त्र्यंबकेश्वरसह तालुक्यात पावसाची संततधार सुरच !
सुनिल बोडके
वेळुंजे : त्र्यंबकेश्वरसह तालुक्याच्या ग्रामीण भागातील हरसूल परिसरात पावसाची संततधार सुरूच असून पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसाने अनेक नद्यांना पूर आला असून शिरसगाव (हरसूल) येथे नव्याने उभारण्यात आलेल्या पुलाचे बांधकाम साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेले असून पुलाचा स्लॅबदेखील कोसळण्याची शक्यता आहे. या पावसामुळे अपूर्ण असलेल्या या पुलामुळे १५ गावांचा संपर्क तुटला होता. या पुलावरून विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास करून शाळा व घर गाठावे लागते. या पूल बांधकामाच्या ठेकेदाराच्या निकृष्ट कामाचे पडसाद आता विद्यार्थ्यांनाही भोगावे लागत आहेत.
हरसूल परिसरात तसेच राज्यांच्या सीमावर्ती भागात सकाळपासूनच पावसाने संततधार सुरू ठेवल्याने काही तासांतच अनेक लहान- मोठ्या ओहळ, नाले,नद्यांना पूर आला होता. मात्र या पावसाने शेती कामाला मोठी चालना मिळाली असून शेतकरी या पावसातही भात अवनी करतांना दिसून आला.
या पावसामुळे शाळकरी मुले, शिक्षक वर्गाची पुरती तारांबळ उडाल्याचे चित्र पहावयास मिळाले. तसेच अनेक गावांचा संपर्क तुटल्याने विद्यार्थ्यांना मोठी कसरत करण्याची वेळ आली. त्यात हवा आणि जोरदार पाऊस होत असल्याने मानवी जीवनावरही याचा परिणाम दिसून आला. धो- धो बरसणाऱ्या पावसाने पूर्णतः जनजीवन विस्कळीत झाले आहे.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शिरसगाव-मुरंबी रस्त्यावर नव्याने पुलाची उभारली करण्यात येत आहे. मागील आठवड्यात या पुलावर काही भागात स्लॅब टाकण्यात आला होता. तर काही ठिकाणी अजून प्रतीक्षेत आहे. मात्र हा पूल नदीच्या पात्रात असल्यामुळे संततधार पावसामुळे नदीला पूर आला असून बांधकाम साहित्य त्यात वाहून गेले आहे. ‘सर आली धावून, बांधकाम साहित्य गेले वाहून’ असे आता म्हणण्याची वेळ आली आहे.
विशेष म्हणजे शिरसगाव भागात दळणवळणाच्या दृष्टीने नव्याने उभारण्यात येत असलेला हा महत्वाचा पूल आहे. अनेक गावांना जोडणारा आणि वेळेची बचत करणारा हा पूल आहे. मात्र अधिकारी आणि ठेकेदार यांच्या आडमुठ्या धोरणामुळे निकृष्ट दर्जाच्या कामाने भर पावसाळ्यात या पुलाचे काम करण्यात येत असल्याने नियंत्रण व गुणवत्तापूर्ण काम असेल का? याबद्दल शंका घेण्यात येत आहे. पुलाच्या बांधकामाची गुणवत्ता व हलगर्जीपणा याबाबत सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.