाहक बळी जात आहेत. गुरुवारी सायंकाळी लालोंडे ग्रामपंचायत हद्दीतील फुलाचा पाडा येथील महेंद्र संधू वाडी समोरच्या उघड्या गटारात पडून रूपल दिरकसिंग थापा (वय ३४) यांचा अपघाती मृत्यू झाला. चिल्हार बोईसर रस्त्यावर धोकादायक दुभाजकांना अवजड वाहने धडकून अनेक अपघात झाले आहेत.
चौपदरीकरणाच्या कामात एमआयडीसीचे ढिसाळ नियोजन कारणीभूत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थ आणि वाहनचालकांकडून केला जात आहे. एमआयडीसीच्या कार्यकारी अभियंत्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गावरून चिल्हार बोईसर रस्त्यामार्गे तारापूर औद्योगिक वसाहतीत जाणाऱ्या वाहनांची वर्दळ वाढल्याने चिल्हार बोईसर रस्त्याच्या रुंदीकरणाची मागणी केली जात होती. या पार्श्वभूमीवर पाच वर्षांपूर्वी शंभर कोटी रुपये कर्च करून या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती.
रुंदीकरणाच्या कामात चिल्हार बोईसर रस्त्यावर बेटेगाव पोलीस चौकी, मान, वारांगडे, गुंदले, नागझरी, चरी येथे सहा साकव, तर हातनदी आणि सूर्या नदीवर नवीन पुलाचे बांधकाम, रुंदीकरणानंतर रस्त्यावर दुभाजक बसविणे, पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी रस्त्यालगत सिमेंट काँक्रिट गटाराचे बांधकाम प्रस्तावित होते. चिल्हार बोईसर रस्त्यावर सहा साकव, हातनदी आणि सूर्या नदीवरील पुलाचे बांधकाम पूर्ण होऊन वाहतूक सुरू करण्यात आली आहे. वेळगाव फाटा ते चरीपर्यंतचा रस्ता अपूर्ण आहे. रुंदीकरणानंतर रस्त्यावर तयार केलेल्या दुभाजकांवर धोक्याच्या सूचना देणारे फलक लावण्यात आले नाहीत. त्यामुळे दुभाजकांना धडकून अनेक अपघात झाले आहेत.
या अपघातांमध्ये निष्पाप वाहनचालक आणि दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे. एमआयडीसीचे उपअभियंता कार्यालयाच्या ढिसाळ नियोजनामुळे चिल्हार बोईसर रस्ता रुंदीकरण रखडल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांकडून केला जात आहे. पाच वर्षानंतरही रस्त्याचे वीस टक्के काम अपूर्ण असल्याने रस्त्यावर अपघात होऊन अनेकांचा बळी गेला आहे. त्यामुळे एमआयडीसीच्या उपअभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.
एमआयडीसी तारापूर
चाळीस वर्षांपूर्वी चिल्हार बोईसर रस्त्यासाठी भूसंपादन प्रक्रिया राबविण्यात आली होती; परंतु संपादित जागेचा मोबदला अनेक शेतकऱ्यांना मिळाला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे रुंदीकरणाच्या कामाला हरकत घेतली असल्यामुळे वेळगाव फाट्यापासून चरी गावापर्यंतचा एक किलोमीटर अंतराचा रस्ता तसेच मान आणि नागझरी नाक्यावर रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू झालेच नाही. बो चिल्हार-बोईसर रस्त्यावरील अपघात ८ सप्टेंबर २०२१ चिल्हार बोईसर रस्त्यावरील नागझरी गावच्या हद्दीत भरधाव वेगातील टेम्पोने कारला पाठीमागून धडक दिल्याने अपघातग्रस्त कार समोरून येणाऱ्या टेम्पोला धडकल्याने अपघात झाला होता. अपघातात छाया वडे (वय ६०) आणि गजानन वडे (वय ६०) या दांपत्याचा मृत्यू झाला होता. तीन प्रवासी गंभीर जखमी झाले होते.
२० सप्टेंबर २०२१ डी-मार्ट समोरच्या दुभाजकाला गॅस टँकर धडकून अपघात.
१८ सप्टेंबर २०२१ रुग्णवाहिका नागझरी येथे उलटली.
१० सप्टेंबर २०२१ रसायनाचा टँकर दुभाजकाला धडकून अपघात.
११ ऑगस्ट २०२१ दुचाकी अपघातात नितेश निसकटे नामक दुचाकीस्वाराचा मृत्यू.
२५ जून २०२१ वारांगडे गावच्या वळणावर अवजड ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात होऊन ट्रक उलटला होता.
२१ मे २०२१ भरधाव ट्रेलरच्या धडकेत दुचाकीला विजय सुरेश वडाळी नामक दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला होता.
३१ डिसेंबर २०२० मध्ये नागझरीजवळ भरधाव टँकरची उभ्या ट्रकला धडक.
०३ डिसेंबर २०२० वारांगडे गावच्या हद्दीतील धोकादायक वळणावर कंटेनरच्या टायरखाली चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू.
रस्त्याचे काम अपूर्ण असलेल्या ठिकाणी धोक्याच्या सूचना देणारे फलक बसविण्यात येतील. उघड्या गटाराची माहिती घेऊन आवश्यक उपाययोजना करण्यात येतील. – संतोष पाटील, उपअभियंता