Saturday, October 5, 2024
Homeमहामुंबईअतिधोकादायक इमारतींवर तातडीने कारवाई करा

अतिधोकादायक इमारतींवर तातडीने कारवाई करा

पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांचे निर्देश

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अतिधोकादायक इमारतींची प्राधान्यक्रम यादी निश्चित करून पोलिसांच्या सहकार्याने या इमारती रिकाम्या करून घ्याव्यात, त्याचबरोबर दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी देखील सुनिश्चित व निर्धारित कार्यपद्धतीनुसार तातडीने कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश पालिका अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले आहेत.

दरम्यान मुंबई महानगरपालिका क्षेत्रात असणाऱ्या मुंबई शहर जिल्हा व मुंबई उपनगर जिल्हा या दोन्ही जिल्ह्यांसाठी दोन स्वतंत्र जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणे आहेत. अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे या मुंबई उपनगर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्ष असून अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) आशिष कुमार शर्मा हे मुंबई शहर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत. या दोन्ही आयुक्तांनी आपत्ती व्यवस्थापन बाबत बैठक घेतली होती.

यावेळी या बैठकीला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार, मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आर. डी. निवतकर, मुंबई पोलीस दलाचे आयुक्त विवेक फणसाळकर, मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिनिधी हे विशेषत्वाने उपस्थित होते. त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त (उद्याने) किशोर गांधी, पालिकेच्या विविध परिमंडळाचे उपायुक्त, उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले, प्रशासकीय विभागाचे सहाय्यक आयुक्त, संचालक (आपत्कालीन व्यवस्थापन) महेश नार्वेकर, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाचे प्रतिनिधी, मुंबई अग्निशमन दलाचे व बृहन्मुंबई सुरक्षा दलाचे संबंधित अधिकारी, आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या प्रमुख संगीता लोखंडे यांच्यासह विविध संस्थांचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने मध्य व पश्चिम रेल्वे, बेस्ट उपक्रम, तटरक्षक दल, म्हाडा, एम.एम.आर.डी.ए., एम.टी.एन.एल., वाहतूक पोलीस, विविध रुग्णालये, विविध स्वयंसेवी संस्था इत्यादींचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या बैठकीत मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अतिधोकादायक इमारतींची प्राधान्यक्रम यादी निश्चित करून सुनिश्चित व निर्धारित कार्यपद्धतीनुसार मुंबई पोलिसांच्या सहकार्याने या इमारती रिकाम्या करून घ्याव्यात, त्याचबरोबर दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या ठिकाणीदेखील सुनिश्चित व निर्धारित कार्यपद्धतीनुसार तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश दिले आहेत. मुंबई पोलीस दलाचे आयुक्त विवेक फणसाळकर यांनी अतिधोकादायक इमारती रिकाम्या करून घेण्याच्या दृष्टीने मुंबई पोलिसांकडून आवश्यक असणारे सहकार्य महानगरपालिकेला तत्काळ उपलब्ध करून दिले जाईल, असे सांगितले आहे.

दरम्यान याच बैठकीदरम्यान अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत तक्रार प्राप्त झाल्यास त्याविषयी आवश्यक ती कार्यवाही २४ तासांच्या आत करण्याचे निर्देश महानगरपालिकेच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना व प्रशासकीय विभागांना दिले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -