अमरावती : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. दिल्लीमध्ये ते भाजप पक्षश्रेष्ठींच्या भेटी घेत आहेत. दरम्यान, अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील कोयलारी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पाचडोंगरी येथे शेतातील खुल्या विहिरीचे पाणी सेवन केल्याने अतिसारातून तिघांचा मृत्यू झाला, तर शंभरपेक्षा अधिक आदिवासींना लागण झाली आहे.
या प्रकरणाची राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली असून आज मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या व्यस्त कार्यक्रमामधून जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या सोबत मोबाईलवरून चर्चा करून परिस्थितीची संपूर्ण माहिती जाणून घेतली सोबतच त्या आदिवासींची काळजी घेऊन त्यांच्यावर चांगले औषध उपचार करून जातीने लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. सोबतच या विहिरीचे पाणी पिल्याने ज्या तीन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या परिवाराला शासकीय मदत तातडीने करण्याचे हि निर्देश आज दिले.
मेळघाटात दूषित पाण्याने तिघांचा मृत्यू तर ७० ते ८० जणांची प्रकृती बिघडली आहे. चिखलदरा तालुक्यातील पाचडोंगरीमध्ये दूषित पाणी पिल्याने कॉलरा सदृश्य आजारामुळे साथ आली आहे. याच परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा शुक्रवारी तिथे पोहोचल्या. यावेळी खासदार नवनीत राणांसह जिल्हा परिषदचे सीईओ, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, पोलीस अधिकाऱ्यांसह जिल्हा प्रशासनातील अनेक अधिकारी हजर होते.