नाशिक (प्रतिनिधी) : शहरातील मुद्रांक कार्यालयावरील कामाचा ताण लक्षात घेत ११ जुलैपासून सकाळ व दुपार अशा दोन सत्रात कार्यालये सुरू राहणार आहेत. याबाबत राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक निरीक्षक श्रावण हर्डीकर यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.
नाशिक शहरातील नोंदणी कार्यालयातील कामाचा ताण तसेच मुद्रांक विभागाच्या सर्व्हरवर पडणारा ताण, याचा परिणाम कामकाजावर होत होता. यामुळे नोंदणी कार्यालयाची कामकाजाची वेळ वाढवावी, अशी मागणी होत होती. बांधकाम व्यावसायिकांच्या नरेडको संघटनेने याबाबत राज्याचे मुद्रांक निरीक्षक श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले होते. याची दखल घेत १७ जून रोजी झालेल्या बैठकीत नोंदणी कार्यालये सकाळ व दुपार अशा दोन सत्रात सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत तसे आदेश देण्यात आले आहेत.
या निर्णयानुसार सहाय्यक जिल्हा निबंधकांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात शहरातील दोन नोंदणी कार्यालये सकाळ व दुपार सत्रात सुरू करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. नाशिक शहरातील सह दुय्यम निबंधकवर्ग-२ नाशिक क्र. ४ व सह दुय्यम निबंधक वर्ग -२ नाशिक क्र. ३ ही कार्यालये सकाळच्या सत्रात सुरू राहतील तर व दुपार सत्र ११ जुलैपासून सुरू ठेवण्यात येणार आहे. सह दुय्यम निबंधक वर्ग-२ नाशिक क्र. ४ हे सकाळी ७.३० ते दुपारी ३.१५ व सह दुय्यम निबंधक वर्ग-२ नाशिक क्र. ३ हे दुपारी १ ते ८.४५ या वेळेत सुरू राहणार आहे.
नागरिकांनी कार्यालयीन वेळेत झालेल्या बदलाची नोंद घ्यावी, तसेच सदरचा बदल नागरिकांच्या सोयीसाठी करण्यात आला असल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. शहरातील दोन नोंदणी कार्यालये सकाळ व दुपार अशा दोन सत्रात सुरू राहणार असल्याने येथे नोंदणीसाठी येणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे.