क्वालालम्पूर (वृत्तसंस्था) : भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूचे मलेशिया ओपनमधील आव्हान संपुष्टात आले आहे. उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या ताय त्झू यिंगने सिंधूला पराभूत करत स्पर्धेबाहेर केले. ५५ मिनिटे चाललेल्या या सामन्यात सिंधू १३-२१, २१-१२, १२-२१ अशी पराभूत झाली.
मलेशिया ओपनमध्ये पी. व्ही. सिंधूने थायलंडच्या फिट्टायापोर्न चायवानचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली होती. सिंधूने फिट्टायापोर्न चायवानचा १९-२१, २१-९, २१-१४ असा पराभव केला होता. पण आता उपांत्यपूर्व फेरीत सिंधू पराभूत झाल्याने ती उपांत्य फेरीत पोहोचू शकलेली नाही. उपांत्यपूर्व फेरीच्या या महत्त्वपूर्ण सामन्यात पहिल्या सेटमध्ये यिंगने दमदार खेळ दाखवला.
आधीपासून चांगले पॉइंट्स जमवत ती थेट १३-२१ अशा मोठ्या फरकाने जिंकली. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये मात्र सिंधूने पुनरागमन केले आणि २१-१२ च्या फरकाने सिंधूने सेट जिंकला. त्यानंतर अखेरच्या आणि निर्णायक सेटकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले होते. हा सेट २१-१४ च्या फरकाने यिंगने जिंकत सामनाही नावे केला. हा सामना जिंकत यिंगने आगेकूच केली, तर सिंधूचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सिंधूला याच यिंगने पराभूत केले होते. ज्यामुळे यिंगला रौप्यपदक मिळाले होते, तर सिंधूला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. त्यानंतर आताही यिंगमुळे सिंधूचे मलेशिया ओपनमधील आव्हान संपुष्टात आले आहे. आतापर्यंत सिंधू आणि यिंग यांच्यात झालेल्या सामन्यात यिंगचच पारडे जड राहिले असून तिने १६ सामने जिंकले असून सिंधूने केवळ ५ सामने जिंकले आहेत.