काशिनाथ माटल
सध्या पंढरपूरची वारी सर्वांचेच लक्ष वेधून घेते आहे. राज्य आणि राज्याबाहेरुन आलेले वारकरी जवळपास अठरा-एकोणीस दिवस घाटमाथा चढून, ऊन-पावसाची तमा न बाळगता, अनवाणी पायी चालत आहेत. मुखे फक्त पांडुरंगाचा जयघोष आणि मनात मात्र आस पंढरपूरच्या विठूरायाची आणि रखुमाईची.
तुकोबारायांनी म्हटलंय, “भेटी लागी जीवा लागलीसे आस,पाहे… रात्रीं दिवस वाट तुझी” हीच आस वारकऱ्यांच्या वृत्तीत दिसून येते. कोरोना काळातील दोन वर्षे सोडली, तर वर्षोनुवर्षे हे वारकरी नेमस्तपणे पायी चालत असतात. काय मिळते या वारकऱ्यांना? काय आहे या पाठीमागे तर्कशास्त्र? ज्याची उकल आजवर कुणालाच करता आली नाहीये. सारासार यामागे भक्तीभाव अधोरेखिला जातो. पण त्याहीपलीकडचे हे गूढ असावे, फक्त त्याची उकल होत नाहीये.
या वारी परंपरेतील वारकऱ्यांच्या संख्येत वर्षोनुवर्षे वाढ होऊ लागली आहे, हे कशाचे लक्षण आहे? या वर्षी दहा लाखांच्या वर तरी वारकरी या पायीवारीला लोटलाय, असे म्हणतात. महाराष्ट्राच्या मुंबई, पुणे आणि दुर्गम खेड्यांसह, कर्नाटक, आंध्र प्रदेश, अगदी पंजाबपर्यंतचा वारकरी या यात्रेला जोडला गेला आहे. खरेतर हा विषय आता जागतिक स्तरावर संशोधनाचा झाला तर आश्चर्य वाटू नये!
वारीची परंपरा ही १३ व्या शतकांपूर्वीपासूनची आहे, असा उल्लेख संतवाङ्मयात आढळतो. संत ज्ञानेश्वराच्या घराण्यात वारीची परंपरा आढळते. तुकाराम महाराज, मल्लाप्पा या सारख्या संतानी वारीची परंपरा सुरू केली. संत तुकाराम यांच्याही कुटुंबात वारीची परंपरा होती. साहित्याचे अभ्यासक म्हणतात, “पारंपरिक वारी हा वारकरी सांप्रदायाचा मुख्य आचारधर्म आहे. वारी ही ज्ञानेश्वरपूर्वकालीन प्रथा आहे. किंबहुना वारकरी हे नाव वारीमुळे पडले. वारीतून या सांप्रदायाची सामाजिकता आणि समाजाभिमुखता दिसून येते. ज्ञानदेवांच्या कर्तृत्वामुळे हा सांप्रदाय जनमानसावर प्रभाव गाजवून महाराष्ट्रव्यापी ठरला आहे; परंतु या सांप्रदायाचा आद्य प्रवर्तक भक्त पुंडलिक आहे, असं म्हटलं जातं. भक्त पुंडलिकापासून या सांप्रदायाच्या इतिहासाला सुरूवात होते,हे संतवाङमयातून ज्ञात होते.
संतांनी बंडाचं निशाण रोवण्यापूर्वी, महाराष्ट्रातील देवगिरीच्या यादवांचा अस्त झाला होता आणि सर्वत्र अंदाधुंदी सुरू झाली. बहुजन समाजाचे आर्थिक धार्मिक शोषण होऊ लागलेले. गुलामगिरीने डोके वर काढलेले. हिंदुधर्माला कर्मकांडची जळमटे चिकटलेली. आदिलशाही, निजामशाही, मुघलशाहीने विळखा घट्ट केलेला तो कळ होता. हिंदू धर्मातील सनातनी लोकांनी चातुर्वण्याची चौकट बळकट केलेली. अशा या काळात एक दिव्य ज्योत उदयाला आली,धर्मक्रांतीचा पहीला संत ज्ञानेश्वर होय. त्यावेळी धर्ममार्तंडांनी ज्ञानेश्वराचा खूप छळ केला.परंतु ज्ञानेश्वर महाराजांनी धर्म शास्त्रानुसार त्याला सडेतोड उत्तर दिले आणि भागवत पंथाचा झेंडा डौलाने फडकवला. ज्ञानेश्वरानंतर जनार्दन स्वामी, एकनाथ महाराज, नामदेव आणि त्या नंतर तुकाराम महाराजांनी भागवत धर्माची पताका सर्वत्र फडकवली. यामध्ये संत एकनाथपासून संत गोराकुंभार, चोखामेळा, सोपानदेव, मुक्ताबाई, विसोबा खेचर, कान्होपात्रा, जनाबाई अशी किती तरी संताची नावे घेता येतील की, माणसाला माणुसपण शिकविण्याचे जणू मिशन त्यांनी हाती घेतले. आपला जन्मच जणू त्यासाठी झाला, ही धारणा त्यांनी मनी करून घेतली. नामदेवांनी किर्तनाच्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेला. सर्व संत मंडळी एकत्र आली. त्यांनी एकत्रितपणे तिर्थयात्रा सुरू केली. महाराष्ट्र पिंजून काढला आणि गुजरात, राजस्थानपर्यंत भागवत धर्माचा प्रसार केला. भागवत धर्माचा कळस म्हणजे संत तुकाराम महाराजांची अभंगवाणी, असे म्हटले जाते.ही अभंगवाणी सर्वच संतांकडून व्यक्त होत गेली आहे. आज ही अभंग वाणीच वारीतील वारकऱ्याची शक्ती आहे. काम, क्रोध, मत्सर, माया आणि व्यवहार यांचा परस्पर समन्वय साधण्याचा संदेश अभंग वाणीतून मिळतो.आजच्या धकाधकीच्या जीवनात त्यासाठीचा समन्वय शोधून काढणे कठीण होऊन बसले आहे. म्हणूनच क्रोध मत्सर,द्वेशावर नियंत्रण ठेवण्यासाठी मेडिटेशनसारखा मार्ग शोधला जातो आणि म्हणूनच पंढरीच्या वारीचा मार्ग योग्य ठरतो. याचा अर्थ मानसिक संतुलन बिघडते तेव्हा वारीला जावे लागेल असा अर्थ मूळीच लावून जमणार नाही.
ज्ञानेश्वर माऊलीने म्हटलंय, “देवाचिये द्वारी उभा क्षणभरी। तेणे मुक्ती चारी साधियेल्या॥१॥ हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा। पुण्याची गणना कोण करी॥२॥
माऊलीने द्वैत आणि अद्वैतमधील फरक लक्षात आणून दिला आहे. आज पती-पत्नीच्या झगड्यात काडीकाडी जमवून उभा केलेला संसार मोडतो. दोन देशांतील लढ्यात लाखोंची मनुष्य आणि कपटाने उभी केलेली वित्तहानी क्षणभरात भस्मसात होते. तुकोबाराया म्हणतात, “अहंकार जो मी तू पणाचा निर्माण करतो तो नष्ट करा. “संतांनी कधी स्वतःला अवतार पुरुष मानलं नाही. ते विधात्याने पाठविलेले प्रेशित आहेत. त्यासाठी ते कोणत्याही विद्यापीठात गेले नाहीत. संत म्हणतात, मनुष्याने जन्माला आल्यावर एकदा तरी पांडुरंगाच्या वारीला जायला हवं. जाता आलं नाही तरी वारीमागील मर्म जाणता आले पाहिजे, तरच या वारी परंपरेमगील गुढाची उकल होईल, अन्यथा नाही.