Thursday, June 19, 2025

सचिन वाझेचे माफीचा साक्षीदार होण्याचे पत्र ‘ईडी’कडून मान्य

सचिन वाझेचे माफीचा साक्षीदार होण्याचे पत्र ‘ईडी’कडून मान्य

मुंबई : अँटिलीया हाऊस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वसुली प्रकरणात तुरुंगात असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी माफीचा साक्षीदार होण्यासाठी दर्शवलेली इच्छा ईडीने मान्य केली आहे. वाझेनी ईडीला दिलेले पत्र ईडीने मान्य केले आहे.


१०० कोटी वसूली, स्फोटकांनी भरलेली गाडी आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी सध्या जेलची हवा खात असलेला वाझे हा आता माफीचा साक्षीदार बनला आहे. याआधी वाझेने मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय न्यायालयात अर्ज केला होता. वाझेच्या या अर्जावर सीबीआयने देखील संमती दर्शवली होती. मात्र वाझेला खरेच पश्चाताप झालाय की माफीचा साक्षीदार बनून वाझे या गंभीर गुन्ह्यातून आपल्या सुटकेचा मार्ग काढतोय, अशी आता चर्चा सुरु झाली आहे.


त्यानंतर आता ईडीने वाझेचा अर्ज मान्य केल्यानंतर या प्रकरणाला नवीन वळण मिळणार असल्याचे दिसते आहे. सचिन वाझे सर्व तथ्य आणि खरी माहिती सांगणार असेल तर माफीचा साक्षीदार होण्यास आमचा कोणताही आक्षेप नाही, असे ईडीकडून सांगण्यात आले आहे. तसेच गुन्ह्यातील तपासाच्या कोणत्याही टप्प्यावर सचिन वाझे ही माहिती देऊ शकतात, असेही ईडीने म्हटले आहे.


आगामी काळात राज्यात महानगरपालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आहेत. त्यामुळे वाझेबाबत होणारी कारवाई माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अडचणीत आणू शकते. यामुळे आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला फटका बसू शकतो. म्हणूनच ही राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा असल्याच्या चर्चा सध्या सुरु झाल्या आहेत.

Comments
Add Comment