कोलंबो : गंभीर आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. देशाचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या निवासस्थानाला विरोधकांनी घेराव घातल्याने या गंभीर परिस्थितीत राजपक्षे यांनी घरातून पळ काढल्याचे समोर आले आहे.
Video – Protesters inside President's House in Colombo.pic.twitter.com/hadRlAa1Qk #LKA #SriLanka #SriLankaCrisis
— Sri Lanka Tweet 🇱🇰 (@SriLankaTweet) July 9, 2022
याआधी, जेव्हा श्रीलंकेचे माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी प्रचंड गदारोळात राजीनामा दिला होता, तेव्हाही जाळपोळ आणि हिंसक निदर्शने टाळण्यासाठी त्यांना कुटुंबासह घरातून पळ काढावा लागला होता.
एएफपी वृत्तसंस्थेने स्थानिक मीडिया आणि संरक्षण सूत्रांच्या हवाल्याने यासंदर्भात माहिती दिली आहे. श्रीलंकन वृत्तपत्र डेली मिररने दिलेल्या वृत्तानुसार, आंदोलकांनी राष्ट्रपती भवनात घुसून त्याचा ताबा मिळवला आहे. स्थानिक टीव्ही चॅनल न्यूजफर्स्टच्या व्हिडिओ फूटेजमध्ये हिंसक आंदोलक श्रीलंकेचे झेंडे आणि हेल्मेट घेऊन राष्ट्रपती भवनात प्रवेश करताना दिसत आहेत. ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये शेकडो निदर्शक श्रीलंकेच्या राष्ट्रपती भवनात घोषणाबाजी करताना दिसत आहेत.
रॉयटर्सने एका प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्याने सांगितले की, राष्ट्रपती भवनाला घेराव घालणाऱ्या संतप्त जमावाला रोखण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला, पण पोलिसांना त्यांना रोखता आले नाही. “हजारो आंदोलकांनी निवासस्थानाच्या मुख्य प्रवेशद्वारावर हल्ला केला, बॅरिकेड्स तोडले, यावेळी पोलिस या भागातून मागे हटताना दिसले” असे एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे. हवेत गोळीबाराचे आवाज येत होते आणि अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या जात होत्या, अशी माहिती रॉयटर्सने दिली आहे.